बहीणभावांचं नातं हे टॉम अँड जेरी सारखं असतं. टॉम जेरीला मारण्यासाठी अनेक मजेशीर  कट कारस्थानं करतो पण चतुर जेरी ही कारस्थानं नेहमी टॉमवरच उलटवतो. भावाबहिणींमधला हा शह-काटशहचा खेळ घराघरांतून पहायला मिळतो. सणाच्या दिवशी तर या लुटुपुटीच्या भांडणाला आणखीनच रंग चढतो. पण कितीही भांडण झालं तरी भाऊबीजेच्या दिवशी त्याच्या आवडीची वस्तू घेण्यापासून त्याच्या आवडीचा खाऊ करण्यापर्यंत सगळे लाड पुरवण्यासाठी बहिणी कंबर कसतात. नेहमीच्या सणासुदीच्या या चित्रात सध्या एक बदल दिसतो आहे. बहिणींप्रमाणेच हल्ली अनेक घरांमधून बंधुराजही तिच्या आवडीचा खाऊ बनवण्यासाठी स्वयंपाकघरात नवनवे प्रयोग करताना दिसतात. या दिवाळीत बाहेरून पदार्थ आणून ते ताटात वाढण्यापेक्षा चटकन काही हटके पदार्थ करून तुमच्या भावंडांना खूश करता येईल अशा काही रेसिपीज..

गुलाबजाम हा पदार्थ कुठल्याही मिठाईच्या दुकानात सहज मिळतो किं वा घरच्या घरीही रेडिमेड पाकीट आणून तयार करता येतात. या गुलाबजामचा वापर करून काही फंडु रेसिपीज करता येतात. यातलीच एक म्हणजे ‘गुलाबजाम फ्लॅबे’. तयार गुलाबजाममध्ये रम किंवा ब्रॅंडी ओतून एक काडी पेटवून द्या. आणि सिझलिंग गुलाबजाम फ्लॅबे सव्‍‌र्ह करा. दुसरा आणखी एक धमाल प्रकार म्हणजे ‘रबडी गुलाबजाम’. गुलाबजाममधून कापावेत. एका पेल्यात खाली ताज्या रबडीचा थरामध्ये कापलेले गुलाबजाम व वरती पुन्हा रबडी ओतून डिश सव्‍‌र्ह करावी. स्टार्टर म्हणून सव्‍‌र्ह करता येईल असा प्रकार म्हणजे ‘गुलाबजाम लॉलीपॉप’. गुलाबजामना काडी टोचून ते गोड बडीशोपमध्ये हलकेच घुसळावेत. तयार लॉलीपॉप तुम्ही येता-जाता सहज तोंडात टाकू शकता.

गुलाबजामबरोबरच आणखी एक गोड पदार्थ सणाच्या दिवशी घरात हमखास आढळतो तो म्हणजे श्रीखंड. या श्रीखंडाचा वापर करून अनेक गमतीजमती करता येतात. तयार कप केकवर मिक्स ड्रायफ्रूड श्रीखंड किंवा आम्रखंडाचा वेटाळावं. त्यावर हलकेच वेलचीची पूड घातली की झाले ‘श्रीखंड कप केक’ तयार. ‘बुरवणी’ हाही पदार्थ यानिमित्ताने करून बघता येईल. ५०० ग्रॅम श्रीखंड एका बाऊलमध्ये ओतावे. त्यात ४ वाटय़ा वेगवेगळ्या ताज्या फळांचे तुकडे, एक कप क्रीम व एक वाटी थंडगार दूध घालून मिश्रण एकजीव करावं. तयार मिश्रण एक तास फ्रीजमध्ये ठेवून मग सव्‍‌र्ह करावे.

‘रसगुल्ला विथ आईस्क्रीम’ तयार करण्यासाठी रसगुल्ले मधून कापावेत. एका  बाऊ लमध्ये खाली व्हॅनिला आईस्क्रीममध्ये रसगुल्ले त्यावर मिक्स फळांचे तुकडे त्यावर किसलेले चॉकलेट, टुटीफुटी आणि वर पुन्हा आईस्क्रीम व चेरी असे थर रचून मग डिश सव्‍‌र्ह करावी.  ‘चॉकलेट रमबॉल्स’ हाही सहज करता येण्याजोगा पदार्थ आहे. तयार चॉकलेट बॉल्स आणून त्यावर रम ओतून, चॉकटेलची शेव टाकून हे चॉकलेटी बॉल्स सव्‍‌र्ह करावेत. ‘पान मसाला रबडी’ हा तर रबडी आणि पान अशा दोन टोकाच्या चवींना एकत्र आणणारा पदार्थ आहे. तयार रबडीमध्ये पान मसाला, अर्धा वाटी गुलकंद , दोन मसाला सुपारी विरहित पान एकत्र करून रबडी सव्‍‌र्ह करावी. पानापासूनच करता येणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ‘पान शॉट’ (मुखवास). दोन तयार मसाला गोड पान, अर्धा वाटी गुलकंद, दोन वाटी व्हॅनिला आईस्क्रीम आणि बर्फ मिक्सरमधून एकत्र करून पान शॉट छोटय़ा ग्लासमध्ये थंड असतानाच सव्‍‌र्ह करा. गोड थोडं जास्त झालं असेल तर ‘इडली मंचुरीयन’ हा चायनीज पदार्थ करायला हरकत नाही. तळलेली इडली आणि मंच्युरीअन बॉल्स एका वाडग्यात एकत्र करून त्यावर मंचुरीयनची तयार गरम गरम ग्रेव्ही ओतून हे स्टार्टर सव्‍‌र्ह करता येईल.

मिठाईला द्या थंडगार तडका

दिवाळीत घरोघरी फराळ बनवला जातो. त्यात भेटीला येणारे पाहूणे मिठाईचे डब्बे घेऊन येतात. अशा वेळी घरी आलेल्या रेडिमेड मिठाईचं काय करायचं, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. ही समस्या सोडवायचा एक छोटासा पण युनिक आणि यम्मी मार्ग आहे. घरात आलेल्या सर्व मिठाईचे बारीक तुकडे भांडय़ात एकत्र करा. त्या तुकडय़ांवर कोणत्याही आवडत्या फ्लेवरच्या आईस्क्रीम पॅकमधील आईस्क्रीम ओतून मिठाई व आईस्क्रीम एकजीव करा. रेफ्रिजरेटर मध्ये हे मिठाई आईस्क्रीम दीड तास सेट करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर हे आईस्क्रीम सव्‍‌र्ह करा. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई एकत्र केल्याने या आईस्क्रीममधून तीन-चार चवी एकाच घासात खवय्यांच्या जिभेवर रेंगाळतील.

स्ट्रॉबेरी चीज केक

साहित्य : बटर ५० ग्रॅम, डायजेस्टिव्ह बिस्कीटचा चुरा १०० ग्रॅम, क्रीम चीज १०० ग्रॅम, पनीर चक्का १०० ग्रॅम, साखर ७५ ग्रॅम, २-३ चमचे लेमन ज्युस, १० ते १५ फ्रेश बारीक कापलेल्या स्ट्रॉबेरी

कृती : एका भांङय़ात वितळलेलं बटर व डायजेस्टिव्ह बिस्किटांचा चुरा एकजीव करून घ्या. दुसऱ्या भांडय़ात क्रीम चीज, चक्का, साखर , फेटलेले अंडे, लेमन ज्यूस मिसळून  घ्या. ते मिसळताना या मिश्रणात हवा जाणार नाही याची काळजी घ्या. तयार केलेल्या बिस्किटांच्या पल्प मोल्ङमध्ये स्ट्रॉबेरी पसरवून त्यावर हे तयार चीजचे म्रिश्रण घालावे व मायक्रोवेव्हमध्ये १८ ते २० मिनिटे ठेवावे.

बिस्किटांची बाकर वडी

साहित्य : मारी बिस्कीट १ पुडा, खारे बिस्कीट १ पुडा, कोथिंबीर, बेकिंग पावडर, दाण्याचे कूट १ वाटी, आलं लसूण पेस्ट १ चमचा, मीठ, लिंबाचा रस, साखर, सुकं खोबरं, तेल

कृती : बिस्किटांचा चुरा करून त्यात पाणी, तेल व अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून त्याची कणिक मळा. या कणकेच्या पोळ्या लाटा. एक बाऊ लमध्ये दाण्याचे कूट, साखर, मीठ, कोथिंबीर , लिंबाचा रस ,आलं- लसूण पेस्ट, सुकं खोबरं एकत्र करा. हे मिश्रण लाटलेल्या पोळ्यावर पसरवून त्याची लांब वळकटी करा. या वळकटीचे छोटे छोटे तुकडे करा. एका भांडय़ाला आतून तेल लावून हे तुकडे उकडवण्यासाठी सज्ज करा. शिटी काढलेल्या कुकरमध्ये खाली पाणी घालून बाकरवडी २५ मिनिटं उकडवा. अथवा ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर २० मिनिटे बेक करा.

गुलाबजाम मँगो चीज केक

साहित्य : तयार गुलाबजाम – १० (३ बाजुला वगळावे), चक्का – १ कप, २०० ग्रॅम क्रीम चीज, मॅंगो पल्प – १ कप, दीड वाटी कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा, २-३ टेस्पून कडेंन्स्ड मिल्क, १ टेस्पून जिलेटीन पावडर, पिस्ता पूड – २ चमचे, वितळवलेलं बटर – पाव वाटी, गरम पाणी

कृती : दीड वाटी डायजेस्टीव्ह बिस्किटांच्या चुऱ्यात वितळवलेलं बटर व गुलाबजामचा पाक एकजीव करा. तयार ७ गुलाबजाम हलकेच कुस्करून घ्या. एका बाऊ लमध्ये क्रीम चीज, कुस्करलेले ७ गुलाबजाम, आंब्याचा पल्प, चक्का, कडेंन्स्ड मिल्क एकजीव करावे. ३ टेस्पून गरम पाण्यामध्ये १ टेस्पून मँगो जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. आता हे जिलेटीन मिश्रित पाणी वरील तयार मिश्रणात घालून बीटरने बीट करुन घ्यावे व तयार टीन फ्रीजमध्ये १ तास सेट होण्यासाठी ठेवावे. वगळलेले ३ गुलाबजाम मधून अर्धे करावेत. एक तास पूर्ण झाल्यावर सेट झालेल्या मिश्रणावर थोडया थोडया अंतरावर अर्धे गुलाबजाम गोलाकार लावावे व पुन्हा ३ तास फ्रिजमध्ये केक सेट होण्यासाठी ठेवावा.

viva@expressindia.com