फॅशनेबल कपडे- विशेषत: वेस्टर्न आउटफिट्स घालायचे असतील, तर शिडशिडीत बांधाच हवा, असं आपल्याकडे अजूनही मानलं जातं. याला कारण मजबूत बांध्याच्या मुलींसाठी फॅशन अस्तित्वातच नव्हती. आता मात्र चित्र पालटतंय.

‘ज्या बारीक नसतात, त्या जाडच असतात’.. आगामी ‘वजनदार’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारी ही टॅगलाइन. ती जाडी आहे, असं सरसकट विधान ऐकणाऱ्यांना विचार करायला लावणारी. जाड म्हणजे नेमकं काय? लठ्ठ असणं, जाड दिसणं, शिडशिडीत नसणं, प्लस साइझ असणं आणि बेढब दिसणं याबाबत प्रत्येकाच्या मनाचे ठोकताळे वेगळे असतात. शिडशिडीत असावं अशी इच्छा असणाऱ्या मजबूत बांध्याच्या मुलीला आपण फार जाड आहोत असंच वाटत असतं. मध्यंतरी परिणिती चोप्रा या अभिनेत्रीने व्यायाम करून, कोणतंही औषध न घेता, शस्त्रक्रिया न करता शिडशिडीत होऊन दाखवलं होतं. तिचं जाड असणं हे ती बारीक झाल्यावरच जास्त गाजलं होतं. भूमी पेडणेकर या दुसऱ्या एका अभिनेत्रीची चर्चा कशी छान बारीक झाली आहे, असं म्हणतच वाढते आहे.

अलीकडच्या काळात तयार झालेल्या सौंदर्याच्या ठोकताळ्यानुसार बारीक, शिडशिडीत बांध्याची मुलगीच सुंदर. सौंदर्यस्पर्धा आणि फॅशन रॅम्पमधून हे शिडशिडीत बांध्याचं आणि ‘साइझ झिरो’चं वेड आलं असं म्हणतात. या व्याख्येत न बसणाऱ्या कुठल्याही मुलीला सर्वप्रथम न्यूनगंडाचाच त्रास होतो. मी फॅशनेबल कपडे घालू शकत नाही, माझ्या साइझचे कपडेच मिळत नाहीत, मला कपडय़ांमध्ये चॉइसच नसतो, कायम ढगळ कपडे घालावे लागतात, ही या मुलींची नेहमीची तक्रार असते. शिवाय लठ्ठ मुलींना इतरांचे टोमणे ऐकावे लागतात ते वेगळेच. अंगाबरोबर मापाचे तयार कपडेच मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा या स्थूल मुली सैलसर कपडे घालतात आणि आणखी जाड दिसतात. भोंगळ दिसतात.

स्थूलता हा सौंदर्याच्या साच्यात न बसणारा पलू असला तरीही आज अनेक ब्रँड्स नवनवीन ‘प्लस साइझ’ ट्रेंड्स बाजारात आणत आहेत. यंदा झालेल्या लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१६ मध्ये प्रथमच स्थूल मॉडेल्सनी रॅम्पवॉक केला. प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिट्ल शिल्पाने या फॅशन शोचं स्टायलिंग केलं होतं. या सो कॉल्ड लठ्ठ मॉडेल्सनी वन पीस ड्रेसपासून मिनी स्कर्टपर्यंत सर्व फॅशन आत्मविश्वासाने सादर केल्या आणि त्यांचा हा रॅम्पवॉक गाजला. ‘ऑल’ या प्लस साइझ ब्रँडने डिझाइन केलेले कपडे त्यात शोकेस करण्यात आले होते. ‘ऑल’खेरीज मस्टर्ड क्लोदिंग, एक्समॅक्स , पँटालून्स -अल्टो मोडा प्लस साइझ फॅशन, सॅसी सोडा असेही केवळ प्लस साइझ कपडय़ांचे अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत.

वेस्टर्न आउटफिट्स आपल्याकडच्या मजबूत बांध्याच्या मुलींना चांगले दिसत नाहीत, हा आपल्याकडचा एक गैरसमज. याला कारण म्हणजे त्यांच्या साइझचा विचार करून वेस्टर्न आउटफिट्स डिझाइन केलेच जात नाहीत. युरोपीयन स्त्रिया आणि भारतीय स्त्रिया यांच्या ठेवणीत, बांध्यात मुळातच फरक आहे. हा विचार न करता युरोपीयन स्टँडर्डप्रमाणे बनवलेले ड्रेस घातले तर मोठय़ा साइझचे कपडेच घ्यावे लागतात आणि ते भारतीय स्त्रियांना भोंगळ दिसतात.

प्रसिद्ध डिझायनर वेन्डेल रॉड्रिक्सने यावर उपाय म्हणून भारतीय स्त्रियांसाठी वेगळा साइझ चार्ट तयार केला. या साइझ चार्टसाठी ते गेली काही वर्षे अभ्यास करीत होते. फॅशनेबल राहण्यासाठी शिडशिडित बांध्याची आवश्यकता नाही हेच या सगळ्यातून दिसतं. प्लस साइझ ब्रँड्सची संख्या लक्षात घेता, सौंदर्याच्या ठोकळेबाज संकल्पनेला मोडीत काढल्याचा प्रत्यय येतो.

सौंदर्याचं वजन

सौंदर्याच्या साचेबद्ध व्याख्येला मोडीत काढून शारीरिक सौंदर्यापलीकडच्या स्त्रीसौंदर्यावर आगामी ‘वजनदार’ चित्रपटात भाष्य केलं आहे. यासंदर्भात ‘वजनदार’चे दिग्दर्शक सचिन कुंडलकर म्हणाले, ‘‘आपल्या मनात सौंदर्याच्या काही कल्पना असतात. नटनटय़ांचं सौंदर्य तेच खरं सौंदर्य अशी आपली मानसिकता झालेली असते. त्यामुळे आपण जाड आहोत, वर्ण काळा आहे याबद्दल आपल्या मनात न्यूनगंड तयार होऊन वाढत राहतो. या ठोकताळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण सुंदर असतो. या गोष्टीवर प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा आहे.’’

या चित्रपटासाठी प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी खरोखरच वजन वाढवलं होतं. वजन वाढवल्यानंतर स्थूल व्यक्तींच्या मनात काय काय चालू असतं ते आम्ही अनुभवू शकलो, असं या दोघींनी ‘लोकसत्ता व्हिवा’शी बोलताना सांगितलं.

‘‘या सगळ्या वजन वाढवण्याच्या आणि कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये प्रिया म्हणून मला माझा फिटनेस सापडला. वजन वाढवणं हा निर्णय धाडसी होता. मला दीड महिन्यात १६ किलो वजन वाढवायचं होतं. पण ते वाढवत असताना मी कोणत्याही पद्धतीने माझ्या शरीराला हानी पोचेल असं काही केलं नाही. वजन वाढवत असताना माझ्या आखून दिलेल्या डाएटबरोबरीनेच भरपूर व्यायाम करत होते. वजन वाढलेलं असतानाचा अनुभव निश्चितच फार छान नव्हता. तेव्हा माझे पाय खूप दुखायचे. माझं वजन मी कुठल्या कारणासाठी वाढवत आहे हे माहीत असूनही माझी चीडचीड होत होती,’’ असं प्रिया म्हणाली.

‘‘माझ्या ब्रॉड बॉडी स्ट्रक्चरमुळे मला चित्रपटांसाठी काही वेळा नाकारलंसुद्धा गेलं होतं. प्रथमच मला कुठल्या चित्रपटासाठी वजन वाढवायची वेळ आली. माझ्या चेहऱ्यावर आणि पोटावर वजन दिसायला हवं होतं म्हणून मी क्षारयुक्त पदार्थाच्या डाएटवर होते. पाणीपुरीसारखे हे सगळे माझे खूप आवडते पदार्थ असल्यामुळे मी खूश होते. वजन वाढल्यावरसुद्धा मी  कुठल्या कारणासाठी वजन वाढवलंय हे मला माहीत होतं म्हणून मी त्याबद्दल आनंदीच होते, नंतर पद्धतशीर व्यायाम आणि डाएट करून मी वजन कमी केलं,’’ असं सईने सांगितलं.