सणासुदीची चाहूल लागली प्रदर्शनांच्या जाहिरातीही दिसू लागतात. घरगुती सजावटीच्या  गोष्टींपासून ते वेगवेगळे पदार्थ, दागिने, कपडे आणि मोठय़ा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत सर्व काही प्रदर्शनांमधून विक्रीला ठेवलं जातं. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सणासुदीच्या अगोदर अशी छोटी-मोठी प्रदर्शनं, व्यापारी पेठा हमखास भरतात. छोटे उद्योजक किंवा घरगुती पातळीवर व्यवसाय करणारे व्यापारी या प्रदर्शनांमधून आपल्या वस्तू विक्रीस ठेवतात. गावोगावच्या बचत गटांनी केलेल्या वस्तूंचाही समावेश असतो.

प्रदर्शनांमधून काय खरेदी करावं आणि काय टाळावं याच्या टिप्स :

  • हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने अशा प्रदर्शनांमधून मिळतात. हँडक्राफ्ट्स, पेंटिंग्ज, पॉटरी अशा विविध कलाकृती एकत्रित बघायला मिळतात आणि तेच या प्रदर्शनांचं वैशिष्टय़ आहे.
  • कलाकुसर केलेले पारंपरिक दागिने आणि वेगवेगळी प्रादेशिक वैशिष्टय़ं असणाऱ्या साडय़ाही इथे मिळू शकतात. काश्मिरी कशिदाकारी, बनारसी ब्रोकेड, कर्नाटकी कांथा, राजस्थानी मिरर वर्क, गुजराती बांधणी आणि कच्छी भरतकाम केलेल्या साडय़ा, ड्रेस मटेरिअल, स्टोल्स आदी इथे मिळू शकतं. हस्तकलेची अस्सल वस्तू मिळवण्यासाठी एरवी दहा दुकाने फिरावी लागतात. परराज्यांतील कलाकृती किंवा कापड घ्यायला त्या राज्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. ऑथेंटिक प्रॉडक्ट्ससाठी ऑनलाइन बाजारावरदेखील भरवसा वाटत नाही. अशा वेळी हे सगळं एका छताखाली मिळण्याची सोय या प्रदर्शनांमुळे होते.
  • एक्झिबिशन शॉपिंग नेहमीच फायदेशीर ठरते असं मात्र नाही. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू प्रदर्शनातून घेण्यात काही अर्थ नाही. दीर्घकाळ वापर करायचा आहे अशा घरगुती वस्तू अशा प्रदर्शनांमधून घेऊ नयेत. कारण प्रदर्शन संपल्यानंतर या वस्तूंच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सेवा मिळेल याची खात्री नसते.
  • जीन्स, शर्ट किंवा इतर ब्रॅण्डेड कपडे प्रदर्शनांमधून घेऊ नयेत.
  • अपरिचित ब्रॅण्डची कॉस्मेटिक्स किंवा इतर ब्युटी प्रॉडक्ट्स घेणंही धोक्याचं असतं. कारण उत्पादनांच्या अस्सलपणाची खात्री देता येत नाही. त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
  • प्रदर्शनांमध्ये दर वेळी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वीकारतातच असं नाही. त्यामुळे भली मोठी कॅश जवळ बाळगून गर्दीत फिरावं लागतं. ही एक्झिबिशन शॉपिंगमधली गैरसोय ठरते.
  • प्रदर्शनांमध्ये मिळणाऱ्या कलात्मक वस्तू किंवा कलात्मक दागिने यांची किंमत थोडी जास्त वाटू शकते. कारण व्यापारी प्रदर्शनासाठी येण्या-जाण्याचा खर्च आणि स्टॉलचं भाडंही या किमतीत वसूल करतात. त्यामुळे माहितीतले छोटे ब्रॅण्ड असतील तर त्यांच्या ओरिजिनल शो रूममध्ये किंवा घरगुती उद्योग असेल तर ऑनलाइन शॉपिंगद्वारे कधी कधी कमी किमतीत त्याच वस्तू मिळू शकतात. पण हे सगळं एकत्र बघण्यासाठी प्रदर्शनातली एक चक्कर अनिवार्य ठरते.

मुंबईपुण्यातील काही प्रदर्शनांची ठिकाणं

  • वर्ल्ड ट्रेड सेंटर- दक्षिण मुंबई- वेगवेगळ्या राज्यांची हँडलूम आणि सिल्क एक्स्पो कायमस्वरूपी स्टॉलच्या रूपाने असतात.
  • पैठणी प्रदर्शन- शिवाजी पार्क- गेली २६ र्वष दादरमध्ये पैठणीचं प्रदर्शन भरवत आहेत. यंदा येवल्याहून आलेले कारागीर पैठणी विणण्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. २३ ऑक्टोबपर्यंत. स्काउट हॉल, शिवाजी पार्क, दादर
  • ग्राहक पंचायत प्रदर्शन- भाटिया हॉल, २२ ऑक्टोबपर्यंत.
  • खादी भांडार- दादाभाई नौरोजी मार्ग, फ्लोरा फाऊंटनजवळ. खादी ग्रामोद्योग मंडळाचे कायम विक्रीचे दुकान.
  • केंद्रीय कुटिरोद्योग प्रदर्शनी- कायमस्वरूपी प्रदर्शन कुलाबा, मुंबई.
  • मोठय़ा शॉपिंग मॉलमध्येही छोटे स्टॉल्स लावलेले दिसतात. विक्रोळीच्या आर सिटी मॉल, मालाडच्या इनॉर्बिट मॉल, ठाण्याचा व्हिव्हियाना मॉलमध्ये राजस्थानी, गुजराती कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती बघायला मिळतात. शिवाय छोटय़ा उद्योगांचे स्टॉलही दिसतात.
  • टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे – हॅण्डलूम, हॅन्डक्राफ्ट – टेक्सटाईल आणि दागिन्यांचे प्रदर्शन – २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान.
  • सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे – सिल्क इंडिया तर्फे प्रांतोप्रांतीच्या हँडलूम आणि हँडवर्क कापड- दागिन्यांचे प्रदर्शन – १८ ते २६ ऑक्टोबर दरम्यान.
  • झा-पलूझा – रागा लॉन्स, कोरेगांव पार्क, पुणे – एकाच जागी सगळी खव्वयेगिरी, शॉपिंग, म्युझिक, आर्ट या सगळ्यांची मेजवानी देणारं प्रदर्शन २२ आणि २३ ऑक्टोबरला. किश आणि क्वर्की आर्ट हे वैशिष्टय़. पुणे, मुंबई, दिल्ली, आग्रा, इंदोर, बंगलोर आणि अमेरिकेतील कलाकारांचे स्टॉल्स आणि पंधरा म्युझिक बँड्स.
  • क्लासिक रॉक कॉफी कंपनी, कल्याणी नगर, पुणे लास्ट मिनीट दिवाळीची खरेदी करण्यासाठी घरगुती सजावटीच्या वस्तूंसह डेझर्ट्स, स्वीट बॉक्स, होम बेकर्स यांचे स्टॉल्स २१ आणि २२ ऑक्टोबरला लागणार आहेत.

भेटवस्तूही हटके

भेटवस्तूंची खरेदी दिवाळीत सर्वात जास्त केली जाते. पाडवा आणि भाऊबीज या दोन सणांच्या निमित्ताने भेटवस्तू दिल्या जातात. भारतातील भेटवस्तूंच्या बाजारपेठेतील उलाढाल जगातील सर्वात मोठय़ा गिफ्टिंग मार्केटपैकी मानली जाते. जवळपास ३० अब्ज डॉलर एवढी उलाढाल दरवर्षी या बाजारात होते. त्यातून हस्तकलेच्या वस्तूंना हल्ली मागणी वाढली आहे. भेट देण्यासाठीदेखील नेहमीच्या साचातील ठरावीक वस्तू देण्याऐवजी वेगळं काही देण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू बघून ऑर्डर करता येऊ शकते. क्राफ्टली या हस्तकलेच्या वस्तू  विकणाऱ्या ऑनलाइन मंचातर्फे यंदा ‘गिफ्टट्री’ नावाची संकल्पना मांडली आहे. याच्या माध्यमातून  हाइट ऑफ डिझाइन्स, ठग बाब, इंटेलिजंट इडियट्, इश्टाइल गल्ली, स्क्रॅपशाला अशी हटके ब्रॅण्डनेम धारण करणारे छोटे उद्योजक आणि कलाकार त्यांच्या कलाकृतींची विक्री करतात. वाराणसीच्या स्क्रॅपशाला प्रकल्पाअंतर्गत शहरी कचऱ्यापासून विविध कलाकृती बनवण्यात आल्या असून त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.