News Flash

चटकदार भजी

खमंग, चटकदार रेसिपीज ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी ‘व्हिवा’च्या तरुण वाचकांसाठी दिल्या आहेत..

(संग्रहित छायाचित्र)

यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने उत्तम बॅटिंग केली. जूनच्या सुरुवातीलाच खास ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी पावसाळ्याच्या निमित्ताने आम्ही चहाच्या रेसिपी पेश केल्या होत्या. चहाच्या तृषाशांतीनंतर आता खास ‘पावसाळी तळणाची’ जिव्हातृप्ती ही हवीच! पाऊस म्हटलं की भजी हवीच.. तिथे तेलाचा विचार करून चालत नाही. म्हणूनच पावसाचा चांगला जोर चढलेला असताना त्याची रंगत वाढवण्यासाठी या खमंग, चटकदार रेसिपीज ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी ‘व्हिवा’च्या तरुण वाचकांसाठी दिल्या आहेत..

मुंग पकोडे

साहित्य – मुगाची बिनसालाची डाळ १ वाटी, आलं २ इंच, हिरव्या मिरच्या ३ नग, कोिथबीर अर्धी वाटी, हळद पाव चमचा, जिरे १ चमचा, खायचा सोडा पाव चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळायला.

कृती : मुगाची डाळ भरपूर पाण्यात ५ ते ६ तास भिजत घाला. नंतर पाणी निथळवून, मिक्सरमधून, पाणी न घालता वाटून घ्या. आलं, मिरच्या मिक्सरमधून वाटून घ्या. कोिथबीर बारीक चिरून घ्या. मुगाची वाटलेली डाळ, आलं-मिरच्यांचा ठेचा, कोिथबीर, हळद, जिरं आणि मीठ सर्व मिसळून घ्या. तेल मध्यम आचेवर तापायला ठेवा. तेल तापले की मुगाच्या डाळीत खायचा सोडा घालून हाताने भरपूर फेटून घ्या आणि लगेच तापलेल्या तेलात छोटे गोल वडे हातानेच सोडा. वडे सोनेरी रंगावर तळून घ्या.

पोह्य़ाची कचोरी 

साहित्य – पातळ पोहे २ वाटय़ा, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, बडीशेप अर्धा चमचा, धणे-जिरे पावडर १ चमचा, हळद, तिखट चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा, बेसन अर्धी वाटी, मीठ, साखर चवीनुसार, कोिथबीर ४ चमचे, तेल अर्धी वाटी.

कृती : २ वाटय़ा पातळ पोहे भिजवून त्याचे पाणी काढून टाका व त्यांना चांगले मळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, २ चमचे तेल घालून बाजूला ठेवा. दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे तेलात १ चमचा आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून मसाला परतून घ्या. नंतर यात अर्धी वाटी बेसन चवीनुसार मीठ, साखर घालून मिश्रण एकत्र करा. नंतर बारीक चिरलेला कोिथबीर व पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजू द्या. भिजवलेल्या पोह्य़ाचा एक गोळा तोडून त्याची लाटी तयार करा. मधोमध मसाला भरून चारही बाजूने बंद करून दोन्ही हातांनी दाबून चपटे करा. तळण्यापूर्वी तेल मध्यम गरम करून त्यामध्ये तयार वाटय़ांना मधोमध दाबून वाटीसारखा आकार द्या. मंद आचेवर तळून घ्या.

पालक पनीर सिक कबाब

साहित्य – पनीर अर्धी वाटी, (चणा, उडीद, मूग) डाळ १ वाटी, पालक पेस्ट १ वाटी, जायफळ पावडर पाव चमचा, आमचूर पावडर १ चमचा, आलं-लसूण पेस्ट ४ चमचे, हिरवी मिरची पेस्ट २ चमचे, कोिथबीर ४ चमचे, तेल ४ चमचे.

कृती : अर्धी वाटी पनीर छान मळून घ्यावे. नंतर तिन्ही डाळी (चणा, उडीद, मूग) १ वाटी एकत्र करून खरपूस भाजून त्याची पावडर करावी. त्यानंतर पालक पेस्ट १ वाटी, पनीर व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात पाव चमचा जायफळ पावडर, मीठ, १ चमचा आमचूर पावडर, ४ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट, कोिथबीर घालून छान मळून घ्यावे. नंतर हे मिश्रण एका जाड सळईला लावून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे. मधे-मधे तेल लावावे. भाजून झाल्यावर त्याचे लांबसर तुकडे करून कचुंबर व चटणीबरोबर खायला द्यावे.

काकडीची भजी

साहित्य – बेसन २ वाटय़ा, कॉर्नस्टार्च ३ चमचे, काकडीचे चिप्स १ वाटी, हळद पाव चमचा, लसूण पेस्ट २ चमचे, मीठ, तिखट चवीनुसार.

कृती : काकडीचे चिप्स सोडून सर्व साहित्य एकत्र करा. नंतर या मिश्रणात काकडीचे चिप्स बुडवून तळून घ्या.

चीज फ्लॉवर पकोडे

साहित्य – फ्लॉवर अर्धा किलो, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, तिखट, मीठ चवीनुसार, िलबू १, चीज १ वाटी, दूध पाव वाटी, बेसन अर्धी वाटी, मदा अर्धी वाटी, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बेकिंग पावडर १ चमचा.

कृती : सर्वप्रथम अर्धा किलो फ्लॉवर उकडून घ्यावे. त्याला आलं-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, िलबू चोळून बाजूला ठेवा. १ वाटी चीजमध्ये थोडं दूध घालून मेल्ट करा. त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे बुडवून बाजूला ठेवा. थोडय़ा वेळाने त्यावर कोटिंग चढेल.  अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी मदा, अर्धी वाटी कॉर्नस्टार्च, १ चमचा बेकिंग पावडर, मीठ एकत्र करून त्याच्या द्रावणात फ्लॉवर बुडवून मंद आचेवर तळा.

नद्रु शामी कबाब

साहित्य – कमल काकडी ३ ते ४, तेल पाव वाटी., जिरे १ चमचा, जिरे पावडर १ चमचा, हिरवी मिरची ३ ते ४, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, कोिथबीर ३ चमचे, आमचूर पावडर अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, चाट मसाला १ चमचा, कसुरी मेथी अर्धा चमचा, तांदुळाचे पीठ अर्धी वाटी, मीठ चवीनुसार.

कृती :  ३ ते ४ कमल काकडय़ा धुऊन सोलून मिक्सरमध्ये बारीक करा. एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून जिरे फोडणीला घाला. त्यात कमल काकडी घालून ९० टक्के शिजवून घ्या. नंतर यात १ चमचा जिरे पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट १ चमचा, बारीक चिरलेली कोिथबीर, आमचूर पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर घालून एकत्र करा. सर्वात शेवटी चाट मसाला व कसुरी मेथी घाला. नंतर हे मिश्रण थंड करून त्यात अर्धी वाटी तांदुळाची पिठी घालून त्याच्या टिकिया बनवून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.

बटाटा भजी

साहित्य – बेसन २ वाटय़ा, कॉर्नस्टार्च ३ चमचे, बटाटे चिप्स १ वाटी, हळद पाव चमचा, लसूण पेस्ट २ चमचे, मीठ, तिखट चवीनुसार.

कृती  : बटाटे सोडून सर्व साहित्य एकत्र करा. नंतर या मिश्रणात बटाटयाचे चिप्स बुडवून तळून घ्या.

कांदा भजी

साहित्य – लांब चिरलेला कांदा २ वाटय़ा, बेसन अर्धी वाटी, कॉर्नस्टार्च ४ चमचे, लसूण पेस्ट २ चमचे, चिरलेला कोिथबीर ४ चमचे, जिरे १ चमचा, हळद पाव चमचा, तिखट, मीठ चवीनुसार.

कृती :  बेसन व कॉर्नस्टार्च सोडून सर्व साहित्य एकत्र करा. दहा मिनिटानंतर त्यामध्ये जेवढे बेसन व कॉर्नस्टार्च मावेल तेवढे व थोडा पाण्याचा हबका मारून तेलात भजी तळून घ्या.

आलू टिकिया

साहित्य – उकडलेले बटाटे अर्धा किलो, चिंचेची चटणी अर्धी वाटी, पुदिना चटणी अर्धी वाटी, मलईचे दही १ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, कोिथबीर ४ चमचे, शेव १ वाटी, चाट मसाला १ चमचा, तूप पाव वाटी, काळीमिरी १ चमचा.

कृती : बटाटे कुस्करून यामध्ये चवीनुसार मीठ व कॉर्नस्टार्च घालून त्याचे गोल गोळे तयार करून खोलगट तव्यावर तुपामध्ये तळून घ्या. सर्व करतेवेळी गोळा चपटा करून खरपूस परतून घ्या. प्लेटवर घेऊन त्यावर दही, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, कांदा, कोिथबीर व शेव घालून सव्‍‌र्ह करा.

संकलन – मितेश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: famous chef vishnu manohar recipes for viva readers
Next Stories
1 फॅशन कट्टा
2 कट्टय़ावरची खवय्येगिरी
3 ट्रेंडिंग योगा
Just Now!
X