News Flash

नृत्यसंगीताचा डिजिटल अवतार

EDM हा असाच एक संगीत प्रकार, जो गेल्या चार-पाच वर्षांत खूप प्रसिद्ध झाला आहे.


12नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

डिसेंबर हा महिना, विशेषत: पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये संगीताच्या दृष्टीने सर्वात जास्त विविधतेने नटलेला असा म्हणावा लागेल. कारण या महिन्यात रशीद खान, अजय चक्रवर्ती, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांकडून लाइव्ह कार्यक्रमांद्वारे भारतीय अभिजात संगीताचा आस्वादपण घ्यायला मिळतो आणि विविध प्रकारच्या बॅण्ड्सकडून अनेक नवीन पद्धतीच्या संगीताचेसुद्धा रसग्रहण करायची संधीदेखील सध्या मिळतेय. EDM हा असाच एक संगीत प्रकार, जो गेल्या चार-पाच वर्षांत खूप प्रसिद्ध झाला आहे. उत्तरोत्तर याची प्रसिद्धी वाढत आहे. विशेषत: पार्टी, नाच-गाणे वगैरेमध्ये ज्यांना खूप रुची असते त्यांच्यासाठी खास बनलेला हा संगीत प्रकार. पाश्चात्त्य देशांमध्ये आज सर्वात जास्त चालणारा हा प्रकार भारतातसुद्धा हळूहळू स्थिरावत आहे.
ईडीएम म्हणजे Electronic Dance Music. थोडक्यात म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून खास नाचण्यासाठी केलेली गाणी. याचा अर्थ पाहता खरे तर हा प्रकार काही फार नवा वाटत नाही, पण साधारण पाच-सहा वर्षांपूर्वीपासून या प्रकाराने EDM हे नाव धारण केले. नाही म्हणता तोपर्यंत जे डान्स म्युझिक हे डिस्कोच्या बीट्सवरचे, एकसुरी असे होते, त्यात अनेक प्रयोग EDM या मथळ्याखाली घडू लागले. त्यातून घरच्या घरी डिजिटल तंत्रज्ञान सहज उपलब्ध होऊ लागल्याने अनेक ‘किडेबाज’ या प्रकाराकडे वळले आणि हे नृत्य-संगीत बऱ्यापैकी वैविध्यपूर्ण झाले. जगातील विविध, सापडेल त्या, आपल्याला कल्पना करवणार नाही अशा, ज्यांचा संगीताशी दूरदूरचा संबंध नाही अशा आवाजांचा वापर ‘ईडीएम’मध्ये होऊ लागला. सतत चालू राहणाऱ्या डान्सबीट्सला धक्कातंत्राचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. असाच एक किडेबाज इसम म्हणजे श्रीयुत स्क्रीलेक्स (skrillex). हा डीजे ‘ईडीएम’ जगताचा बादशहा मानला जातो. त्याचा सर्वात हिट अल्बम म्हणजे Jack U स्क्रीलेक्सचे वैशिष्टय़ म्हणजे त्याने विविध आवाज कल्पकतेने वापरलेच, पण त्या आवाजांवर विविध डिजिटल संकर करून नवनवीन आवाज निर्माण केले. तसेच त्याने आपले संगीत हे केवळ नृत्यप्रधान, तालप्रधान ठेवले नाही. नृत्यसंगीताची नेहमीची लय सोडून नवीन रस्ते शोधायचाही प्रयत्न केला. जस्टीन बिबरबरोबरचे त्याचे Where are you हे गाणे याचे उत्तम उदाहरण आहे. यातल्या नुसत्या गाण्याचा विचार करता हे एक विरहगीत, प्रेमगीत आहे. पण त्यात स्क्रीलेक्सने अशा काही गोष्टी घातल्या आहेत, की कुठल्या एका संगीत प्रकारात या गाण्याला पकडता येत नाही. याच्या प्रत्येक गाण्यात असाच काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न दिसतो. कुठल्या गाण्यात मधूनच स्ट्रिंग्ज ऐकू येतात, कुठे पियानो येऊन जातो, कुठे आफ्रिकन तालवाद्ये वाजतात. Ragga bomb या गाण्याच्या शेवटी तर चक्क सारंगीसदृश वाद्यावर रागदारीचा आलाप वाजून जातो. अशा अनपेक्षित गोष्टींचा वापर हाच या संगीत प्रकाराचा गाभा आहे असे मला वाटते. एखाद्या लयीतून दुपटीत मग चौपटीत जाऊन आता लय अजून वाढत जाईल असे वाटत असताना ती एकदम निमपटीत आणणे आणि हे करताना प्रत्येक वेळी धक्का मिळेल याची काळजी घेणे वगैरे गोष्टीत स्क्रीलेक्स भलताच निष्णात आहे. Beats knoin, jungle bae, try it out, make it bun dem, आणि स्क्रीलेक्सचे पहिले गाणे scary monsters and nice spirits ही काही निवडक गाणी ऐकून बघा.
मी मागच्या आठवडय़ात ‘रॉक’बद्दल म्हणालो, तसे या संगीतातलेसुद्धा नक्की काय ऐकायचे हे कळल्यावरच याची मजा येते. अन्यथा यातले शब्द, यांचे व्हिडीओ यावर जाऊन आपण एऊट ला संस्कृतीबाह्य़ ठरवतो. अर्थात EDM ऐकले नाही तर आपले काही बिघडणार नाही. मीसुद्धा या प्रकाराचा मोठ्ठा चाहता वगैरे नाही; पण यात काही नव्या गोष्टी आहेत हे नक्की आणि त्या मजेशीर आहेत हेही तितकेच खरे आणि EDM असो वा आणखी काही, प्रत्येक नवीन संगीत प्रकार हा संगीताच्या कक्षा आणि त्यानिमित्ताने व्यक्त होण्याच्या शक्यता वाढवत असतो हेसुद्धा मान्य करावेच लागेल.

15
डिस्को बार ते कॉन्सर्ट

जे नृत्य-संगीत हे केवळ पार्टीची ठिकाणे, डिस्को बार्स इत्यादी ठिकाणांपुरतेच मर्यादित होते, ते स्क्रीलेक्ससारख्या डीजेंमुळे मोठमोठय़ा कॉन्सर्ट्सचा विषय झाले. अशा अनेक कॉन्सर्ट्स ‘यूटय़ूब’वर आहेत. त्या बघितल्याशिवाय तुम्हाला या संगीत प्रकाराच्या प्रसिद्धीचा अंदाज येणार नाही. केवळ संगीताचं नाही, तर नेत्रदीपक रोषणाई, ‘लेझर शो’नी युक्त असे हे कार्यक्रम बघायला हजारो लोक गोळा होतात आणि एकत्र नाचतात. एवढय़ा प्रचंड जनसमुदायाला दीड-दीड, दोन-दोन तास नाचवत ठेवण्याची क्षमता या संगीत प्रकारात नक्कीच आहे. अर्थात ते लोक काय कपडे घालतात (किंवा घालत नाहीत), संगीताची सोडून अजून कुठल्या नशेच्या अमलाखाली असतात, याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. आपल्याला बुवा संगीताची नशा पुरते. आपलं बुवा ठरलंय- चांगल्या गोष्टींकडे बघायचं, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं.. आपापल्या संस्कृतीच्या कक्षेत राहून प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायचा; नाही का?

viva.loksatta@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:13 am

Web Title: electronic dance music
टॅग : Viva,Viva News
Next Stories
1 फ्लावर
2 युरोपीय खानपान
3 बॉटम हेवी फिगर
Just Now!
X