पंकज भोसले

कोणत्याही संगीत मैफलीमध्ये साथसंगत ही मुख्य स्वरकाराहून वरचढ असलेली चालत नाही. हा नियम मैफलीमध्ये पाळला जात असला, तरी प्रायोगिक संगीतकारांनी त्याला मोडून उत्तम गाणी देण्याचा कायमच प्रयत्न केलेला दिसतो. भारतीय चित्रसंगीताच्या पटलावर सलील चौधरी या संगीतकाराने साठच्या दशकात जितके वाद्यावळीचे यशस्वी प्रयोग केले, तसे नंतरच्या संगीतकारांना आधुनिक यंत्रणेतही करता आले नाही. छाया या चित्रपटातील त्यांच्या ‘आँखोमे मस्ती शराब की’ किंवा ‘उसने कहा था’ चित्रपटातील ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए’ या गाण्यात त्यांच्यातल्या काळापुढल्या संगीतकाराची झलक दिसेल. वाद्यावळीचे वर्चस्व हे त्यांच्या अनेक गाण्यांचे सौंदर्य म्हणून समोर येते. पुढे आर.डी. बर्मन यांनी गिटारवरील सस्पेन्शन कॉर्ड्सचा वापर करून बॉलीवूड संगीताला श्रवणीय गाण्यांची मेजवानी दिली. ए. आर. रेहमान याची अख्खी कारकीर्दच वाद्यावळीचा विचित्र वापर करण्यातून बहरली. ‘हम्मा हम्मा’ गाण्यात अनेक सनयांनी केलेला एकत्रित परिणाम, ‘स्वदेस’ गाण्यासाठी सनईची निवड आणि ‘दिल हे’ छोटासाचे सिंथेसायझरवरचे ऱ्हिदम यांच्या प्रभावाने गाणी कानांना मोहरून टाकतात. इंग्रजीत अशी वाद्यावळ प्रयोगी गाणी बरीच आहेत.

एमटीव्हीच्या आगमनानंतर आपल्याकडे सकाळी इंग्रजी क्लासिक गाण्यांचा तासभर रतीब ओतला जाई. भारतीय नवसाक्षर श्रोत्यांना घडविण्यासाठी रेडिओवरच्या नाइंटीवन पॉइंट फाइव्ह नावाची वाहिनीही (त्या काळी) चोवीस तास इंग्रजी अभिजात गाणी, रंजक माहितीसह सादर करीत असे. या दोन्ही ठिकाणी ‘टॉप गन’ सिनेमातील ‘टेक माय ब्रेथ अवे’ हे गाणे जवळजवळ रोजच ऐकायला मिळे. प्रयोग म्हणून हे गाणे एकदा ऐकले, तरी त्या गाण्यासोबत मुद्दाम ठेवलेला बास इफेक्ट आपला बराच काळ पिच्छा सोडणार नाही. या गाण्याला ऑस्कर-गोल्डन ग्लोबसह कैक पारितोषिके मिळाली असून, ‘बर्लिन’ या बॅण्डचे नाव या एका गाण्यासाठीच आठवले जाते. या गाण्याची कैक व्हर्जन आली असली, तरी मूळ गाणेच विसरले जात नसल्यामुळे त्यांना म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. ‘टॉप गन’च्या दशकात गाण्यांचे किंवा लोकप्रिय धूनचे स्थलांतर आपल्या देशात किती वेगात होत होते, हे दाखविणारे एक उत्तम गाणे ग्लोरिया एस्तेफान या गायिकेने बनविले होते. लॅटिन म्यूझिक मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि पुढे शकीरा-जेनिफर लोपॅझ हिच्यासाठी वाट तयार करून देणाऱ्या ग्लोरिया एस्तेफानच्या गाण्यांचा नव्वदीवर खूप मोठा प्रभाव होता. तिच्या ‘ऱ्हिदम इज गॉन गेट यू’ गाण्यात मध्येच येणाऱ्या रासवट जंगली संगीताचा नमुना उचलून आपल्याकडे ‘ओए ओय’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. मूळ गाणे आपल्याकडे फार रुचणार नाही. कारण इतक्या वर्षांमध्ये हिंदी गाण्याने केलेला परिणाम काढून टाकता येणे शक्य नाही. ग्लोरियाच्या काँगामध्येही याच गाण्याची झलक दिसू शकेल. दोन हजारोत्तर काळात मार्क अ‍ॅन्थनी, शकीरा आणि इतर लॅटिनो कलाकारांच्या गाण्यांनी एस्तेफानची क्रेझ मागे टाकली, तरी तिची काही वाद्यसमृद्ध गाणी विसरली जाऊ शकत नाहीत.

स्टिंग या ब्रिटिश गायकाचीदेखील काही गाणी आपल्याकडे ब्रायन अ‍ॅडम्सच्या गाण्यासारखी लोकप्रिय होती. माऊथ ऑर्गनचा सुरेख वापर केलेले ‘ब्रॅण्ड न्यू डे’ हे आपल्याकडे एका जाहिरातीत वापरण्यात आले होते. अनेकांना त्याचे सेक्सोफोनचा अंतर्भाव असलेले ‘इंग्लिशमन इन न्यू यॉर्क’ हे गाणे आवडते. स्वत: बास गिटारिस्ट असल्यामुळे स्टिंगची पोलीस बॅण्डमध्ये असतानापासूनची गाणी खास शैलीतील आहेत. ‘इंग्लिशमन इन न्यू यॉर्क’ आवडण्याचे कारणही सेक्सोफोनसोबत लक्षात राहणारा बास इफेक्ट आहे. स्टिंगने १९९९ साली तयार केलेले ‘डेझर्ट रोझ’ हे अरेबिक  वाद्य आणि अल्जेरियन गायकाला सोबत घेऊन तयार केलेले गाणे दोन हजार सालातील सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याची एक गंमतशीर आठवण म्हणजे ‘दिल चाहता है’ या भारतीय सिनेप्रवाह बदलणाऱ्या चित्रपटात आमिर खानची व्यक्तिरेखा एकांतात हे गाणे ऐकताना चित्रित झालेली पाहायला मिळते.  ‘दिल चाहता है’कालीन नवोत्तम आचार-विचारांची भारतीय तरुण पिढी आता कालबाह्य़ झाली आणि वाद्यांनी कोलाहल निर्माण करणाऱ्या आजच्या गाण्यांमध्ये पुढली पिढी रमली असली, तरी या यादीतील गाण्यांना पुढल्या शतकापर्यंत तरी कालबाह्य़ होण्याचे भय नाही.

म्युझिक बॉक्स

Berlin – Take My Breath Away

Gloria Estefan – Rhythm Is Gonna Get You

Gloria Estefan, Miami Sound Machine – Conga

STING & CHEB MAMI – DESERT ROSE

Sting – Englishman In New York

Sting – Brand New Day

The Police – Every Breatsh You Take

viva@expressindia.com