आपल्याकडे प्रवासात, निवांतेत किंवा पार्टी-समारंभ आणि सार्वजनिक हैदोस निमित्ताला कारणीभूत उत्सवांमध्ये ऐकले जाणारे प्रत्येक गाणेच उत्साहवर्धनाचे काम पार पाडत असते. त्यामुळे उत्साहवर्धक गाणी खरेच असतात, याबाबत आपण कधी विचार केला आहे का? खूपशा कोलाहलातूनही कुठल्याशा कोपऱ्यात वाजणाऱ्या संगीताच्या तुकडय़ाने लक्ष वेधून घेण्याची आणि तो क्षण सुंदर बनविण्याची किमया साधली, तर ती त्या त्या व्यक्तीसाठी उत्साह निर्माण करणारी गाणी असतात. टीव्हीवरच्या सिने-मालिकांपासून ते जाहिरातींमधल्या आणि मोबाइलमधल्या कानवेधी स्वरलहरींनी आपण दिवसातल्या सर्व प्रहरांत संगीताचे फास्टफूड चघळत असतो. रागदारी संगीत प्रत्येक प्रहरानुरूप आस्वाद आणि आनंद देत असते. रेडिओवर भल्या पहाटे भक्तीसंगीत सुंदर वाटते. त्यानंतर तेथे दिवसभर चालणारा सिनेगीतांचा सुळसुळाट प्रत्येकाच्या कानवकुबानुसार बरा-वाईट ठरतो. कुणाला लता-किशोर-रफी-मुकेश यांच्या स्वर साम्राज्यातून बाहेर यायचे नसते. तर कुणाला पंचमदा ते बप्पी लाहिरीच्या फ्युजन मिक्समध्ये रमायला आवडते. नव्वदोत्तरी काळातील सिनेगानयुग हे ‘नव्‍‌र्हस नाइंटीज’ म्हणून ओळखले जाईल. आठ-दहा लग्नपट आणि तेवढय़ाच प्रेमपटांच्या गाण्यांव्यतिरिक्त सुमारांची सद्दीच या काळात संगीत क्षेत्रात होती. या काळातच एका श्रोत्या पिढीने भारतीयसोबत पाश्चात्त्य गाणी ऐकण्याकडे अधिक भर दिला. पुढे माध्यमे, आंतरराष्ट्रीय संगीताची उपलब्धता इतकी वाढली की, त्या गाण्यांचा भारतीय चाहता वर्ग इथल्या संगीतापासून पूर्णपणे विलग व्हायला सुरुवात झाली. तुमच्या आवडीच्या भारतीय संगीतकार, गायक-गायिका यांची आवडती दहा गाणी घ्यायची झाली, तर तुम्ही दोन मिनिटांच्या आत जी निवडाल ती तुमच्या उत्साहात भर घालणारी गाणी असतील. (प्रयोग करा, दोन मिनिटांत किती गाणी विसरलो आहोत, याचीच उजळणी होईल.)

मानवी उत्साह निर्देशांक मोजता येत नसल्याने अमुक एक वाद्यावर बसविलेले, अमुक गायकाचे, ठरावीक शब्दांचे, ठरावीक इतक्या वेळेत संपणारे प्रत्येकासाठी उत्साहवर्धक ठरेलच असे नाही. प्रसिद्ध पॉझिटिव्ह थिंकर रॉबिन शर्मा यांनी आपल्या सकारात्मक भाषणांमध्ये आणि जीवनशैली सुधारण्याविषयी दिलेल्या सल्ल्यांमध्ये दिवसाचा उत्साहवर्धक आरंभ करण्यासाठी ‘टॉम पेटी’ याचे ‘फ्री फॉलिन’ हे गाणे ऐकण्यास सांगितले आहे.  रॉबिन शर्मा हे संगीत पंडित नाहीत. मात्र संगीताचा कान त्यांना आहे. १९८९ सालातील हे गाणे अजूनही आपल्याकडच्या पहाटेच्या भक्तीगीतासारखे अमेरिकेत ऐकले जाते. गेल्या वर्षी अखेरीस निवर्तलेल्या टॉम पेटीची सर्वोत्तम निर्मिती म्हणून या गाण्याचा लौकिक आहे. रॉबिन शर्मा यांनी आपल्या वैयक्तिक आवडीतल्या एका गाण्यावर उत्साहवर्धक गाण्याचा शिक्का मारला. पण हे गाणे जगातल्या सर्वच देशांतील कानसेनांच्या पन्नास गाण्यांच्या याद्यांमध्ये असतेच. जसे टॉम पेटी याचे गाणे उत्साहवर्धक तसेच नव्वदीच्या दशकात आपल्याकडे भाषांतर होऊनही फारसे न पोहोचलेले रॉक्सेट या स्वीडिश बॅण्डचे  ‘शीज गॉट द लूक’ हे गाणे. (दुनिया मे जीना है तो – योद्धा आणि दिल मे कुछ होने लगा- आर्मी) या एकाच गाण्यावरील दोन वेगवेगळी हिंदी गाणी त्या त्या काळात रेडिओवर आणि उत्सव समारंभात प्रचंड गाजली होती. शिवाय एका बडय़ा फॅशन उत्पादनासाठीच्या सतत लागणाऱ्या जाहिरातीमध्ये या गाण्यातील तुकडा वापरण्यात आला होता. रॉक्सेटची कोणतीही गाणी त्या काळाच्यापुढे होती. त्याने वापरेलेले गिटारतुकडे आणि पारंपरिक भावूक शब्दरचना यांनी ही गाणी ऑल टाइम उत्साहवर्धनाचे काम करतात. मूळ गाणे आणि त्यांचे मचुळ हिंदी अवतार ऐकल्यास गंमत वाटेल, ती रॉक्सेटच्या गाण्यातील खणखणत्या नाण्याची. रॉबिन शर्मा यांचा निवडविचार उचलला, तर त्यावर रोनन केटिंगचे ‘रोलर कोस्टर’ हे गाणे दिवस आरंभासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्यासोबत फिल कॉलिन्सचे ‘यू कॅन वेअर माय हॅट’ नावाचे गाणे ऐकणेही आनंद ठरू शकेल. फिल कॉलिन्सचे हे नृत्यगीत आहे. लॅटिन अमेरिकी तालवाद्यमेळा असलेले हे गाणे पाय थिरकविण्यास भाग  पाडणारे सर्वाधिक कानसुसह्य़ गाणे आहे. एरव्ही डान्स गाण्यांमध्ये वापरला जाणारा अतिरेकी वाद्यखेळ इथे नाही. फिल कॉलिन्सची मिष्किली या गाण्यामध्ये उतरली आहे. थोडा धांगडधिंगायुक्त श्रवणीय गाणे ऐकून मनोवस्था सुधारायची असेल, तर लेन या बॅण्डचे ‘स्टील माय सनशाईन’ हे गाणे ऐकावे. भारतामध्ये एमटीव्हीने हुरळून गेलेल्या पहिल्या पिढीची या गाण्याशी खूप मोठी ओळख आहे. दोन हजार सालाच्या आगे-मागे उडत्या चालींची ‘सॅटरडे नाइट’, ‘ब्राझिल’, ‘सेक्सी आईज’, ‘बार्बी गर्ल’ ही गाणी पहिल्यांदा आपल्याकडे गणपती उत्सवात वगैरे लागायला सुरुवात झाली होती. तेव्हा स्टील माय सनशाईन व्हिडीओसह सर्वाच्या आवडीचे गाणे होते. गेल्या वीस वर्षांत शेकडो कलावंतांनी बिलबोर्ड यादीचे शिखर सर करीत दर आठवडय़ाला संगीतवेडय़ांच्या उत्साहाची धार शाबूत ठेवणारी गाणी दिली आहेत. शेरील क्रो हीच्या ‘एव्हरी डे इज वाइंडिंग रोड’ या गाण्याला उत्साहवर्धनाच्या या स्तंभाच्या टप्प्यावरचे शेवटचे गाणे म्हणून निवडून थांबू या. हे गाणे निवांततेत ऐका आणि आपले अंग अंतर्बाह्य़ थिरकले नाही, तर कळवा.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

म्युझिक बॉक्स

  • Tom Petty – Free Fallin’
  • Roxette She’s Got The Look
  • Roxette – Joyride
  • Ronan Keating – Life Is A Rollercoaster
  • Phil Collins – Wear My Hat
  • Len – Steal My Sunshine
  • Sheryl Crow – Everyday Is A Winding Road

viva@expressindia.com