vivog04एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

गणपतीचे दिवस आहेत. महाकाय मूर्ती पाहून डोळे विस्फारले जाणं आता सवयीचं झालं असलं तरी त्याचं अप्रूप अजिबातच कमी झालेलं नाही. अशा या गणपतींच्या महाकाय मूर्तीचं वर्णन करताना अनेक जण एक विशेषण वापरतात. कसली ‘गायगँटिक’ मूर्ती आहे. काळाच्या ओघात शब्दाचे उच्चारच नव्हे तर अर्थही कसे बदलत जातात याचं हे उत्तम उदाहरण ठरेल.
या शब्दाच्या उच्चाराकडे वळण्याआधी या शब्दाचं मूळ तपासून पाहू या. ग्रीक भाषेतील गीगाज या शब्दापासून हा शब्द निर्माण झाला असावा, असं मानलं जातं. अत्यंत उग्रस्वरूपाचे महामानव यांच्याकरता हा शब्द वापरला जायचा. दैवी स्वरूपाच्या या अतिभव्य महामानवांना जायंट म्हटलं जायचं. या जायंट व जायगँटिक शब्दांमधलं नातं थोडं गूढच आहे. गीगाचं फ्रेंचमधलं geant रूप पुढे giant झालं. पण ‘ग’ चा ‘ज’ होणं अनाकलनीय आहे. आता आपण gigantic  या स्पेलिंगकडे वळू या. g  चा इतका सरळ आणि सढळ वापर आहे की, गायगँटिक असाच उच्चार आपल्या डोक्यात येतो. पण मग त्या ‘जायंट’ उच्चाराचं काय करायचं, असाही प्रश्न स्वाभाविकपणेच पडतो.
या गायगँटिक का जायगँटिक उच्चार गोंधळात विविध डिक्शनऱ्यांमध्ये मतमतांतरे दिसतात. काहींच्या मते आपण गीगाबाइट म्हणतो ना? गीगाचं जीगा करत नाही तर गायगँटिक पण चुकीचं ठरू नये. तर काहींच्या मते काळाच्या ओघात ‘ग’ चा ‘ज’ झालेला असल्याने जायंट व जायगँटिक ही समानता बाळगावी.
उच्चारांचा हा तिढा काही डिक्शनरीजनी मात्र थेट निर्णय घेऊन सोडवला आहे. ९९ टक्के ठिकाणी उच्चार जायगँटिक असाच ऐकू येतो तर एखाद ठिकाणी गायगँटिक अशा परिस्थितीत काय करावे? तर शक्यतो अधिकांच्या सोबत जावे आणि म्हणूनच या शब्दाचा उच्चार या लेखात जायगँटिक असाच वारंवार लिहिला गेला आहे.
ही झाली उच्चारांबद्दलची बाब, पण बहुतांश ठिकाणी जायंट वा जायगँटिक शब्दाला पूरक ज्या प्रतिमा दर्शवल्या आहेत, त्यातील या जायगँटिक मानवांचे दर्शन बऱ्याच अंशी उग्र आहे. त्यामुळे सोज्वळ, गोंडस, कृपाळू गणेशमूर्तीला महाकाय या अर्थाने जायगँटिक म्हणावे का? प्रश्नच आहे. मात्र ‘ह्य़ूज’मध्ये त्या ‘जायगँटिक’चा दम नाही हे खरं. अनेकदा विशेषत: निवडणुकीत जायंट किलर शब्द वापरला जातो. त्या अनुरोधानेही विशाल मूर्तीना जायगँटिक म्हणावे का? याचा विचार व्हायला हवा. काळाच्या ओघात शब्दांचे अर्थ बदलतात. अर्थातर होते. मात्र मूळ शब्दाचा शोध घेत जी हौशी मंडळी जातात त्यांना हाती काही वेगळंच, विलक्षण गवसते. अशा शब्दांची ही गाठ उकलत जावी, अशी विद्येची देवता असणाऱ्या गणरायाकडे प्रार्थना करू या.
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com