आपल्या घरी येणारा कोणीही माणूस हा दरवाजा उघडण्यासाठी आधी दरवाज्यावरची बेल वाजवतो. पूर्वी महालात येण्याआधी दरवाज्याबाहेर एक मोठी घंटा टांगलेली असे. ती वाजवून माणूस आत येई किंवा राजे वगैरे येण्यापूर्वी सेवक वर्दी देण्यासाठी ही घंटा वाजवत. देवळाच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी वर घंटा टांगलेली असते जी वाजवून भक्त देवाच्या पायाशी नतमस्तक होतात. आपण आल्याची वर्दी देणं हे या सगळ्या घटनांच्या केंद्रस्थानी आहे! वर्दी देण्याचे प्रकार काळानुरूप बदलत गेले. गोवळकोंडय़ाच्या किल्ल्यातील घंटानादापासून ते आता घराघरांतून वाजणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बेलपर्यंत हा प्रवास झाला आहे.

आपण आल्याची वर्दी देणं किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेणं याचे प्रकारही असेच काळानुरूप बदलत गेले. कधी काळी लक्ष वेधून घेण्यासाठी ‘शुकशुक’ करणं किंवा टाळ्या वाजवणं असे प्रकार असायचे. हळूहळू ही पद्धत शिटी मारण्यापर्यंत पोहोचली. मोबाइल आले तशी ‘मिस कॉल’ ही पद्धत शोधून काढली गेली. ‘व्हॉटस् अ‍ॅप’ आलं तसं सहज एक मेसेज टाकून ठेवणं याला ‘पिंग करणं’ असा वाक्प्रचार वापरून लक्ष वेधून घेण्याची कल्पकता तरुणाईच्या डोक्यातून प्रत्यक्षात उतरली. याच धर्तीवर भारतीय असलेल्या ‘हाइक’ने ‘नज’ आणि फेसबुकने ‘पोक’ करणं या क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत.

‘पोक’ म्हणजे सारखं टोचत राहून लक्ष वेधून घ्यायचं हा साधासोपा अर्थ ! एकसारखं टोचत राहून समोरच्याला आपल्याकडे लक्ष द्यायला लावायचं यासाठी आरंभलेला हा उद्योग ! थोडक्यात काय तर समोरच्याला छळून छळून का होईना, पण आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडायचं. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही तर आणखी कोणत्यातरी मार्गाने आपल्याकडे लक्ष जावं म्हणून केलेला हा खटाटोप म्हणजे पोक! पूर्वी अनोळखी माणसांसोबत बोलणं सुरू करण्यासाठी सुरू केलेलं हे ‘पोक पोक’ आजकाल आपल्याच फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या मित्रांना छळण्यासाठी वापरलं जातं. हे केवळ एक पोक-पोक करून न थांबता शंभराच्या घरात त्याची मोजणी नेण्याचा चंग बांधणारे मित्र या ‘पोक-पोक’चा अगदीच गैरफायदा घेताना दिसतात.

‘हाइक’ या ‘व्हॉटस् अ‍ॅप’सारख्याच पण भारतीय असलेल्या अ‍ॅप्लिकेशनने ‘नज’ करणं हा प्रकार आणला आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे फेसबुकच्या ‘पोक’लाही प्रसिद्धी मिळाली. या टोचून टोचून लक्ष वेधून घेण्याच्या पद्धतीला ‘उंगल्या करणं’ का म्हणतात?, हे या अ‍ॅप्लिकेशन्सवरून मित्रांनी कटकट करून छळल्याशिवाय कळणार नाही.

viva@expressindia.com