News Flash

हटके होम डेकॉर

दिवाळीसाठी सजावटीत प्रथम येतो आकाशकंदील आणि टिमटिम करणारे लाइटिंग.

कागदी मग आणि रंगीत दोरे वापरून पल्लवी सातवने सजवलेला फ्लॉवरपॉट आणि डायनिंग एरिया.

गृहसजावटीसाठी भरपूर गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. पण कमी वेळेत उत्तम गृहसजावट करता येईल आणि जास्तीचा खर्चही होणार नाही अशा अनेक वस्तू आपण घरच्या घरी बनवू शकतो. लखलखत्या प्रकाशाचा, उत्स्फूर्त तेजाचा हा सण कलात्मकही होऊ शकतो. हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंनी घराच्या भिंती, घराचा उंबरठा, प्रवेशद्वार, शोकेस, घरातील एखादा विशिष्ट कोपरा सजविला तर त्याला हटके टच मिळेल. सध्या अशा वैविध्यपूर्ण हॅण्डमेड वस्तूंची चलती आहे.

दिवाळीसाठी सजावटीत प्रथम येतो आकाशकंदील आणि टिमटिम करणारे लाइटिंग. सुतळी, पतंगाचे कागद, कागदाचे दोरे वापरून इको फ्रेंडली आकाशकंदील घरच्या घरी तयार करता येतात. पुण्याची पल्लवी सातव सांगते, ‘कागदाच्या दोऱ्यांचा वापर करून नाइट लॅम्पही बनविता येतात. कागदी मग आणि कागदाचे दोरे यांचा उपयोग करून सुंदर लाइटिंग तयार येईल. डायनिंग टेबलच्या मध्यभागी लावले तरी हे लॅप्स छान देतात. हॉल किंवा कुठल्याही खोलीच्या सीलिंगला हे नाइट लॅम्प्स मोहक लुक देतात. खोलीतील कोपऱ्यात ठेवलेल्या फ्लॉवरपॉटवर कागदी कप आणि दोऱ्यांपासून लाइटिंग करून ठेवल्यास आपल्या घराचा कोपराही अगदी उठून दिसेल.

ट्रेण्डी लाइट्स

जुन्या, एथनिक वस्तूंचा वापर करून केलेलं लाइटिंग सध्या ट्रेण्डमध्ये आहे. वाइनच्या बाटल्या किंवा रंगीबेरंगी काचेच्या बाटल्यांचा वापर करून केलेलं लाइटिंग हिट आहे. काचेच्या बरण्या, ग्लास किंवा मोठय़ा झाकणाच्या बाऊल्सचा वापरही यासाठी करता येतो. बारीक लाइटची माळ या बाटलीमध्ये टाकली की काम झालं. बाऊल्सचा वापर करून हँगिंग लॅम्पदेखील तयार करता येतो. किसणीचा वापर करून केलेल्या लाइट अ‍ॅरेंजमेंटचे फोटो ऑनलाइन जगात चांगलेच गाजत आहेत.

उभ्या आणि पाकळीच्या आकाराचे दिवे कुंभाराकडून बनवून घेऊन त्यावर रंगकाम करून वंदना आढाव यांनी दिव्यांचा नवीन आकार तयार केला आहे. या दिव्यांना तार वा दोरा बांधून टांगता येतं. मातीच्या दिव्यांपेक्षा थोडे हटके दिवे सजावटीसाठी ट्राय करायचे असतील तर काचेच्या दिव्यांचाही पर्याय आपण निवडू शकतो. काचेच्या ग्लास वा बाऊलमध्ये दिव्यांचं जेल घालून (हे जेल बाजारात रेडिमेड मिळतं) हे हटके दिवे तयार करता येतात. फायनान्स सेक्टरमध्ये काम करणारी शीतल पाटील हिने या दिव्यांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी शक्कल लढवली आहे. मोती, स्टोन, रंगवलेले खडे यांना ग्लासमधील जेलमध्ये टाकून या दिव्यांना आकर्षक बनविता येते. दिवा वा घरातील इतर वस्तू ठेवण्यासाठी मोत्याचे गालिचे बनविता येतात. दीपलक्ष्मी कुलकर्णी यांनी या कल्पनेला आणखी  आकार दिला आहे. टेबलक्लॉथ, घराचा उंबरठा सजविण्यासाठी, देवघरातील रांगोळी असाही याचा उपयोग करता येईल. तेव्हा या दिवाळीत आपल्या मनाप्रमाणे घर सजविण्यासाठी या हटके कल्पनांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.

इको फ्रेण्डली होमडेकोर

कोमल आचरेकर

घराला नवी झळाळी देणारे विविधरंगी दिवे, पणत्या, आकाशकंदील या खरेदीबरोबरच नेहमीच्या वापराच्या पण घराला नवा लुक देणाऱ्या वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल असतो. गिफ्टिंग ऑप्शन म्हणूनदेखील होम डेकॉरच्या वस्तू आवर्जून घेतल्या जातात. टेबल वेअर, टेबल मॅट्स, कुशन कव्हर, लॅम्पशेड्स, धातूवर कलाकुसर केलेले दिवे, फुलदाण्या, झुंबरं अशा सुशोभीकरणाच्या वस्तू दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करण्याकडे कल असतो. बाजारात लागलेले सेल आणि प्रदर्शनं यामधूनही या वस्तू दिसतात. यंदा गृह सजावटीच्या वस्तूंमध्ये ‘इको फ्रेंडली होम डेकॉर’चा ट्रेण्ड आहे.

देशभरातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील कारागीर अशा पर्यावरणस्नेही वस्तू, कलाकृती बनवतात. बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शनं याच सुमारास वेगवेगळ्या शहरांमध्ये बघायला मिळतात. ‘ग्राम्या’ ही महिला सक्षमीकरण करणारी संस्था ‘बनाना फायबर’पासून तयार केलेल्या वस्तू बनवते. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत हेब्बळ म्हणाले की, ‘हल्ली शहरी लोकांचा कल इको फ्रेण्डली गोष्टी घेण्याकडे वाढला आहे. बनाना फायबरपासून बनवण्यात आलेले मॅट, विंडो ब्लाइंड आणि इतर  गोष्टींसाठी देशभरातून मागणी वाढत आहे. बचत गटातील महिलांकडून हे काम करून घेतो, त्यामुळे त्यांना रोजगारही मिळतो आहे.’

इको फ्रेण्डलीसोबतच पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूदेखील क्लासी शॉपिंगच्या लिस्टमध्ये असतात. ‘हार्ट फॉर आर्ट’ ही संस्था पारंपरिक कला आणि हस्तकलेच्या वस्तू तयार करणाऱ्या कलाकारांना विक्रीसाठी माध्यम निर्माण करून देते. हार्ट ऑफ आर्टच्या विश्वस्त पद्मजा जलिहाल सांगतात, ‘यामुळे कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळतोच, शिवाय ग्रामीण भागातली पारंपरिक कला शहरी तरुणाईशी सांधली जाते.’ ईशान्य फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात या कलाकारांनी बनवलेल्या वस्तू पाहायला मिळाल्या. ईशान्य यलो रिबन प्रदर्शन नुकतंच पुण्यात पार पडलं. या प्रदर्शनाव्यतिरिक्त या वस्तू ऑनलाइन बाजारात उपलब्ध असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 4:48 am

Web Title: different home decor
Next Stories
1 दिवाळी स्ट्रीट शॉपिंग
2 वजनदार फॅशन
3 शॉपिंगची लक्झरी
Just Now!
X