प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

हॅलो अमित सर,
मी वरद. फॅशनचे सध्याचे ट्रेण्ड्स जाणून घ्यायची माझी फार इच्छा आहे. मुख्य म्हणजे माझी अंगकाठी बारीक असल्याने, मला शोभून दिसतील अशा ड्रेसिंग स्टाइल्सबद्दल आपण काही सांगू शकाल का?

हाय वरद!
तुला फॅशन आणि स्टायलिंगबद्दल जाणून घ्यायचं आहे. नाइस टू हिअर दॅट. कारण, बहुतेक पुरुष स्वत:च्या ड्रेसिंग आणि लुक्सकडे फारसं लक्ष देत नाहीत. फॅशन संदर्भातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे – आपल्या डोक्यापासून पायापर्यंतच्या पेहेरावातील रंगसंगती, बाहय़ाकार, प्रमाणबद्धता यांत समतोल असायला हवा. उदाहरणार्थ लाल जीन्सवर न्युट्रल रंगाचा म्हणजे पांढरा, काळा किंवा करडा शर्ट/टीशर्ट घालायला हवा. दोन्ही जीन्स आणि शर्ट दोन्ही भडक रंगांतीलच असतील तर? ते फारच हास्यास्पद दिसेल. तोच नियम प्रिण्टेड कपडय़ांना लागू होतो. पोशाखातील वरच्या आणि खालच्या भागांपैकी एक भाग प्रिण्टेड असेल तर दुसरा प्लेनच असायला हवा.
पादत्राणं.. शूज, सॅण्डल्स ब्राइट रंगाची असतील तर कपडे सौम्य रंगाचे हवेत. म्हणजे केशरी रंगाच्या शूजवर माइल्ड ब्लू कलरची जीन्स आणि सौम्य निळ्या रंगाचा टीशर्ट, डोक्याच्या दोन्ही बाजूला आखूड, पण पुढल्या आणि डोक्यावरील भागात लांब अशी हेअर स्टाइल.. एकदम ‘कडक’ फॅशन होईल. अर्थात, अशी हेअर स्टाइल आपला चेहरा, डोक्याचा आकार यांनाही शोभून दिसायला हवी. चेहऱ्यावरचे वाढलेले दाढीचं खुंट सध्याची इन फॅशन आहे. दाढी बहुतांश पुरुषांना शोभून दिसते.
थंडीच्या दिवसात केवळ मुलींनाच नाही, तर मुलांच्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीदेखील काही दर्जेदार उत्पादनं आवश्यक असतात. चांगल्या दर्जाच्या अ‍ॅक्सेसरीज – म्हणजे रिस्टवॉच, वॉलेट, सनग्लासेस, बॅग हव्या. ब्रॅण्डेड वस्तू महागडय़ा असतात खऱ्या, पण त्या कोणत्याही पेहेरावाला सूट करतात. आजकाल गोल आकारातील चष्म्याच्या फ्रेम्स, लेदरबॅग किंवा बॅकपॅक ‘इन’ आहेत.
एका हातात घातलेले भरपूर ‘रिस्टबॅण्ड’ही मस्त कूल लुक मिळवून देतात. सध्या प्रिण्टेडची चलती आहे. फुलांची, भौमितिक आकारांची, प्राण्यांची, आदिवासी प्रिण्ट्स मस्त दिसतील. फाटलेल्या जीन्स, रंगीबेरंगी चिनोज (स्लिम फिट) आणि घोटय़ाजवळ इलास्टिक असलेल्या पॅण्ट्सदेखील चांगल्या दिसतात.. आजकाल लोफर्स (फ्लॅटहिल्स शूज), इस्पाड्रीलर्स (हलक्या वजनाचे कापडी शूज), लेदर सॅण्डल्स ‘इन’आहेत.
वरद, स्वत:वर सतत प्रयोग करणे हा फॅशनचा बेसिक फंडा आहे. यातूनच तुला आवडणारी आणि शोभणारी स्टाइल तुला नक्की सापडेल और बॉस, तीच तुझी पर्सनल स्टाइल असेल.
(अनुवाद – गीता सोनी )