News Flash

आऊट ऑफ फॅशन : सणासुदीची फॅशन!

पारंपरिक किंवा एथनिक स्टाइलचे कपडे बाजारातील दुकानाच्या चकचकीत खिडकीतून नेहमीच खुणावत असतात.

श्रावण महिन्याच्या आगमनासोबत बाजारात खास फेस्टिव्ह कलेक्शन्ससजू लागतात. इंटरनेट, वर्तमानपत्रांत फेस्टिव्ह ड्रेसिंगच्या टिप्स यायला सुरुवात होते. पण हे सगळं पाहताना सणांच्या नंतर या भरजरी कपडय़ांचं करायचं काय, हा प्रश्न मात्र विरून जातो. यावेळी आपण नेमक्या अशाच स्टाइल्सबद्दल बोलणार आहोत, ज्या फक्त सणाच्या वेळी नाही तर इतर वेळीही सहज वापरता येतील.

या लेखाची सुरुवात करणार तितक्यात मोबाइलच्या स्क्रीनवर एक मेसेज आला. ‘इथे गणपतीच्या सुट्टीचा पत्ता नाही आणि आईने गावात दवंडी पिटवली आहे. आमचा बाबू गणपतीला घरी येणार.’ अर्थात हा लेख तुम्हाला वाचायला मिळेल तोपर्यंत ज्यांना सुट्टय़ा मिळाल्या आहेत, ते गावी पोहोचलेले असतील आणि बाकीचे हा मेसेज इतर ग्रुप्समध्ये पाठवून बॉसच्या नावाने बोटं मोडत असतील. असो. आपला विषय गणपती नाही ना त्याची सुट्टी आहे. आपण यानिमित्ताने होणाऱ्या कपडे खरेदीविषयी बोलणार आहोत. भारतातच नाही, जगभरात सणांना विशेष महत्त्व असतं. पण या सणांमध्ये एक बागुलबुवा सगळ्या घरांमध्ये कायम असतो तो म्हणजे कपडय़ांच्या खरेदीचा. एक मिनिट, फक्त मुलींच्या खरेदीचा नाही हां.. मुलांच्याही खरेदीचा असतोच. कारण सणांमध्ये हौसेने घेतलेले जरीचे कुर्ते, सलवार, साडय़ा नंतर वर्षभर कपाटात तशाच पडून असतात. म्हणून ते पुढच्या वर्षी वापरता येतील असंही नाही. कारण एक तर या कपडय़ांचा ट्रेंड निघून गेलेला असतो आणि बाजारातील लेटेस्ट कपडे आपल्याला खुणावत असतात.  वर्षभर हे भरजरी कपडे ना ऑफिसमध्ये घालता येत, ना कॉलेजला. त्यामुळे हल्ली एखादा महत्त्वाचा सण, लग्न किंवा समारंभ वगळता कित्येक जण कित्येक हजारांचे कपडे, दागिने घेण्याचे टाळतात.

पारंपरिक किंवा एथनिक स्टाइलचे कपडे बाजारातील दुकानाच्या चकचकीत खिडकीतून नेहमीच खुणावत असतात. रोज बसमधून जाताना, ऑनलाइन वेबसाइट तपासताना मिनिटभर या कपडय़ांभोवती घुटमळून अनारकलीच्या घेऱ्यात गोल चक्कर मारण्याची किंवा साडीमध्ये केस मोकळे सोडून पदर ऐटीत खोचून चालण्याची स्वप्नेसुद्धा रंगवली जातात. पण ऐन श्रावण आणि भाद्रपद महिन्यांतील पावसाळा, उन्हाचा चिकचिकाट यामध्ये असे कपडे घालून प्रवास करणे म्हणजे शिक्षाच. यावर तोडगा काढायचा असेल तर ड्रेसिंगसुद्धा सुटसुटीत पण छान असलं पाहिजे.

सण म्हणजे पारंपरिक कपडे, एम्ब्रॉयडरी. म्हणजे सिल्क, लेस, जॉर्जेट हे भरजरी आले. पण यंदा डिझायनर्सनी यात एक वेगळा प्रयोग केला आहे. पारंपरिक नक्षीकाम, पेंटिंग, मोटीफ कायम ठेवून लुक मात्र वेस्टर्न दिला आहे. म्हणजे एरवी वापरायचे वनपीस ड्रेस, कुर्ते, सलवार, टी-शर्ट याचं स्वरूप तेच ठेवण्यात आलं आहे, पण त्याच्या सादरीकरणाची पद्धत बदलली आहे. सुरुवातीला सणांची खरेदी म्हणजे ब्राइट रंग, हे समीकरण लक्षात असू द्यात. तुमच्या कपडय़ांची रंगसंगती फ्रेश असली पाहिजे. अर्थात तुम्ही अर्थी टोन्स वापरून छान ट्रायबल लुकसुद्धा करू शकता. पण तो थोडा डल दिसू शकतो, त्यामुळे त्याला मेटालिक शाइन नक्की द्या. त्यासाठी तुम्ही मेकअपचा वापर करू शकता किंवा छान स्टोन, चांदीची ज्वेलरी वापरू शकता. सणांच्या दिवसांमध्ये आवर्जून कपडय़ांमध्ये प्रयोग करा. प्रिंट्स, रंग यांच्यात वैविध्य आणू शकता. तसेच कपडय़ांचे वेगळे प्रकार वापरता येतील. उदाहरण द्यायचं झाल्यास घेरेदार स्कर्टसोबत लांब कुर्ता घाला. पांढऱ्या मलमल कुर्त्यांसोबत पिंक स्कर्ट छान दिसेल किंवा कुर्ता शॉर्ट ठेवून लांब श्रग आणि अँकल लेंथ पँट घालू शकता. नेहमीच्या मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल घालण्यापेक्षा लेदर कावबॉय हिल्स घालून बघा. किंवा लांब कुर्त्यांवर छान डेनिम जॅकेट घाला. असे लुक तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजमध्ये सहज कॅरी करू शकता. तसेच थोडय़ाशा ज्वेलरीच्या मदतीने पार्टीसाठीही लुक तयार होईल.

मुळात सणाच्या दिवशी महागडे कपडे मिरवण्यापेक्षा छान, फ्रेश दिसणं महत्त्वाचं असतं. हल्ली पारंपरिक मोटीफ ट्रेंडमध्ये आहेत. या मोटीफचा वापर केलेले ड्रेसेस, मॅक्सी, कुर्ते बाजारात मिळतात. हे कपडे कॉटन, मलमल, लिनिनसारख्या सुटसुटीत कापडात बनविलेले असल्यामुळे लुक आरामदायी राहतो. यांच्यासोबत तुम्ही छान ज्वेलरी घालू शकता. ज्वेल्ड बेल्ट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. कमरपट्टासुद्धा कुर्त्यांवर मस्त दिसतो. समर ड्रेसवर लांब एथनिक दुपट्टा घेऊन बघा. पलॅझोमध्ये गेल्या काही सीझनमध्ये प्रचंड विविधता आली आहे. सणांच्या दिवसांत यांच्यासोबत क्रॅप टॉप किंवा ऑफ शोल्डर टय़ुनिक घालता येईल. मॅक्सी ड्रेस आणि स्कर्ट किंवा कॉटन पँट मस्त दिसतील. दुपट्टा नेहमीप्रमाणे घेण्यापेक्षा साडीच्या पदरासारखा ड्रेप करा ड्रेसचा लुक बदलतो. या छोटय़ा क्लृप्त्या असतात, पण यामुळे नेहमीच्या लुकमध्ये फरक पडतो. त्यामुळे यंदा सणांमध्ये भरजरी कपडय़ांना थोडं बाजूला सारत मॉडर्न एथनिक लुक ट्राय करायला काय हरकत आहे!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:36 am

Web Title: festival fashion festival dressing tips ethnic style clothes traditional clothes
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : सायकल ब्रँड अगरबत्ती
2 Watchलेले काही : संगीतक्रांतीचे टप्पे!
3 व्हायरलची साथ : खरी कसोटी
Just Now!
X