कॉलेज म्हटलं की खादाडीचा कट्टा आलाच. प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं खास आपलं असं एक खाद्यविश्व असतं. पुण्यातल्या स.प.महाविद्यालयाच्या परिसरातले असेच काही चवदार अड्डे..

क्वालिटी फ्रुट लंच

स.प. महाविद्यालयाच्या अगदी समोर उभं असलेलं क्वालिटी फ्रुट लंच तरुणाईत लोकप्रिय आहे. कॉलेज तरुणांना जंक फूडचं व्यसन लागू नये. जास्तीतजास्त सकस अन्न त्यांनी खावं या हेतूने हे फूड सेंटर सुरू झालं. महाराष्ट्रातली पहिली फ्रुट लंच थाळी सुरू करण्याचा मान यांच्याकडे जातो. इथली ही थाळी चवदार आहेच, पण त्यासोबत मिळणारे ज्यूस व मिल्कशेकही खास आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या थाळीची मेसदेखील सुरू करण्यात आली आहे. रमजानच्या रोजाच्या काळात तसेच श्रावण व अश्विन महिन्यात अनेक पुणेकर या थाळीची चव घेतात. ‘‘उपास असलेले अनेकजण ही थाळी खायला येतात पण ती इतकी मोठी असते की त्यांना ती संपत नाही, बहुतांश वेळा आम्हाला उरलेली फळं पार्सल करून द्यावी लागतात,’’असं या क्वालिटी फ्रुट लंचचे मालक रवींद्र हुले अभिमानाने सांगतात. न्यू पूना बोर्डिग

स. प. महाविद्यालय चालू झाल्यानंतर पुढे १० वर्षांनी हे न्यू पूना बोर्डिग सुरू झालं. बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची चांगली सोय करणारं हे हॉटेल आता ९१ वर्षांचं आहे. पूर्वी पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणारे विद्यार्थी आता टेबल-खुच्र्यावर बसून जेवतात. दोन भाज्या, भात, आमटी, गरमागरम पोळ्या, कोशिंबीर आणि गोड पदार्थ अशी साग्रसंगीत थाळी इथे मिळते.

उदय विहार

स. प. महाविद्यालयाच्या अगदी समोर गेली ६१ र्वष उभे असलेल्या या उपाहारगृहात महाराष्ट्रीय आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात. इथली इडली प्रसिद्ध आहे. तिच्या आत, फ्लॉवर, मटार, गाजर यांचं चविष्ट सारण असतं. सोबतच डाळीची फोडणी असलेली ओल्या नारळाची चटणीसुद्धा झक्कास लागते. इथले उपीट, पोहे, खिचडीसुद्धा लोकप्रिय आहेत, शिवाय गेली ६१ र्वष आपली चव टिकवून आहेत.

व्यंजन परोठा हाउस

इथे ४० प्रकारचे निरनिराळे पराठे खायला मिळतात. साजूक तुपातल्या या पराठय़ांच्या जोडीला रायता, राजमा मसाला, दाल मखनी, पनीर मसालादेखील असतात.

मधूची गाडी

सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच्या गल्लीत उभी असलेली मधूची गाडी ही स. प. महाविद्यालयातील खवय्यांचं हक्काचं ठिकाण आहे. या गाडीवर रोज वेगवेगळे मेन्यू असतात पण त्याची चव मात्र वर्षांनुर्वष तश्शीच असते. सकाळी न्याहारीसाठी इथे पुणेकर एकत्र येतात. मधू म्हणजे मधुकर शानबाग. कोकणी-पुणेरी माणूस. त्याच्याकडची मटार उसळ म्हणजे, अनेकांची लाडकी. पाश्चिमात्य पदार्थाच्या नादात मटार उसळीसारख्या गोष्टी मिळणारी ठिकाणं कमी होत चालली आहेत. पण इथे मात्र अजूनही आलं, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचं विशिष्ट पद्धतीने वाटण करून तयार केलेली उसळ दिली जाते. सोबतच आहेत, त्यांचे खास मसाले. सोबतच इथे इडली सांबार, उडीद वडा सांबार, काकडी खिचडी, कोबीची भजी, अननसाचा गोड शिरा चाखायला मिळतो. संकष्टी चतुर्थीला मात्र केवळ काकडी खिचडी आणि उपवासाची मिसळ हे दोनच पदार्थ मिळतात.

नागनाथ भुवन

एखाद्या जड लेक्चरनंतर तरतरी मिळण्यासाठी स.प.महाविद्यालयातील विद्यार्थी वाट धरतात, नागनाथ भुवनची. इथला आलं, गवती चहाचा मसालेदार चहा दिल खूश करून टाकतो. सोबत इडली सांबार, मेदूवडा सांबार, कांदेपोहेदेखील इथे फर्मास मिळतात.

न्यू रिफ्रेशमेंट हाउस

सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावरील न्यू रिफ्रेशमेंट हाउसची लज्जत काही वेगळीच आहे. मिसळ, बटाटा टोस्ट, घावन, बटाटा वडा, कचोरी, थालिपीठ एकदम झक्कास. इथली मिसळ एकदम फर्मास असते. फोडणीचे पोहे, बटाटा भाजी, शेव आणि त्याच्यावर मटकीची उसळ, खोबऱ्याची र्ती अशा थाटाची मिसळ खवय्याला आनंदिीत करून टाकते. बटाटय़ाचं फोडणी न दिलेलं सारण हे इथल्या वडय़ाचं वैशिष्टय़.  पोहे, उपीट, भजी, मटार पॅटिस, मका पॅटिस, घावन, मटार उसळ स्लाइस किंवा मटार उसळ पुरी, कोथिंबीर वडी वगैरे पदार्थ खाण्यासाठी स. प. महाविद्यलयातील विद्यर्थी आवर्जून इथे येतात. इथले बटाटा टोस्ट, ओल्या खोबऱ्याची गोड कचोरी, बटाटा भाजी, दाण्याची आमटी, बटाटा चिवडा यांची उपवासाची मिसळ, उपवसाचे घावन या उपवासाच्या पदार्थाचा आस्वाद सदासर्वकाळ घेतला जातो.

खादाडी (जिव्हातृप्ती)

सदाशिव पेठेत भरत नाटय़ मंदिरासमोरून फेरी मारताना खादाडी हे टिपिकल मराठमोळं नाव तुम्हाला मोहित करेल. चमचमीत पापड भाजी हा इथला एक अप्रतिम खाद्यप्रकार आहे. मैद्याच्या पापडावर बटाटा भाजी, चिंचेची चटणी, शेव, कांदा आदींचा वापर करून हा चविष्ट प्रकार तयार होतो. चमचमीत कटवडा, तिखटमिठाचा सांजा, साजूक तुपातील शिरा किंवा ब्रेड चीज मसाला हे आणखी काही  प्रकार प्रसिद्ध आहेत. शिवाय मिसळप्रेमींसाठी अगदी टिपिकल पद्धतीची मिसळही इथे मिळते. बटाटा भाजी, मटकी उसळ, शेव, फरसाण, रस्सा अशी साग्रसंगीत मिसळ. इथली मिक्स भजींची प्लेटही प्रसिद्ध आहे. कांदा, बटाटा, पालक, कारलं, मूग, ओवा, घोसाळं, केळं, चीज, पनीर, मिरची अशी विविध प्रकारची भजी इथे मिळतातच.  इथला ब्रेड-लोणी-साखरही पोरांना आवडीची आहे.