23 January 2018

News Flash

कॅलरी मीटर : उपासाचं डाएट

झोप, भूक, आणि तहान या तीन पूरक गोष्टींना आरोग्य राखण्यात महत्वाचे स्थान आहे.

लावंण्या रास्ते | Updated: August 4, 2017 2:51 AM

उपास करण्याला आणि आपण कसा उपास करतो हे सांगण्याला विविध पदार्थामुळे विशेष महत्व प्राप्त होते

श्रावण महिना सुरू होतो. पावसाचा आनंद घेता घेता सण समारंभांचाही वर्षांव सुरू होतो. आपल्याकडे परंपरा चालीरीती बघता सगळ्यात जास्त उपास आणि व्रतवैकल्ये याच महिन्यापासून सुरू होतात. आधुनिक दृष्टय़ा विचार करता पावसाळ्यात कॅलरी बर्न करण्याचं सार्वजनिक साधन म्हणजे चालणं, फिरणं, पळायला जाणं, ग्राउंडवर किंवा एखाद्या बागेत अगदी हास्यक्लबसाठी जाणंसुध्दा कमी होतं. स्विमिंग, सायकलिंग बंद झाल्यावर आता ३-४ महिन्यांसाठी जिम लावावी का असा फक्त विचार होतो..  शिवाय वेगवेगळे सण, श्रावणातले (फराळ खाऊन)उपास, थोडय़ा सुट्टय़ा जास्त असल्यामुळे होणारी गेट टू गेदर्स पोटाला तृप्ती देणारे असतातच. एकंदरीत काय हे चार महिने खाऊ नपिउन सुखी राहण्याचे असतात. मग हिवाळ्यात व्यायाम आणि तब्येत करण्याचा संकल्प केला जातो. चांगले आरोग्य राखण्यासाठी खरे म्हणजे प्रत्येक दिवशी थोडे प्रयत्न केले पाहिजेत. वर्षभर त्यात सातत्य ठेवले पाहिजे. हवामानानुसार त्यात बदल झाले पाहिजेत. कधी व्यायामात तर कधी आहारात बदल व्हायला हवेत. यानिमित्ताने उपासातील कॅलरीचा मीटर कसा सांभाळायचा ते पाहूयात..

उपास

उपास करण्याला आणि आपण कसा उपास करतो हे सांगण्याला विविध पदार्थामुळे विशेष महत्व प्राप्त होते. एकाच दिवशी साबूदाण्याची खिचडी, थालिपिठे, श्रीखंड, बासूंदी, रताळे- बटाटय़ाची भाजी- किस, शेंगदाण्याची आमटी, चिक्की ,किती पदार्थ सांगावे?  ज्यातून फक्त तेल, कबरेदके यांचे प्रमाण वाढते आणि दर उपवासाला थोडे वजन पदरी पडते. याच उपासाला कॅलरी डिफिशियेंट करायला आणि खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे पोटाला विश्रांती द्यायला सुरूवात करायला हवी.

रात्रीच्या झोपेनंतर जसे शरीर पुढील दिवसाची कामे करायला ताजेतवाने होते तसेच पचनेंद्रिये सुध्दा या विश्रांतीनंतर जोमाने कार्य करायला सज्ज होतात. पूर्वीपासून परिचयाचे असलले ‘लंघन’ थोडेसे मॉडीफाय केले की त्याला ‘लो कॅलरी’ डाएट किंवा ‘डिटॉक्स’ डाएट नक्की म्हणता येईल.

झोप, भूक, आणि तहान या तीन पूरक गोष्टींना आरोग्य राखण्यात महत्वाचे स्थान आहे. झोपेमुळे आपल्याला तरतरी येते, तर शारीरिक कष्टामुळे होणारी झीज भरून काढण्यासाठी आपण खातो. भूक-तहान या गोष्टी योग्य असतील तरच झोप चांगली लागते. तहान लागल्याची भावना आपल्याला पटकन कळते आणि त्यावेळी आपण पाण्याव्यतिरिक्त सहसा काही पित नाही. पण खाण्याचे चोचले पुरवण्यामुळे खरी भूक काय असते आपल्याला माहीत नाही. बराच वेळ उपाशी राहियानंतर अन्न घेताना जेव्हा कुठलेही पदार्थ आता रूचकर लागतील ही भावना येते ती खरी भूक. यासाठी उपवासाला महत्व दिले गेले आहे.

पचनेंद्रियांना कष्ट कमी देणारे – पचनासाठी हलके पदार्थ खाणे हा त्यामागचा हेतू.

शरीरातील अतिरिक्त साठय़ांचा वापर व्हावा/ शरीराची स्वच्छता व्हावी हेही एक कारण.

यावर उपाय म्हणजे लो कॅलरी डाएट. नको असलेल्या पोषकद्रव्यांची कमतरता- जास्तीचे तूप, तेल, साखर, जास्तीची कबरेदके, अतिरिक्त प्रथिने कमी करायची आणि जीवनसत्वांचे अधिक सेवन करायचे जी असलेल्या साठय़ाचा वापर करायला आणि नको ते बाहेर टाकायला मदत करतील.

काही ठिकाणी भाजके पदार्थ खाऊन उपवास करायची पद्धत आहे. असा उपास मधूमेहींनी करण्यास हरकत नाही. परंतु त्यांनी देखील दूध, फळे, कोशिंबीर आणि भरपूर पाणी यांचा समावेश प्रामुख्याने करावा. असा खरंच कमी कॅलरी खाऊन उपवास असेल तर आठवडय़ातून एकदा नक्की करावा.

चातुर्मास करा आणखी हेल्दी

चातुर्मासात मांसाहार शक्यतो कमी घेतला जातो. घरीच सणांच्या निमित्ताने वेगवेगळे जेवण होते आणि बाहेर खाण्याचे प्रमाणही आपोआपच कमी होते( आताशा पावसाळ्यात हायजीनचा जास्त विचार होतो आणि बाहेर पटकन पाणीपुरी खाण्यावरही ताबा ठेवला जातो)

पावसाळ्यात हवा कुंद होते. पचनशक्ती कमी होते(अग्नीमांद्य), त्यामुळे जास्ती उपास करावेत अशी आपल्या पूर्वजांची संकल्पना होती. कांदा, वांगी असे पचनाला जड, वातूळ पदार्थ वज्र्य करण्यामागचा हाच हेतू.

वजन कमी करणाऱ्यांना किंवा वजन आहे तेवढेच ठेवण्यासाठी याच सगळ्या गोष्टी पर्वणी ठरू शकतात. फक्त त्या दृष्टीने विचार करायला हवा. वरती सांगितल्या प्रमाणे डिटॉक्स डाएटचा अवलंब करू शकता.

 • आठवडय़ातून एकदा संपूर्ण दिवस फक्त दूध, फळे, भाज्या आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश करावा.
 • रोज गरम सूप, कढी, उकडलेल्या भाज्या, कडधान्ये/ उसळ आहारात असावी. एखाद्या संध्याकाळी उसळ/ उकडलेल्या कडधान्यांचं सॅलड जेवण म्हणून घेऊ शकता.
 • चातूर्मासात शक्यतो कच्या भाज्या/ पालेभाज्या कमी घ्याव्यात किंवा त्या चांगल्या शिजवून घ्याव्यात. पावसाळ्यात कमी धुतले गेल्याने किंवा जंतू भाज्यांवर तसेच राहिल्याने लहानसहान आजारांना निमंत्रण मिळू शकते.
 • सणांच्या दिवसानंतर किंवा जास्तीचा आहार घेतल्यानंतरचा एक दिवस डिटॉक्स डाएट आवर्जून करावे.
 • बाहेर जाऊन व्यायाम होत नसेल तर घरच्या घरी सूर्यनमस्कार, स्ट्रेचींग, फ्लेक्सिबिलीटीचे सोपे व्यायाम करावेत. जिम मध्ये जात असाल तरी या गोष्टींचा अवलंब करायला हरकत नाही.

सगळे पदार्थ खाऊनही फिट राहता येतं. त्यासाठी मनावर सॉरी ‘जिभेवर’ प्रमाणाचा ताबा मिळवता यायला हवा.

यासाठीचा आणखी एक उपाय म्हणजे निर्वीशीकरण किंवा डिटॉक्सिफिकेशन. अश्या प्रकारचं डाएट करणं उपासाच्या दिवशी आपोआप आणि विशेष कष्ट न घेताही करता येईल.

 • उपासाच्या दिवसाची सुरुवात चहा-कॉफी ऐवजी कोमट पाणी आणि एखादे फळ/ एक कप दूध / फळ घालून केलेल्या मिल्कशेकनी करावी.
 • दिवसभरात शक्यतो फळे, फळांचा रस, दूध, सरबते अश्या गोष्टी जास्त घ्याव्यात.
 • गोड आणि तळलेले किंवा जे करताना तेल-तूप जास्त घालावे लागते असे पदार्थ कमी करून उकडलेले, वाफवलेले पदार्थ जास्त घ्यावेत. उदा. वेफर्स, बटाटय़ाचे पापड, चिक्की, गुडदाणी, वडे , चिवडा असे पदार्थ टाळावेत.
 • साबूदाण्याऐवजी वरीचे तांदूळ, शिंगाडय़ाचे पिठ , उपवासाची भाजणी, राजगिऱ्याच्या लाह्य़ा यांचा वापर करावा.
 • भरपूर दही, ताक, दूध, पनीर यांचा समावेश करावा.
 • काकडीची कोशिंबीर, सुरणाची भाजी, कोथिंबीर यांचा जेवणात प्रामुख्याने समावेश करावा.
 • खोबरे आणि शेंगदाणे यांचा वापर कमीत कमी करावा. दह्य़ातली चटणी हा पर्याय उत्तम ठरेल.
 • ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी शक्यतो उपासाच्या दिवशी जास्तीतजास्त पाणी, दूध, फळे, राजगिऱ्याच्या लाह्य़ा यांचा समावेश करावा.
 • नेहमीच्या आहारापेक्षा थोडा कमी आहार घ्यावा.
 • पाण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा दुप्पट करावे.

लावंण्या रास्ते viva@expressindia.com

First Published on August 4, 2017 2:51 am

Web Title: fasting diet fast
टॅग Fasting Diet
 1. No Comments.