नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
hardik pandya
मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

ब्रॅण्ड असा हवा की, एकदा आपल्या आयुष्याला चिकटला की, दुसऱ्या कोणत्याही ब्रॅण्डची आठवणच येऊ  नये. असा मजबूत जोड वर्षांनुवर्षे ज्या ब्रॅण्डने आपल्यासोबत निर्माण केला आहे तो ब्रॅण्ड अर्थातच फेविकॉल. फर्निचरसारख्या कामापासून शालेय जीवनातील हस्तकलेपर्यंत फेविकॉल सर्व संचारी आहे. त्याचा तो दाट, पांढरा रंग आणि विशिष्ट गंध न आवडणारी व्यक्ती अद्याप भेटलेली नाही. हा एक व्हाइट ग्लू आहे हे विसरून आपण त्याचं नाव हेच त्याचं काम करून टाकलं आहे, कारण फेविकॉल का मजबूत जोड हैं. टुटेगा नही याची आपल्याला खात्री असते.

फेविकॉल हा ब्रॅण्ड निर्माण होण्यापूर्वी मुळात पांढरा गोंद हा आपल्याकडे फारसा वापरात नव्हता. फर्निचरसारख्या कामात सनमायका वगैरे चिकटवण्यासाठी जे गोंद वापरले जातं ते पहिले गरम करून वितळावं लागतं आणि मग वापरलं जातं. अशा काळात सुतारकाम क्षेत्रात प्रामुख्याने आणि फ्लोरिंग, फूटवेअर अशा क्षेत्रांत दुय्यमत्वाने एका दर्जेदार गोंदाची गरज होती, जो उत्तम दर्जासोबत वितळवणे वगैरे प्रक्रियेला तिलांजली देत सहज वापरायोग्य असेल.

१९५९ मध्ये पारेख ग्रुपच्या बलवंतभाई पारेख यांनी पीडीलाइट इंडस्ट्रीची स्थापना केली. बलवंतभाईंनी वास्तविक लॉचं शिक्षण घेतलं होतं. गुजरातमधून मुंबईत येत अगदी लहानसहान नोकऱ्या करत नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या बलवंतभाईंनी ‘व्हाइट ग्लू’च्या माध्यमातून रेझिन गोंद बाजारात आणण्याची दूरदृष्टी दाखवली, पण कोणतंही उत्पादन नव्याने बाजारात आलं की, लगेच वापरात येत नाही. त्यासाठी अनेक वर्षांची मानसिकता बदलण्याचं आव्हान असतं. बलवंतभाईंनी फेविकॉल बाजारात आणताना वापरलेली नीती कोणत्याही नवउत्पादकाने शिकण्यासारखी आहे. त्या काळात मॉवीकॉल नामक परदेशी व्हाइट ग्लू बाजारात होता. (हे उत्पादन आता बंद झाले आहे.) या मॉवीकॉलशी साधम्र्य दाखवणारे फेविकॉल नाव त्यांनी निवडले, कारण मुळात व्हाइट ग्लू वापरणारा कारागीर वर्ग मर्यादित होता. त्यामुळे हे उत्पादन नेमके काय आहे या गोंधळात तो वर्ग पडणार नाही याची काळजी नावातून घेतली गेली. ‘कॉल’ या शब्दाचा जर्मन भाषेतील अर्थ होतो जोडून ठेवणारा. फेविकॉल निर्मितीनंतर बलवंतभाईंच्या या उत्पादनाने खरंच अनेक कारागिरांना फेविकॉलशी जोडून टाकलं, पण ती एका दिवसातली किमया नव्हती.

त्या काळात कोणताही नवा गोंद सुतारकामासाठी बाजारात आला की, पहिले हार्डवेअर किंवा टिम्बरमार्टमध्ये जात असे. फेविकॉलने मात्र थेट सुतारकाम करणाऱ्या सुतारांना गाठलं. स्वस्तातला गोंद वापरून कामाचा दर्जा घसरवण्यापेक्षा हा नवा व्हाइट ग्लूचा पर्याय दर्जा राखण्यात कसा मदत करतो हे पटवून दिलं. फेविकॉल म्हणजे सुतारकामातला दर्जेदार पर्याय हे सुतारांपर्यंत अशा रीतीने पोहोचवले गेले की, माऊथ पब्लिसिटीने फेविकॉल त्या काळात लोकप्रिय झाला. सिंथेटिक रेझिन गोंद अशा वर्णनापेक्षा फेविकॉल हे सुटसुटीत नाव सुतारवर्गाच्या मुखी रुळले.

या थेट मार्केटिंगचा उत्तम फायदा उत्पादनाला झाला, पण त्यापलीकडेोउउ फेविकॉल चॅम्पियन क्लबची भूमिकाही महत्त्वाची होती. फर्निचर बनवणाऱ्या एका मोठय़ा वर्गासाठी मोफत दंतचिकित्सा, रक्तदान शिबीर, विविध उत्सवांच्या निमित्ताने मेळावे, या कारागिरांच्या बायकामुलांसाठी छोटय़ा छोटय़ा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. अगदी साध्या गोष्टी जसे की, बँक खाते कसे उघडायचे किंवा शिवणकाम प्रशिक्षण ‘फेविकॉल’च्या माध्यमातून जेव्हा या कारागिरांच्या घरादारापर्यंत पोहोचले तेव्हा उत्पादनापलीकडे एक नाते या वर्गात निर्माण झाले. फर्निचर दुनियेत अशा प्रकारे पाय रोवल्यावर मग हस्तकला, फॅब्रिक किंवा अन्य क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करणं फेविकॉलला जड गेलं नाही.

गेली ५८ र्वष फेविकॉलने शब्दश: आपल्याला बांधून ठेवतानाच ३००० कोटींच्या घरातली उलाढालही साध्य केली आहे. काही उत्पादनं साधी असतात, पण ती वर्षांनुवर्षे दर्जाशी इमान राखतात आणि अनेक वर्षांच्या नात्यांचा पाया रचतात. कामाची वस्तू म्हणून फेविकॉल घरी असतोच, पण तो एक चाळाही असतो. हाताला फेविकॉल लावून तो सुकल्यावर त्याचे पापुद्रे अलगद काढण्यात काय विलक्षण सुख आहे हे अनुभवणाराच सांगू शकतो.

या संपूर्ण प्रवासात फेविकॉलच्या जाहिरातींचा वाटाही मोठा आहे. अंडं देणाऱ्या कोंबडीचं ते अंड फेविकॉलच्या टय़ूबमधून आल्याने कसे न फुटता सुखरूप राहते हे पाहताना त्या अतिशयोक्ती पलीकडे फेविकॉलच्या दर्जाने आपल्या मनात विश्वास निर्माण केलेला असतो. त्या पांढऱ्या निळ्या डब्याला, बाटलीला, कुपीला पाहताक्षणी हा विश्वास अधिक पक्का होतो. दोन भिन्न दिशांनी साखळदंडाला जोडलेले हत्ती एक घनगोल ताकदीने ओढताना पाहिल्यावर फेविकॉलचा हा लोगो अगदी चिल्लीपिल्लीही पटकन ओळखतात. ही ओळख, हा विश्वास निरंतर आहे. क्यों की आखिर फेविकॉल का मजबूत जोड हैं! टुटेगा कैसे?

viva.loksatta@gmail.com