13एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

काही गोष्टी अनेक वर्षे गुलदस्त्यात दडून असतात. अचानक एक दिवस त्या हाती गवसतात. अनपेक्षिततेचा हलकासा धक्का बसतो आणि खूप सारा आनंद सहज पदरात पडतो आजचा शब्दोच्चार व अर्थ याबाबतीत अव्वल आहेत.
केऑस हा शब्द आपल्यासाठी नवा बिलकूलच नाही. काय केऑस आहे नुसता! आपण अगदी सहज म्हणून जातो. पण उच्चार मात्र कधी कधी गुगली टाकतो. chaos असं या शब्दाचं स्पेिलग आहे. त्यामुळे चाओस असा कुणी उच्चार केला तर त्यात बिचाऱ्याचा काय दोष? पण खरा उच्चार आहे केऑस. केयॉसही नाही. चाओसही नाही. तर केऑस. मध्यंतरी याच शब्दाबद्दल घडलेला किस्सा सांगायचा मोह आवरत नाही. ट्रेनमधल्या काकू दुसऱ्या काकूंना सांगत होत्या. सोसायटीत मुलांचा नुसता चाओस चाओस. म्हणजे काय? याचा विचार केल्यावर लक्षात आलं की मुलांची चावचाव हे मराठी आणि केऑसचं चाओस हे इंग्रजी मिसळून चाओस चाओस हे रूप प्रत्यक्षात आलं आहे. मायमराठी व इंग्लिश आंटी किती सख्य बाळगून आहेत याचा साक्षात्कारच झाला. बरं हे उच्चार दुरुस्त करणं म्हणजे महाकठीण काम. आली मोठी शहाणी! हे समोरच्याच्या मनातले भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतात. अशा वेळी तुमचा उच्चार चुकला असं न सांगता, ‘हो ना! मुलांचा केऑस म्हणजे केऑसच’ असा उच्चार ऑटोकरेक्ट करावा. त्यातून समोरच्याला न दुखवता त्याची टय़ुबलाइट पेटली तर पेटलीच.
उच्चारानंतर गोड धक्का बसतो तो अर्थाच्या बाबतीत. केऑस म्हणजे गोंधळ. एखाद्या गोष्टीबाबतची अस्वस्थता. हा मूळचा ग्रीक शब्द. ग्रीकमध्ये वर्ल्ड ऑफ केऑस ही संकल्पना आहे. इथे केऑस म्हणजे अंतराळातील पोकळी. या अंतराळातील आदीम देवता व तिचं राज्य म्हणजे वर्ल्ड ऑफ केऑस. पण हे राज्य म्हणजे पौराणिक संकल्पना. पृथ्वीच्या जन्माआधीची.. तेव्हा पृथ्वीच अस्तित्वात नव्हती. जमीन,समुद्र, हवा सारे एकमेकांत मिसळलेले होते. पृथ्वीचा घनाकार नव्हता. द्रव्यरूप समुद्र नव्हता. पारदर्शी हवा नव्हती. चंद्र-सूर्य काही नव्हते. गार नाही, गरम नाही, आद्र्र नाही अशी ही काळोखी पोकळी. तिचा तो देव आणि त्याचे ते विश्व, वर्ल्ड ऑफ केऑस. अशी ही ग्रीक संकल्पना. त्या गोंधळलेल्या जगाचं नावच आपण गोंधळ या संकल्पनेकरिता उचललं. आपल्याकडे कशी त्रिशंकू अवस्थेची संकल्पना पौराणिक संदर्भ धारण करून अवतरते तसेच हे वर्ल्ड ऑफ केऑस.
शब्दच गोंधळ या कल्पनेशी जोडलेला आहे, त्यामुळे उच्चारातल्या गोंधळाला तो जागतो. काहींसाठी गोंधळाचा ठरतो. तोच केऑस दूर करून चाओस व केयॉस बाजूला ठेवू या आणि आपल्या बाबतीत वर्ल्ड ऑफ केऑस अवतरणार नाही याची काळजी घेऊ या.

viva.loksatta@gmail.com