कॉलेजच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं उलगडलेलं विद्यार्थ्यांचं मनोगत.

..अखेर फेअरवेलचा दिवस उद्या उजाडणारेय. गेल्या वर्षी फक्त कल्पना केली होती सीनिअर्सना फेअरवेल देताना की, ‘पुढल्या वर्षी आपण या जागी असू’. मग स्वत:चीच समजूत घातली होती की, ‘अरे, वेळ आहे अजून. अख्खं वर्ष जायचंय’. पण वाळू हातातून जाताना निसटताना कळत नाही, तस्संच वेळेचं झालं आणि ‘तो दिवस’ उद्यावर येऊन ठेपलाय. फेअरवेल.. निरोप समारंभ.. त्यातपण मज्जा अशी की, ‘फेअरवेल’ म्हणताना ओके वाटतंय, चिल वाटतंय; पण ‘निरोप समारंभ’ म्हणताना त्यातला हळवेपणा जाणवून सॉलिड सेंटी व्हायला होतंय. सारखं स्वत:ला बजावलं जातंय की, ‘बी पॉझिटिव्ह’. कालच ‘इन्स्टा’वर दुसऱ्या कॉलेजमधल्या ग्रुपचे फोटो पाहिले. कसले ‘कुल’ दिसत होते सगळे जण. आपणही तस्सं व्हायला पाहिजे. अर्थात नंतर काहींचे स्टेट्स चेक केल्यावर कळलं की, तेही सेंटी झालेच होते..

कॉलेजलाइफ ही म्हटलं तर एक अजीबोगरीब चीज असते. त्या परीक्षा, ती बोअरिंग लेक्चर्स, असाइनमेंट्स, व्हायवाच्या कचाटय़ांतून सुटका कधी होतेय, याची पाच र्वष आतुरतेनं वाट पाहिली जाते. आता ‘तो क्षण’ उद्यावर येऊन ठेपल्यावर ते सगळं मिस करणारोत आपण असं जाणवू लागलंय. तो लाडका कॉलेजचा कट्टा, तो अण्णाकडचा कटिंग, ते मास बंकिंग, ते वरचेवर पिक्चर टाकणं, कॉन्ट्रिब्युशन काढून केलेल्या ‘मॅक’मधल्या पाटर्य़ा, ती अफेअर्सवरूनची चिडवाचिडवी, परीक्षेच्या आठवडाभर आधी मारलेले रट्टे.. ‘अरे यार, पुन:पुन्हा त्या आठवणींच्या किल्लय़ात हरवायला होतंय’.. खरंच का त्या आठवणी झाल्यात?.. आत्ता परवापर्यंत तर सगळं व्यवस्थित चालू होतं ना.. काय चाल्लंय काय हे?.. मना.. आवरा..

खरं तर निरोप समारंभ म्हणजे कॉलेज आहे तिथंच असणारेय. आपण पदवी घेऊन बाहेर पडणारोत. ‘अमुक वर्षांची बॅच’ असं एक नवं लेबल आपल्या ओळखीमागं लागणारेय किंवा मग पुढच्या शिक्षणासाठी किंवा त्यानंतर नोकरीच्या सीव्हीमध्ये पदवी अमुक विद्यापीठ तमुक कॉलेज, अशी माहिती टाइप करायला लागणारेय. प्रोफेसर्सचा ओरडा खावा लागणार नसला तरी कॉलेज लाइफहून मोठ्ठय़ा असणाऱ्या व्यावहारिक जगाशी दोन हात करावे लागणारेत. त्यासाठी कॉलेजमध्ये गिरवलेले वेगवेगळ्या टप्प्यांवरचे धडे उपयोगी पडणारेत. पुढल्या करिअरचा विचार करताना मोठं झाल्यासारखं वाटतंय नि जबाबदारीचं टेन्शनपण येतंय. फ्रेण्ड्सना प्रत्यक्ष भेटता येत नसलं तरी सोशल मीडियामुळं आम्हाला ‘व्हच्र्युअली टच’मध्ये राहता येईल, हे एक बरं आहे. ‘फीलिंग.. हुश्श!!’

कसल्या मिक्स-रिमिक्स फीलिंग्ज आहेत या.. हा बघा ‘कीप इन टच’चा मेसेज आलाय ग्रुपमध्ये आत्ताच.. उद्यापर्यंतही थांबायची तयारी नाहीये कुणाची.. आपणच आपले सेंटी होतोय.. आयुष्याच्या नवीन फेजची सुरुवात मुळीच डळमळीतपणं व्हायला नकोय. त्यासाठी ‘बी स्ट्राँग’. दहावीतही असंच झालं होतं की.. हा दिवस येतोच प्रत्येकाच्या आयुष्यात. तो मनसोक्त अनुभवायला हवा. ‘आत्ताच मेसेज आलाय, सेल्फीस्टिक आण आठवणीनं’.. लगेच होकार कळवला. तयारीला लागलं पाहिजे उद्याच्या.. ‘अरेच्चा आणखी एक मेसेज.. चारोळीच पाठवलेय की – ‘समोरचं मोकळं आकाश, नव्या आकांक्षांचा सहवास, वळणांची असे वाट, द्यावा तसा लाभे घाट.’ क्या फिर से सेंटी कर दिया भाई!

– राधिका कुंटे