21 February 2019

News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : फक्त नाचरी गाणी

चाल, गाण्याची शैली आणि डिस्को ठेका यांचे अद्भुत सौंदर्य या गाण्यात जुळून आले आहे.

पंकज भोसले 

भारतीय गाण्यांना पूर्वापार नृत्यप्रधानतेचा वारसा आहे. तरी पाश्चिमात्य ठेक्याच्या प्रभावाने आपल्या देशातील ऐंशीचे दशक कानसेनांऐवजी ‘डिस्को डान्सर’ घडविणारे होते. गंमत म्हणजे ढॅण-ढॅण आणि चमत्कारिक आवाजांच्या मिश्रणाचा कोलाहल म्हणजे डिस्को असा अपसमज त्या गाण्यांनी पसरवला होता. ‘डिस्को एटीटू’पासून ‘ओये ओये’पर्यंत किती तरी गाणी त्या त्या वर्षांतील सार्वजनिक उत्सव आणि शाळांतील स्नेहसंमेलनाचा भाग बनली होती. बोनी एम आणि मायकेल जॅक्सन हे कलाकार त्यांच्या देशात जन्माला आले नसते, तर भारतात डिस्को गाण्यांचा प्रचारच नसता झाला. ‘डिस्को दिवाने’ झालेल्या या पिढीला पुढच्या दशकातील पॉप अल्बममधील सुगम संगीताशी जुळवून घेताना फार कष्ट पडले. मग डीजेंचा दणदणाट आणि रिमिक्सचा सुळसुळाट पुन्हा नव्या डिस्कोची परंपरा घेऊन आला; पण ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ या सिनेमात पहिल्यांदाच ‘उफ तेरी अदा’ या गाण्याने डान्स फ्लोअरवर वाजवावे असे उत्तम गाणे तयार झाले. लग्ननृत्याच्या गाण्यातून बॉलीवूड या गाण्याद्वारे बाहेर आले आणि त्यानंतर डान्स फ्लोअरवरची कैक गाणी तयार झाली. मायकेल जॅक्सनोत्तर काळात इंग्रजी डान्स फ्लोअरवरच्या गाण्यात मोठे संक्रमण आले आणि नृत्यासोबत ऐकायलाही छान वाटतील अशी चांगली गाणी तयार झाली. हे सारे आठवण्याचे कारण सोफी एलिस बॅक्स्टर या गायिकेने नुकतेच तयार केलेले ‘लव्ह इज यू’ हे गाणे. या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे ऐंशी-नव्वदोत्तरीच्या काळातील गाण्यांच्या धर्तीवरची त्याची रचना. आत्ताच्या काळातील डान्स फ्लोअरवरच्या गाण्यांशी पूर्णपणे फटकून असल्यामुळे ते फारच सुंदर वाटते. (ब्रनो मार्सची अलीकडची बरीचशी गाणी याच शैलीतील आहेत.) सोफी एलिस बॅक्स्टरने कितीही उत्तम गाणी बनविली, तरी तिच्या ‘मर्डर ऑन द डान्स फ्लोअर’ या गाण्यासाठीच तिची कायम ओळख राहणार आहे. दोन हजार सालादरम्यान या गाण्याने धमाल उडवून दिली होती अन् त्यात ट्वायलायट प्लेअर्सही झळकले होते. (याच ट्वायलायट प्लेअर्सनी पुढे भारतात येऊन ‘देव डी’मधील ‘परदेसी’ या गाण्याला नेत्रदीपक नृत्याने सजविले.) तर सोफी एलिस बॅक्स्टरच्या काळात वेंगाबॉय आणि विगफिल्डची नृत्यगाणी आपल्याकडच्या क्लब्स, बार्स, रेस्तराँमधून थेट गणपती उत्सवांपर्यंत पोहोचली होती. ‘मर्डर ऑन द डान्स फ्लोअर’ला फक्त इथल्या म्युझिक चॅनल्सवरच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘गेट ओव्हर यू’ आणि किती तरी नृत्यगाणी तिने दिली. मात्र ‘मर्डर ऑन द डान्स फ्लोअर’ला अद्याप मरण आलेले नाही. चाल, गाण्याची शैली आणि डिस्को ठेका यांचे अद्भुत सौंदर्य या गाण्यात जुळून आले आहे. २०१४ साली फॅरेल विल्यम्स या कृष्णवर्णीय गायकाने आनंदीपणा हा विषय घेऊन तयार केलेल्या ‘हॅपी’ या गाण्याने मोठा विक्रम केला होता. बिलबोर्डमध्ये, ग्रॅमीमध्ये, इतकेच नाही तर सिनेमा आणि जाहिरातींमध्येही या गाण्याचा बोलबाला होता. नृत्यावरची गाणी कर्णकर्कशच असतात, हा कुणाचा समज असेल, तर त्यांनी हे गाणे जरूर ऐकावे. त्यातील बीट्स पाय थिरकवतील आणि पुन:पुन्हा हे गाणे ऐकण्यास भाग पाडतील. भारतात एमटीव्हीची क्रेझ असणाऱ्या काळात बॉयबॅण्डचा मोठा चाहता वर्ग होता, तर गर्लबॅण्डमध्ये स्पाइस गर्ल्सना सर्वाधिक ऐकले जात होते. त्यांचे ‘इफ यू वॉनबी माय लव्हर’ गाणे खूप गाजले. त्या गाण्याइतकेच डान्स फ्लोअरवर वाजविण्यास उत्तम असे ‘स्टॉप’ हे गाणे उपलब्ध असेल त्या मार्गाने प्ले करून ऐकत राहावे असे आहे. या गाण्याच्याच काळात बॅकस्ट्रीट बॉइजचे ‘एव्हरीबडी’ हे गाणेही डान्सहीट म्हणून समोर आले होते. आपल्याकडे दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘कोल्डप्ले’ या बॅण्डचे ‘व्हिवा ला विदा’ हे गाणे डान्स फ्लोअरवर वाजू शकणारे उत्तम सॉफ्ट गाणे आहे. या गाण्याशी तुलना ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’मधील ‘उफ तेरी अदा’शीदेखील करता येऊ शकेल. ‘कोल्ड प्ले’ची सर्वच गाणी शांततेत ऐकावी; पण काही गाण्यांमध्ये नृत्येच्छा जागृत करणारी ताकद आहे. ‘ए स्काय ऑफ फुल ऑफ स्टार्स’ हे त्याच पठडीतले एक गाणे आहे. वर दिलेली सारी फक्त नाचरी गाणी असली, तरी त्यांच्यातील श्रवणीयता प्रचंड मोठी आहे. कानांसह सारे शरीर थिरकवून टाकायचे असेल, तर ही गाणी त्यासाठी उत्तम निवड ठरतील.

Sophie Ellis-Bextor – Murder On The Dancefloor

Sophie ellis bextor – Love is you

Spice Girls – Stop

Pharrell Williams – Happy

Mark Ronson – Uptown Funk ft. Bruno Mars

Coldplay – Viva La Vida

Coldplay – A Sky Full Of Stars

viva@expressindia.com

First Published on August 24, 2018 1:07 am

Web Title: famous english songs for dance