(शब्दांकन- सायली पाटील)

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत शिकायला येणाऱ्यांचे पाय नवी मुंबईकडेही वळू लागले आहेत. विविध विद्यापीठं, महाविद्यालयं, तिथं उपलब्ध असणाऱ्या सोयी या सर्व गोष्टींमुळे अगदी कट्टर मुंबईकर मुलं-मुलीसुद्धा शिक्षणासाठी नवी मुंबईची वाट धरत आहेत. नवी मुंबईत अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयं आणि उच्चशिक्षणासाठीही बरीच महाविद्यालयं असल्यामुळे इथं विद्यार्थी मित्रांची जास्त ये-जा दिसते. खारघर, नेरुळ, वाशी, सानपाडा या पट्टय़ात असलेल्या या विविध महाविद्यालयांमध्ये फक्त राज्यभरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतील विद्यार्थी येतात. एरवी सगळीकडेच महाविद्यालयाच्या जवळपासच खाऊचे अड्डे जमतात आणि प्रसिद्धही होतात. मात्र नवी मुंबईत येणाऱ्यांना आपली खादाडी भागवण्यासाठी महाविद्यालयापर्यंत पोहोचण्याची वाट पाहावी लागत नाही. त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनातच स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थाची रेलचेल करून देण्यात आली आहे. नवी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखत महाविद्यालयांच्या परिसराजवळच असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये हे खाऊअड्डे प्रस्थापित झाले आहेत.

तसं पाहायला गेलं तर नवी मुंबई परिसरातील जवळपास सगळ्याच रेल्वे स्थानकांवर तुलनेने वर्दळ कमी असते. त्यामुळे स्थानकातच विद्यार्थी आणि खवय्या मित्रांची भूक भागवण्यासाठी इथं रांगेत काही दुकानं सज्ज आहेत. चला तर मग, जाणून घेऊ या  काय म्हणतेय खारघरच्या तरुणाईच्या या खाऊअड्डय़ांविषयी..

कोलकाता रोल्स

खारघर रेल्वे स्थानकाच्या मार्गावरच ‘कोलकाता रोल्स’ हे दुकान आहे. इथं ‘पनीर कोशा रोल’, ‘लच्छा पराठा रोल’, ‘पनीर बार्बेक्यू रोल’ असे विविध प्रकारचे रोल मिळतात. त्यासोबतच ‘शॉरमा’ हा प्रकारही इथं येणाऱ्यांच्या अनेकांच्या आवडीचा. त्यात वापरले जाणारे सॉस आणि टॉपिंग्ज एका साध्या रोलला अफलातून चव देऊन जातात. फ्रँकी किंवा रोल्स हे तसेही तरुणाईचे खास पसंतीचे आणि भूक भागवणारे असल्याने त्याच्यासाठी होणारी गर्दी जास्तच असते. त्यातही एकाच ठिकाणी रोल्समध्ये एवढं वैविध्य मिळणार असेल तर तिथं खवय्यांचा डेरा पडणारच.

बिकानेर स्वीट्स

नमकीन आणि चाट खाण्यासाठी शौकीन असणाऱ्यांचे पाय आपोआपच ‘बिकानेर स्वीट्स’ या दुकानाकडे वळतात. इथं आल्यावर गोडाच्या पदार्थासोबतच कचोरी आणि समोसे या पदार्थावर ताव मारण्याला प्राधान्य दिलं जातं. इथं येताच गरम गरम कचोरी आणि समोशांचा खमंग वास आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. मुख्य म्हणजे मोबाइलमध्ये डोकावणाऱ्या तरुणांच्या एखाद्या ग्रुपमधील कोणी तरी त्या खमंग वासाचासुद्धा मनमुराद आनंद घेताना इथं हमखास पाहायला मिळतो.

ए वन फेमस बिर्याणी

खारघरमध्ये भुकेलेल्या कॉलेजिअन्सचं आणि जवळपास सर्वाच्याच आवडीचं ठिकाण म्हणजे ‘ए वन फेमस बिर्याणी’. इथं आल्यानंतर काय खाऊ  आणि काय नको, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. कारण विविध प्रकारच्या बिर्याणी पाहून भरून पावलो आज.. असंच अनेक जण म्हणतात. कॉलेजमधल्या असाइन्मेंट्स आणि प्रेझेंटेशन्सच्या टेन्शनला गोळी मारत बिर्याणीवर ताव मारणारे बरेचसे नित्यनेमाने येणारे चेहरे इथं पाहायला मिळतात. दम बिर्याणी, चिकन-मटण लझीझ असे बरेच पदार्थ ए वन फेमसच्या चार पानी मेन्यू कार्डमध्ये पाहायला मिळतात. खिशाला परवडेल अशाच किमतीत इथं चविष्ट बिर्याणी सव्‍‌र्ह केली जाते. त्यामुळे मनही तृप्त होतं आणि खर्चाचाही त्रास होत नाही.

डिश डॅश कॅ फे

कॉलेजिअन्सची भूक म्हटली की त्यांना काय खायचं यापेक्षाही कुठं खायला जायचं हा पहिला प्रश्न असतो. चवीचं खाणं हवं असलं तरी ते बजेटमध्ये असायला हवं ही पहिली अट असते. पण ‘डिश डॅश’चं नाव निघाल्यावर बजेट वगैरेचे प्रश्न पडतच नाहीत. तिथं खिशाल परवडेल अशा किमतींमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पदार्थाची चव चाखता येते. कॅ फे संस्कृतीला साजेशा अशा या ‘डिश डॅश’ कॅफेकडे हल्ली तरुणाईचा वाढता कल पाहायला मिळतो आहे.

खारघर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या महाविद्यालयांची वाढती संख्या पाहता बरेच जण मोकळ्या वेळेत फेरी मारण्यासाठी, पोटातील भूक शांत करण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी थेट रेल्वे स्थानकाकडे धाव घेतात. विविध प्रकारचे केक, मोमोजही इथं तितक्याच आवडीने खाल्ले जातात. त्याशिवाय नेहमीच ‘हॅप्पी आवर्स’साठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मॅकडी’ आणि ‘केएफसी’मध्येही तरुणाईची कायम रीघ लागलेली पाहायला मिळते. त्यामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवत असताना पोटोबा आतून भुकेच्या धडका मारायला लागला की पळत रेल्वे स्थानक गाठणारे हे खवय्ये इथल्या कुठल्या ना कु ठल्या खाऊअडय़ावर हमखास पाहायला मिळतील यात शंका नाही.