गेल्या पंधरा वर्षांत जीवनशैलीने आपण पुरते पाश्चात्त्य केव्हा झालो कळालेच नाही. हॉटेलिंगपासून ते शॉपिंगपर्यंत साऱ्या घटकांमध्ये शॉर्टकट्स समाविष्ट झाले. रेडी टू कूक पाकिटांच्या आणि मल्टिनॅशनल वस्तू विक्री केंद्रांच्या वाऱ्या वाढवण्यात भारतीय मध्यमवर्ग पटाईत झाला. स्वस्तातील उपाहारगृहांची जागा बर्गरकिंग, सीसीडी, मॅकडी, स्टारबक्स, सबवे, डंकिन डोनट्स, बरिस्ता, केएफसी यांनी घेतली. या फूड आऊटलेट्समध्ये ज्यादा दाम मोजून तरुणाई पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा ओरडा आदली पिढी करीत असली, तरी ते खरे नाही. कपडय़ांच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सच्या दुकानांपासून ते या कॅफे-मॉल संस्कृतीमध्ये जे कूल वातावरण असते, ते निव्वळ तिथल्या थंडगार एसीमुळे नाही, तर वाजणाऱ्या आंतरराष्ट्रीय हीट नंबर्समुळे. या विक्री-वास्तूंमध्ये लोक निव्वळ खाण्या-पिण्यासाठीच जात नाहीत, तर तिथले ऐषोआरामी वातावरण, बैठकीच्या स्मार्ट आणि आकर्षक सुविधा यांच्यासोबत ताजे संगीतही प्रसन्न वातावरण तयार करते. त्यामुळेच तरुणाईच्या भेटीच्या जागा पार्क, मूव्ही थिएटर्सकडून आता शॉपिंग मॉल्स आणि आंतरराष्ट्रीय फूड आऊटलेट्स ठरत आहेत.

आपल्याकडची ताजी हिंदी गाणी यापैकी काहीच ठिकाणी ऐकू येतात. बहुतांश जागी इंग्रजी गाणी लागण्याचे एक कारण या गाण्यांना वाजवताना कॉपीराइट्सचा प्रश्न नसतो. त्यामुळे विक्रीसारख्या सार्वजनिक ठिकाणी ही एमपीथ्री फॉरमॅट्समध्ये सहज वाजवता येतात. अपवादात्मक काही ठिकाणे वगळता या मॉल्स, कॅफेजमध्ये बिलबोर्ड याद्यांमधली मनखेचक आणि लक्षवेधी गाणी असतात. सुरुवातीला आपल्याकडे या कॅफेज-रेस्तराँमध्ये केनी जीच्या सेक्सोफोनवरील टय़ून्स आणि इतर वाद्यसंगीत मंद्रसप्तकात असे. पुस्तकांच्या दुकानांपासून उंची वस्तूंच्या कोणत्याही विक्री वास्तूंमध्ये हे ठरलेले होते. आता या सर्व संस्थांनी आपल्या ग्राहकवर्गाचे वय, आवडनिवड यांचा अभ्यास करून संगीताची उपलब्धी ठरवून दिली आहे. कित्येक सीसीडीमध्ये व्हीएचवन किंवा इतर आंतरराष्ट्रीय संगीत वाहिन्यांवरची गाणी सुरू असतात किंवा बिलबोर्डच्या चार्टवर सध्या लोकप्रिय असलेल्या गाण्यांची मेजवानी असते. हाती स्मार्टफोन आणि रोज वापराचे दीड जीबी नेट असलेल्या ग्राहक तरुणाईला अद्ययावत संगीत देण्यासाठी कॅफे-मॉल संस्कृतीही आता पुरती सरावली आहे.

यातील काही विक्री-वास्तूंमधील अनेक भेटींतून गाण्यांची नोंद घेतल्यानंतर संगीत अपडेटिंगचे कार्यही आपसूक या संस्था करीत असल्याचे लक्षात आले. सेलेना गोमेझ, मरून फाइव्ह, ड्रेक यांना गानयादींमध्ये सर्वाधिक स्थान आहे. त्यासोबत बिलबोर्ड यादीतील भारतीयांना इझी लिसनिंग ठरतील अशा गाण्यांचा सर्वाधिक समावेश आहे. मरून फाइव्ह या बॅण्डच्या अ‍ॅडम लेव्हिन या कलाकाराची ख्याती प्रचंड आहे. १९९४ पासून गानसक्रिय असलेल्या लेव्हिनची गेल्या दशकातील सगळीच गाणी हिट आहेत. त्याने बिगिन अगेन या चित्रपटासाठी तयार केलेली लॉस्ट स्टार्ससह इतर गाणी खासच ऐकावीत. सध्या त्याचे ‘गर्ल्स लाईक यू’ हे गाणे आपल्याकडच्या विक्री-वास्तूंमध्ये अनेकदा ऐकायला मिळाले. गिटारवरील सुंदर तुकडा गाणेभर फिरवत बनविल्या या गाण्यात कार्डी बी या रॅप-हीपहॉप गायिकेची शैली अत्यंत सुंदररीत्या जोडण्यात आली आहे.

अमेरिकेतील ‘मीटू’ मोहिमेनंतर स्त्रीसन्मानाचा आणि स्त्रीशक्तीच्या कबुलीचा पुरुष कलाकारांकडून जो आविष्कार झाला आहे, त्यात ड्रेकचे ‘नाइस फॉर व्हॉट’ आणि मरून फाइव्हचे ‘गर्ल्स लाईक यू’ या गाण्यांची सर्वप्रथम दखल घ्यायला हवी. या दोन्ही गाण्यांच्या व्हिडीओजमध्ये प्रभावशाली स्त्रियांचा सहभाग दिसतो. मरून फाइव्हचे गाणे ऐकल्यानंतर त्यात वाजविला गेलेला गिटार तुकडा बराच काळ आपल्या डोक्यात दबा धरून बसतो.

सेलेना गोमेझने आपल्या उभरत्या कारकीर्दीत सर्वात मोठे काम केले आहे, ते गाण्यासोबत ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या टीव्ही मालिकेच्या निर्मितीचे. उत्कृष्ट संगीताची बरसात असलेल्या या मालिकेचा दुसरा सीझन भारतीय नेटफ्लिक्सधारक आणि डाऊनलोडर्समध्ये सध्या लोकप्रिय आहे. त्याच वेळी गोमेझचे ‘बॅक टू यू’ हे ताजे गाणे सीसीडीमध्ये ऐकायला मिळत आहे.

‘आय विल देअर फॉर यू’ हे शब्द उच्चारले तरी आपल्याकडे अनेकांना फ्रेण्ड्स या टीव्ही मालिकेतील रेंब्रण्ट्सचे गाणे आठवू शकेल. भारतात उशिराने दाखल झालेली आणि तरीही अजूनही नव्याने भक्त होत पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेचे जेस ग्लेन या ब्रिटिश गायिकेच्या ‘आय विल देअर फॉर यू’ गाण्याशी काहीही नाते नाही. सध्या ते ब्रिटनच्या बिलबोर्ड यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे आणि जगभरामध्ये आवडीने ऐकले जाणारे प्रेमगीत आहे. या गाण्याच्या सुरुवातीला वाजणारी विरोधाभासी वाद्यावळ आणि पुढे वापरण्यात आलेला कोरस यांनी गाण्याचे सौंदर्य शतगुणित झाले आहे.

कार्डी बी ही गायिका सध्या वेगवेगळ्या खासगी कारणांसाठी गाजत असली, तरी तिचा अनेक कलाकारांसोबत असलेला सहभाग नजरेत भरणारा आहे. अनेक वर्षांनंतर परत आलेली जेनिफर लोपाझ आणि डीजे खलीदसोबतचे तिचे ‘डिनेरो’ हे गाणे नवे डान्स नंबर बनले आहे.

नीट लक्ष दिलेत, तर संगीताने दिलेल्या प्रसन्न वातावरणाचा परिणाम या विक्री-वास्तूंमधील खरेदीमध्ये परावर्तित झालेला दिसतो. सीसीडी आणि मॉलमध्ये कॉफीची किंमत पाहून डोळे वटारणाऱ्या आदल्या पिढीला ही मॉल-कॅफेची संगीतमेख कळणार नाही. अन् नव्या पिढीला पोटात जाणाऱ्या कॉफीसोबत कानात आणि मनात शिरणाऱ्या संगीताचे मोल पुढील काळात अधिक मोलाचे ठरेल.

म्युझिक बॉक्स

Maroon 5 – Girls Like You ft. Cardi B

Drake – Nice For What – YouTube

Selena Gomez – Back To You

Jennifer Lopez – Dinero ft. DJ Khaled, Cardi B

Jess Glynne-  I’ll Be There

Marshmello & Anne-Marie – “Friends”

Drake, “God’s Plan”

viva@expressindia.com