News Flash

आऊट ऑफ फॅशन : डूल पोरी डुला..

सेल्फी-परफेक्ट लुकसाठी इअररिंग्स हा मस्त पर्याय ठरू लागला आहे.

सेल्फी-परफेक्ट लुकसाठी इअररिंग्स हा मस्त पर्याय ठरू लागला आहे.

कानातले डूल हा तसा भारतीय दागिन्यांमधील अविभाज्य घटक आहे. पण सध्या हेच डूल किंवा इअररिंग्स जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यामागे फक्त एक दागिना म्हणून त्याचं महत्त्व नाही, तर सेल्फी-परफेक्ट लुकसाठी इअररिंग्स हा मस्त पर्याय ठरू लागला आहे. साहजिकच इन्स्टापरफेक्ट फोटोजसाठी हा दागिना तरुणींना खुणावू लागला आहे.

‘जरा एक मिनिट हं..’ आपल्या मर्दानी शैलीत डायलॉगबाजी करणाऱ्या नायकाच्या मागून एक हळुवार आवाज येतो. तो त्याच मिजाशीत मागे वळतो आणि तिला पाहताच थबकतो. पायातील नाजूक चप्पल मग हवेच्या झुळकेसोबत उडणारा तिचा दुपट्टा आणि चेहऱ्यावर आलेली केसांची नाजूक बट कानामागे घेताना चमकणारे तिच्या नाजूक कानातले डूल.. ही पाहताच बाला कलिजा खलास झाला स्टाइल ही नायिकेची सिनेमातील एंट्री वर्षांनुवर्ष हिट ठरत आली आहे. या अख्ख्या लुकमध्ये कॅ मेरा जेव्हा तिच्या कानातील डुलावर येऊन स्थिरावतो तेव्हा तिचा चेहरा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचते. बरं या डुलांचं काम इथपर्यंत येऊन थांबत नाही. नायिकेने मानेला नाजूक झटका दिला तरी तिच्या कानातील हलणाऱ्या या डुलांमुळे नायकाच्या दिलाची घंटी वाजू लागते. नायिका निघून जाताना कधी तरी मुद्दाम तर कधी तरी चुकून एखादं डूल पडतं आणि नायकाकडे तिची निशाणी म्हणून राहतं. कधी तरी हेच डूल परत करणं हे त्यांच्या भेटण्याचं निमित्त ठरतं. त्यामुळे या छोटय़ाशा डुलाचं सिनेमॅटिक महत्त्व भरपूर आहे. अर्थात फक्त सिनेमात नाही, पण प्रत्यक्षातसुद्धा कानातले डूल किंवा इअररिंग्स यांचं स्त्रीच्या आयुष्यात जे महत्त्व आहे त्याला इतर कोणत्याच दागिन्याची सर नाही. लहानपणी कानाच्या पाळीला भोक पडल्यावर त्यात घातलेलं कानातलं स्त्रीची आयुष्यभर साथ करतं. काळानुरूप, वयानुसार त्याचं स्वरूप, स्टाइल सातत्याने बदलत राहते. पण एखाद वेळेस अंगभर दागिना नसला तरी चालेल.. कानातलं मात्र हवंच असतं. बरं आपला मुद्दा कानातल्या डुलाचं महत्त्व हा अजिबात नाही. कारण ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आपण यापुढे जात या डुलांचं सोशल मीडियावरील वाढतं महत्त्व यावर बोलणार आहोत. अगदी हा लेख वाचताना इन्स्टाग्रामवर डोकावून बघा #ीं११्रल्लॠ२ या हॅशटॅगखाली किती तरी भन्नाट फोटोज पाहायला मिळतील. वापरायला सोप्पा आणि असंख्य पर्याय असलेला हा दागिन्याचा प्रकार जगभरातील तरुणींमध्ये लोकप्रिय होतोय, कारण कानातल्या डूलला फोकस ठेवून काढलेले फोटोज सहसा कधीच चुकत नाहीत. इतकंच नाही तर ते तितकेच आकर्षक दिसतात आणि ‘लाइक्स’ खेचतात.

कानातील चमकी, मध्यम डूल, मानेपर्यंत पोहचणारी वेल किंवा लांब डूल, केसामध्ये जाणारी वेल, इअरकफ आणि आता नव्याने येऊ  घातलेले स्टेटमेंट इअररिंग्स कानातल्या डुलाचे किती तरी प्रकार आहेत. यांची खासियत सांगायची म्हणजे वजनाला हलके (अर्थात आपल्याकडे जड डुलांची उदाहरणं कमी नाहीत. आणि त्यांचा मोहही आवरता येतच नाही. पण रोज घालायचे इअररिंग्स मात्र हलके आणि सुटसुटीत असणंच आपण पसंत करतो नाही का?) डूल वापरायला सुटसुटीत कारण एकदा कानात घातले की बांगडय़ा नेकपीससारखं त्यांना कामाच्या मध्ये सांभाळत बसायची गरज नसते. ते निमूटपणे आपल्या जागेवर शांत असतात. त्यात त्यांना घुंगरू असतील तर अधूनमधून होणारा नाजूक छुंनछुंन आवाजसुद्धा सुखावणारा असतो. संभाषणाच्या वेळी केसाची बट सावरताना त्यांचं होणारं दर्शन सहज कोणाचंही लक्ष वेधून घेतं. ड्रेस साधा असेल, तरी छान कानातलं पटकन लक्ष वेधून घेतं. सोबत इतर कोणताही दागिना नाही घातला तरी चालतं. ऑफिस ते सण सगळीकडे इअररिंग्स वापरता येतात. बरं सेल्फीप्रेमी असाल, तर या डुलांचा परिणामकारक वापर कसा करायचा हे तर माहीत असेलच. कानातलं डूल दाखवायचं म्हणजे साइड व्ह्य़ू.. साहजिकच चेहरा लहान दिसतो. जितकं कानातलं मोठं तितका फोकस त्यावर अधिक, म्हणजे बाकीचा फाफटपसारा कमी होतो. अगदी कपडे, मेकअप यांची चिंता करायची गरज नसते. चेहऱ्याच्या थेट जवळ असल्यामुळे फोटोमध्ये चेहऱ्यावरील भाव उठून दिसतात. अगदी कित्येक सेलेब्रिटी किंवा फॅशन ब्लॉगर याच कारणामुळे बडे इअररिंग्स आवर्जून वापरतात. फक्त भारतातच नाही, तर जगभरात हा ट्रेण्ड पाहायला मिळतोय.

यामुळे साहजिकच सध्या इअररिंग्सचं मार्केट वाढतंय. त्यामुळे ऑनलाइन वेबसाइट्सवर नजर टाकली तर ज्वेलरीच्या आणि त्यातही इअररिंग्स विकणाऱ्या ज्वेलरी ब्रॅण्ड्सची संख्या कमालीची वाढते आहे. अगदी ट्रेनने प्रवास करताना, बाजारात फेरफटका मारताना, सहज फिरताना ‘आवडलं म्हणून घेतलं’ अशा इअररिंग्सची संख्या किती आहे हे आठवून पाहा. अगदी नव्या पद्धतीच्या कन्टेम्परी डिझाइन्सपासून ते ट्रायबल, एथनिक इअररिंग्सपर्यंत यात प्रचंड विविधता पाहायला मिळेल. सोने, चांदी, प्लॅटिनमच्या इअररिंगसोबतचं ऑक्सिडाइज चांदी, मेटल, जर्मन सिल्व्हर अशा विविध धातूंमध्ये इअररिंग्स उपलब्ध आहेत. त्यात खडे, मोती, मणी, विविध रंग, कापड, धागे, टॅसल अशा किती तरी साहित्यांचा वापर करता येतो. पुन्हा यांना लुक्सच्या मर्यादा फारच कमी आहेत. अगदी गाऊनवरसुद्धा पारंपरिक डूल घालता येतात त्यामुळे प्रयोगांना अंत नाही. सध्या स्वस्तात मस्त इअररिंग्सना मागणी आहेच पण ब्रॅण्डेड इअररिंग्सची मागणीही तितकीच वाढते आहे. विशेष म्हणजे कित्येकदा ब्रॅण्डेड दुकानांमधील फॅन्सी इअररिंग्स आणि चांदी, सोन्याचे इअररिंग्स यांच्या किंमतीमध्ये फारसा फरक उरलेला नाही. त्यामुळे थोडय़ा महागडय़ा इअररिंग्समध्ये गुंतवणूक करण्याकडेही तरुणींचा कल असतो. कानाला पिअरसिंग करण्याकडेही कित्येकींचा कल असतो. यामुळे इअररिंग्स वेगवेगळ्या पद्धतीने घालता येतात. अमेरिकेतील कित्येक ज्वेलरी ब्रॅण्ड इअररिंग्सच्या आकारानुसार तीन-चार ठिकाणी पिअरसिंग करून देतात. थोडक्यात आता कपाटातील इअररिंग्स कलेक्शन वाढविण्याची वेळ आली आहे. लहानपणी लहानशी मुंगी हत्तीपेक्षा सरस कशी ठरते, याच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता दागिन्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलं नाही, पण ते जर बोलते झाले, तर नेकपीस, बांगडय़ा या मोठय़ा दागिन्यांना इअररिंग्सच्या आजच्या महत्त्वाचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरं.

मृणाल भगत viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 1:08 am

Web Title: earring become the favorite trend for perfect selfie
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : प्रेस्टिज
2 Watch लेले काही : हरवलेले आणि सापडलेले!
3 ‘ताण’लेल्या गोष्टी : गरज की लोभ?
Just Now!
X