लठ्ठ व्यक्तीला फॅशन करायचा अधिकारच नाही, अशी आपली समजूत. अर्थात ही मानसिकता बाजारपेठेनेच करून दिलेली आणि आता बाजारपेठच त्यावरचं उत्तर शोधतेय- प्ल स साइजचे कपडे आणून. खरं तर लठ्ठपणा लपवण्यापेक्षा आपलं दिसणं साजरं करायची मानसिकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठीच काही टिप्स..

२०१७ ची घटना.. अगदी नवा जमाना, बदलतं युग, नवा विचार, बदलती मानसिकता वगैरेंचा काळ. त्यातली एक बातमी. हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका एका मुलाखतीदरम्यान काही प्रश्नांवर प्रचंड चिडली. ‘माझं बाळंतपण होऊन आत्ताशी ४५ दिवस झाले आहेत आणि तुम्ही माझ्या वाढलेल्या जाडीवर चर्चा करताय? मी लठ्ठ दिसतेय म्हणून घरी बसलं पाहिजे, बाहेर पाऊल टाकू नये, असं म्हटलं जातंय. का? माझं जाडेपण मी स्वीकारलंय, ते साजरं करतेय आणि हेच या काळात अपेक्षित नाही का?’ हा रोखठोक सवाल तिने समोरच्याला विचारला. मध्यंतरी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही मान्य केलं होतं की, गरोदरपणानंतर तिच्या सुटलेल्या फिगरविषयी किंवा लठ्ठपणाबद्दल इतकं बोलल गेलं की, तिला बाहेर पडायची भीती वाटायची.

एका जगप्रसिद्ध फिटनेस ब्रँडनं नुकतच प्लस साइज कपडय़ांचं कलेक्शन बाजारात आणलं आहे. त्याचं सगळ्यांकडून स्वागत झालंच, पण त्या खालोखाल या कलेक्शनबद्दल लोकांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया वाचल्यास ‘अशी कलेक्शन्स खरं तर जाडय़ा व्यक्तींसाठी फार महत्त्वाची आहेत, कारण त्यांना व्यायामाची किती गरज आहे’, याचे दाखले कित्येकांनी दिले आहेत.

या घटनांमधील एक समान धागा म्हणजे ‘लठ्ठपणा’ आणि त्या अनुषंगाने एकूणच कपडे, व्यक्तीचं ‘दिसणं’ याबद्दलची लोकांची मानसिकता. खरं तर जगभरातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येच्या मानगुटीवर बसलेली ही समस्या. अनियमित कामाच्या वेळा, बैठी कामं, तेलकट – तुपकट खाणं, व्यायामाचा अभाव या सगळ्याने येणारा लठ्ठपणा ही समस्या आहेच आणि त्यासाठी शरीराला शिस्त लावण्याची गरज आहेच. पण मुळात इथे मुद्दा येतो, लठ्ठपणासोबत येणाऱ्या न्यूनगंडाचा. आपण लठ्ठ आहोत, वजन वाढलंय म्हणजे आपल्याला काहीतरी भयंकर आजार जडलाय अशी त्यांची आणि समोरच्याची मानसिकता होते. मग अमुक ड्रेस घालू नकोस, ब्राइट रंग नकोत. फिटेड कपडे चांगले नाही दिसत, गडद मेकअप नको, केस बांधू नको, चेहरा मोठा दिसतो, हिल्स कशा घालणार, लेअरिंग करू नको जाडी दिसशील असे कित्येक सल्ले लठ्ठ व्यक्तीला दिले जातात. मुळात त्यांना चांगलं दिसण्याचा, नवीन ट्रेण्ड फॉलो करायचा हक्कच नाही आता, अशी समोरच्यांची समजूत होते. मग त्यातूनच करिनाने मूळ फिगरमध्ये परत येईपर्यंत घराबाहेर पडूच नये, या मानसिकतेपर्यंत लोकांची मजल पोहचते. कारण तिच्या वाढलेल्या वजनाने त्यांच्या नजरेतील तिच्या ‘नटी’च्या छबीला धक्का पोहचलेला असतो.

अर्थात ही मानसिकता तयार करण्यात बाजारपेठाही तितक्याच जबाबदार आहेत. अगदी दुकानात शिरताना दिसणारे आकर्षक कपडय़ांनी सजविलेल्या पुतळ्यांपासून ते रॅम्पवरच्या मॉडेल्सपर्यंत उंच, कमानीय शरीरयष्टीच्या स्त्रिया पाहायला मिळतात. त्यामुळे असे सुंदर कपडे आणि मेकअप मिरवायचा असेल तर छान बारीक, शिडशिडीत आणि उंच असलंच पाहिजे, ही ठोकळेबाज समजूत असते. अगदी मोबाइलमधून सेल्फी काढला तरी त्याला चार अ‍ॅप्समध्ये जाऊन वेगवेगळे टचअप देऊन ‘देखणं’ करण्यात धडपडणाऱ्या या युगात जाडेपणा म्हणजे निषिद्धच. इथून आपल्या शरीराबद्दलच्या न्यूनगंडाची सुरवात होते. एखादा ड्रेस घातल्यावर आरशात दिसणाऱ्या आपल्या छबीची तुलना जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या, आपलं राहणीमान, वागणूक यांच्याशी काहीही संबंध नसलेल्या अनोळखी मॉडेलच्या छबीशी केली जाते. मग आपले पाय किती जाड दिसताहेत, चेहरा फुगीरच वाटतोय, पोट बाहेर दिसतंय, हे इतरांना कदाचित जाणवणारही नाहीत इतके असंख्य दोष स्वत:मध्ये दिसू लागतात. मुळात ही तुलना करण्यापूर्वी मॉडेल्स, अभिनेत्रींचं बारीक दिसणं हे त्यांच्या कामाची गरज असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. कित्येकदा या गरजेपोटी मेकअप, कॉस्मेटिक सर्जरी यांची गरजही त्यांना पडते. या चाचण्यांमधून गाळलेल्या तसबिरीवरसुद्धा संगणकाच्या प्रोग्राम्समार्फत टचअप होतात. त्यातून तयार झालेली छबी आपल्यासमोर असते. तिच्यात आणि तुमच्या नैसर्गिक दिसण्यात फरक असणारच.

दुकानातसुद्धा विशिष्ट साईज सोडल्यास प्लस साईज कपडय़ांची विचारणा केल्यास एक तर त्यांच्याकडे त्या मापाचे कपडे नसतात किंवा असल्यास त्यात निवडीचे पर्याय नसतात. कित्येकदा हे प्लस साइज कपडे इतके बेढब असतात, की ड्रेसचा आकारच बिघडलेला असतो. यावर लुझ ड्रेस फिटिंगमध्ये करून घेणं सोप्प असतं, असं म्हणत हे ढगळ कपडे दुकानदार माथी मारतो. पण अशी फिटिंग करताना एकूणच ड्रेसचा आकार बिघडून जातो.

साडीसोबत नेमक्या मापाचा ब्लाउज पीस दिलेला असतो. या कापडाला अनेकदा नेक किंवा सिव्हच्या आकाराची नक्षीदार पट्टी, लावलेली असते. प्लस साइजच्या स्त्रियांना ही पट्टी गळ्याभोवती किंवा स्लीव्हला पुरेशी नसते. त्यामुळे जादाचा कोरा कपडा जोडलेला दिसतो. प्लस साइजचा विचार करून पट्टी थोडी मोठी करण्याचा विचार ब्रँडला कधीच महत्त्वाचा वाटत नाही. हीच गोष्ट सलवार सूटच्या कपडय़ाबाबतसुद्धा होते. त्यामुळे अशा परिस्थितीत प्लस साइज लोकांसाठी वेगळे डिझायनर ब्रँड बाजारात आले किंवा एखाद्या डिझायनरने प्रयोग म्हणून एखाद्या प्लस साइज मॉडेलला रॅम्पवर सादर केल्यास याचा मोठा गाजावाजा होतो. पण मुळात इतक्या वर्षांत ब्रँड्सनी या गटाकडे पुरेसं लक्षच दिलं नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

या सगळ्यातून वाट काढायची असेल, तर मुळात आपल्या शरीराबद्दल सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. आपलं दिसणं साजरं करायची मानसिकता निर्माण केली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक ‘नाही’ला ‘का?’ विचारायचं धाडस केलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झाल्यास, प्लस साइज व्यक्तींनी आडव्या पट्टय़ांचे प्रिंट्स असलेला ड्रेस घालू नये, असं म्हटलं जातं. कारण अशा कपडय़ांमध्ये जाडेपणा उठून दिसतो. हे काही प्रमाणात खरं असलं, तरी तुम्ही बोल्ड शेडचे मोठे आडवे पट्टे असलेला ड्रेस वापरू शकता. त्यात शरीराचे कव्‍‌र्ह्ज फोकसमध्ये येतात. फुगीर दिसत असल्याने लांब अनारकली वापरता येत नाही. पण बस्टलाइनपासून घेर सुरू होणारा गुडघ्याच्या उंचीचा शॉर्ट अनारकली नक्कीच वापरता येऊ  शकतो. घेरेदार स्कर्टमध्ये बुटकं दिसायची भीती असते, पण या स्कर्टसोबत शॉर्ट टॉप आणि जॅकेट किंवा श्रग घातल्यास शरीराचा समतोल साधला जातो. परफेक्ट कोणीच नसतं. आपलं दिसणं आपण स्वीकारलं तर पाहणाऱ्याच्या नजरेतसुद्धा बदल होतो.

  • ड्रेसिंग करताना लठ्ठपणा लपवण्याची धडपड करण्यापेक्षा कव्‍‌र्ह्स फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. यासाठी कमरेला बेल्ट किंवा लाँग ड्रेस घालण्याऐवजी सेपरेट्स घालण्याकडे भर द्या.
  • घेरदार ड्रेसचा घेरा शक्यतो बस्टलाइन किंवा वेस्टलाइनपासून सुरू होईल, याची काळजी घ्या. त्यामुळे बस्टचा हेवीपणा फोकसमध्ये येणार नाही. मल्टी प्रिंट्स किंवा स्ट्राइप्सपेक्षा बोल्ड कलर्स वापरण्याला प्राधान्य द्या. त्यामुळे ड्रेसिंग ढगळ असलं तरी जाणवत नाही.
  • सिंपल गोल गळ्याचे ड्रेस निवडण्याऐवजी छान बोट नेक, चौकोनी किंवा त्रिकोणी गळ्याचे ड्रेस निवडा. गळ्यावरच्या डिटेलिंगमुळे अपर बॉडीचा हेवीनेस लपला जातो. वाटल्यास छानसा स्टेटमेंट नेकपीससुद्धा घालू शकता. पण गळ्यावर हेवी एम्ब्रॉयडरी वगैरे टाळाच. बंद गळ्याऐवजी स्टायलिश बटनपट्टी वापरा.
  • ए-लाइन ड्रेस, स्कर्ट, फ्लेअर पँट आवर्जून वापरा. फक्त यांच्यासोबत छान फिटेड टी-शर्ट किंवा शर्ट वापरा. त्यामुळे शरीराचा समतोल सांभाळता येईल. लेअरिंगमुळे लुकला अजून मजा आणता येईल. वाटल्यास एखादा ओव्हर साईज श्रग किंवा शर्ट नक्की वापरा.

viva.loksatta@gmail.com