मध्यंतरी जगभरातील फॅशन विश्वात एक महत्त्वाचा विषय चर्चेत आला होता. तसा हा विषय फार जुना, पण आतापर्यंत कोणीच याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. मुद्दा होता, फॅशन नकलाकारांचा. एरवी पायरसी, कॉपी, नक्कल हे शब्द कलाक्षेत्राला नवीन नाहीत. अगदी एखाद्या बडय़ा चित्रकाराच्या चित्रापासून ते नवीन मोबाइल तंत्रज्ञान किंवा डिझाइनपर्यंत प्रत्येक क्षेत्राला नकलाकारांची वाळवी लागलेली आहे. सिनेमा, संगीत क्षेत्रातील पायरसीच्या गप्पा आपण नेहमीच ऐकतो. शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांमध्ये इंटरनेटवर सिनेमाची कॉपी उपलब्ध होते. सिनेमामधील गाणी, गायकांची गाणी मोफत उपलब्ध करून देणाऱ्या असंख्य साइट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. अगदी कुकिंगच्या क्षेत्रालासुद्धा नकलांचा प्रश्न भेडसावतो आहे. एखादं हॉटेल प्रसिद्ध झाल्यावर त्या नावाने उघडली जाणारी बनावट हॉटेल्स यांच्या कथा काही नवीन नाहीत. मध्यंतरी टीव्हीवर प्रसिद्ध फुडचेनच्या रेसिपी चोरून बनविणाऱ्या शेफचा शो तुफान लोकप्रिय झाला होता. थोडक्यात ही समस्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे.

फॅशन विश्वालाही वर्षांनुवर्षे नकलाकारांना सामोरे जावे लागते आहे. सध्या हा विषय ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे गेल्या काही सीझनमध्ये बडय़ा डिझायनर हाऊसकडून आलेल्या कलेक्शनच्या हुबेहूब नक्कला करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी पडद्याआड राहणारे हे नकलाकार आता उघडपणे स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करू लागले आहेत. कित्येकदा किमतीच्या तफावतीमुळे मूळ डिझायनरपेक्षा अशा बनावट कलेक्शन्सना ग्राहक संख्या जास्त असते.

नुकतेच फॅशन डिझायनर रोहित बालच्या कलेक्शनची नक्कल एक डिझायनर परदेशात विकत होती, असे आढळून आले. सोशल मीडियावर तिच्या ब्रॅण्डचे डिझाइन रोहित बालने पाहिले आणि हा मुद्दा चव्हाटय़ावर आला. अर्थात कित्येक डिझायनर्सकडून टीका होऊनही डिझाइन्स मागे न घेण्याची मुजोरी त्या फॅशन डिझायनरकडे होती. कारण अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या डिझाइनचौर्याबाबत कुठलाही कायदा जगभरात अस्तित्वात नाही. डिझाइन कॉपीराइटचा कायदा आहे, परंतु त्याची प्रक्रिया किचकट आहे. तसेच डिझायनरने प्रत्येक सीझनमध्ये त्याच्या कलेक्शनमधील सगळ्या डिझाइन्सना कॉपीराइट करून घ्यायचे ठरविल्यास ते खर्चीक आणि वेळखाऊ  ठरते. त्यामुळे कलेची चोरी हा केवळ नीतिमत्तेचा मुद्दा म्हणून शिल्लक राहतो. मध्यंतरी याबाबतीत डिझायनर मसाबा गुप्ताने गमतीशीर किस्सा सांगितला होता. दिल्लीच्या एका दुकानात तिला स्वत:च्या प्रिंट्सची नक्कल केलेले कपडे आढळले. दुकानदार तिला ओळखत नसल्याने ते कपडे तिला विकायचा प्रयत्न त्याने केला. हे प्रकरण नित्याचंच असल्याचं बरेच डिझायनर मान्य करतात. ‘प्रादा’, ‘लुई वितोन’, ‘अर्मनी’, ‘गुची’पासून थेट मनीष मल्होत्रा, सब्यासाची, रितू कुमार या भारतीय डिझायनर्सपर्यंत जगभरातील सगळ्याच बडय़ा ब्रॅण्डच्या कलेक्शन्स नकला जगभरात उपलब्ध असतात. कित्येक छोटे ब्रॅण्ड्स या नकलांच्या साहाय्याने मोठे झालेले असतात. मध्यंतरी ‘झारा’ ब्रॅण्डवरसुद्धा एका चित्रकाराने आपली चित्रं परवानगीशिवाय प्रिंट्स स्वरूपात कपडय़ांवर वापरल्याचा आरोप केला होता. ‘इन्स्टाग्राम’मुळे हे प्रकरण जगासमोर आलं.

गेली कित्येक वर्षे हा प्रश्न जगभरात चर्चिला गेला. पण सध्या याला मोठय़ा प्रमाणावर वाचा फुटण्याचं कारण हे सोशल मीडिया आहे. आजच्या घडीला प्रत्येक बडा ब्रॅण्ड प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करतो. आपली कलेक्शन त्यावर टाकतो. त्यामुळे साहजिकच जगभरात सगळ्यांकडे ही कलेक्शन्स पोहोचतात. ब्रॅण्डचे चाहतेसुद्धा अशा नकलांकडे संबंधित डिझायनरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. एखादी व्यक्ती ई-मेल, फोन किंवा पत्राचा जवाब देत नसेल, तर त्याकडे फारसं कोणाचं लक्ष वेधलं जात नाही. पण एखाद्या ट्वीट, पोस्टवर संबंधित व्यक्तीने उत्तर न दिल्यास जगाचं लक्ष वेधलं जातं. त्यामुळे सोशल मीडियाची डिझायनर्सना मदतच होते.

भारतातील सगळ्या बडय़ा शहरांमध्ये बनावट डिझायनर कपडे, अ‍ॅक्सेसरीज, शूज, बॅग्स, ज्वेलरी अगदी सहज मिळतात. अगदी मुंबईचा विचार केल्यास स्ट्रीट शॉपिंग मार्केटमध्ये या वस्तू सहज उपलब्ध असतात. आतापर्यंत आपण खरेदीही केलेल्या आहेत. धारावीसारख्या भागांमध्ये छोटय़ा कारखान्यात या वस्तू बनविल्या जातात. बँकॉक, बांगलादेशसारख्या देशांमध्ये जगभरातील बडय़ा ब्रॅण्डचे कपडे, बॅग्स बनविल्या जातात. या कारखान्यात छोटय़ा चुका असलेल्या, ब्रॅण्डने नाकारलेल्या वस्तू बाजारात कमी किमतीत विकल्या जातात. तर काही ब्रॅण्ड बिनदिक्कत इतर डिझायनर्सचे कलेक्शन चोरून स्वत:ची कलेक्शन्स तयार करतात. मनीष मल्होत्रासारख्या बडय़ा डिझायनर्सचे लेहेंगे, साडय़ा यांच्या नकलांची मोठी बाजारपेठ दिल्लीमध्ये आहे. लग्नाच्या मोसमात या दुकानामध्ये तोबा गर्दी असते.

नकलांची मोठी व्यापरपेठ जगभरात आहे. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न वैयक्तिक पातळीवर डिझानर्स, ब्रॅण्ड्स करत असतात. पण त्यांना कोणत्याही कायद्याचा आधार नसल्याने त्यांचे हातही दगडाखाली असतात. या वस्तू विकत घ्याव्या की नाही हा ग्राहकाच्या नैतिकतेचा प्रश्न असतो. मूळ ब्रॅण्डपेक्षा स्वस्तात मिळत असल्याने या वस्तूंची मागणी जास्त असते. सिनेमा चित्रपटगृहात पाहावा की टोरंटवर फुकट डाऊनलोड करून ही निवड पाहणाऱ्यावर असते तसंच फॅशनचं असतं. तरी मध्यंतरी जगभरातील टोरंट साइट्स बंद केल्या गेल्या. अशा प्रकारचे र्निबध फॅशन क्षेत्रावर टाकता येत नाहीत. कुकिंग क्षेत्राप्रमाणे या वस्तूंच्या कमी दर्जामुळे तब्येतीची हानी होणार नसते. फार तर वस्तू लगेच खराब होईल. त्यामुळे या वस्तू घ्याव्या की नाहीत हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे ग्राहकांनी अशा नकलाकारांकडे पाठ फिरवून खऱ्या डिझानर्सना पाठिंबा दिल्याशिवाय ही समस्या सुटू शकणार नाही.

viva@expressindia.com