17 December 2017

News Flash

Watchलेले काही : निसर्गाच्या रौद्र रूपाला पकडताना!

विजा चमकल्यानंतर कडकडाटी आवाजाची आपल्याला जाणीव होते.

पंकज भोसले | Updated: October 6, 2017 4:36 AM

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ांत परतणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा पाऊस त्रासदायक असतो. संध्याकाळी अचानक एका बाजूने जमा होणारे काळे ढग, भीषण काळोख आणि विजा आणि वाऱ्याने सगळ्यांचीच दैना करून देणाऱ्या या वादळवाऱ्यांची एक तरी आठवण प्रत्येकाकडे असेल. जगभरामध्ये पावसाचे वर्षभरातील वेगवेगळे चक्र आहे. बहुतांश भागात उन्हाळा आणि पावसाळा हेच ऋतू आहेत. काही भागांत हिवाळाही पावसाळ्यातच मोडला जातो. तर आपल्याकडे परतीच्या पावसात होत नाहीत, जाणवत नाहीत इतकी चक्रीवादळे इतर देशांमध्ये होतात. या चक्रीवादळाचे व्हिडीओ यूटय़ुबवर भरपूर लोकप्रिय आहेत. चक्रीवादळ, ढगफुटी आणि वादळाच्या क्लिप्स चित्रीकरणाची जराही माहिती नसलेल्यांनी काढलेल्या आणि अपलोड केल्या आहेत. शिवाय त्या चित्रीकरण करणाऱ्यांनाही आपल्या कॅमेरात काय बंदिस्त होतेय याची कल्पना नाही. एक व्हिडीओ अमेरिकेतील कोलारॅडोमधील आहे. एका गाडीतून प्रवास करणाऱ्या कुटुंबाच्या समोर चक्रीवादळ होत होते. त्यांनी त्यांच्याजवळ असलेला कॅमेरा काढला आणि निसर्गाच्या रौद्र स्वरूपाला अगदी जवळून कैद केले. वादळाचे हे सलग पाच मिनिटांचे चित्रीकरण थरारक आहे. एकाच परिसरामध्ये ढगांचे तांडवनृत्य पाहताना त्या गाडीमधील हादरेही व्हिडीओवर स्पष्ट झाले आहेत.

विजा चमकल्यानंतर कडकडाटी आवाजाची आपल्याला जाणीव होते. पण ती वीज जिथे पडली असेल, त्या ठिकाणी काय होते याची जराही कल्पना नसते. एका व्हिडीओमध्ये आशियाई राष्ट्रांपासून प्रगत राष्ट्रांमधील विजा पडण्याच्या क्लिप्सना एकत्रित करण्यात आले आहे. मोबाइल कॅमेरामधील या चित्रीकरणामध्ये अचानक लागलेल्या शोधाची गंमत आहे. एका स्टेडिअममधील घाबरलेले नागरिक आणि एका विवाह समारंभात जमलेली वरात, यांच्यावर विजेने जी भीती अवकृपा केली आहे, त्याचे हे गमतीशीर एकत्रीकरण आहे. कॅमेरात कैद झाल्यामुळे वीज पडते त्या ठिकाणी काय परिस्थिती होत असेल, याची कल्पना येईल.

थायलंड हे भारतासारखेच राष्ट्र आहे. पण आता बऱ्यापैकी सुधारलेले. या देशामध्ये अत्यंत सुंदर अशी पाणी जिरण्याची यंत्रणा त्यांनी गटार व्यवस्थापनाद्वारे केली आहेत. बँकॉक आणि फुकेत शहरांमध्ये नोव्हेंबर- डिसेंबरदरम्यान दीड फूट पाणी रस्त्यावर पसरेल इतक्या जोराचा पाऊस येतो. पण पाऊस गेल्यानंतर अध्र्याच तासानंतर रस्त्यावर पाऊस पडून गेला, याची जाणीवही होत नाही. रस्त्यात खड्डे नसल्याने, सखल भाग नसल्याने पाणी ओसरण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने होते आणि तेथील नगरपालिका कचरा आणि चिखलाचे व्यवस्थापन अत्यंत योग्य पद्धतीने करते. इतके सारे असूनही २०१० साली तेथे भीषण पूर आला. सगळे व्यवस्थापन कोलमडून टाकणारा पाऊस पडला. त्या पुराचे सीएनएनने केलेले वृत्तांकन या पुराची जाणीव करून देऊ शकेल. त्या वर्षी थायलंडमध्ये तयार होणाऱ्या अनेक बडय़ा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कडाडल्या होत्या. आपल्याकडे २६ जुलै २००५ साली आलेल्या पुराहून अधिक गंभीर इथली स्थिती होती. या पुरानंतर इथल्या व्यवस्थापनाने आपल्या रस्त्यांच्या, पाणी निचरा होण्यासाठी आणखी शक्कल लढविल्या. आता सात वर्षांत जोरदार पाऊस होऊनही २०१० सारखी स्थिती नाही.

नदीमध्ये धरणाचे पाणी सोडल्यानंतर वाढणारी पातळी पाहण्यासाठी आपल्याकडे लोक उत्साहामध्ये असतात. पूर्ण रिकाम्या नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काय होते, ते दाखविणारा एक परदेशातील व्हिडीओ लोकप्रिय आहे. पुरामध्ये अडकलेले असताना पुलांवरून गाडी नेण्याचे भीषण धाडस करणाऱ्या गाडीवाल्यांचा एक व्हिडीओ भरपूर दिवस गाजत होता. खास करून आपल्याकडे पावसाळ्यामध्ये तुलना करण्यासाठी वापरला गेला. यात काही सेकंदाच्या फरकाने जीवन-मृत्यूचा खेळ पाहायला मिळतो.

भूकंप, त्सुनामी या निसर्गाच्या सर्वाधिक घातक रूपांनाही कॅमेरामध्ये कैद करण्यात आले आहे. आपण बातम्यांमध्ये केवळ सुनामीचा इशारा वाचतो किंवा ऐकतो. ती येते तेव्हा काय होते. किनारी भागातील शहरांची प्रत्यक्ष काय अवस्था होते, हे एका व्हिडीओमध्ये एकत्रित करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये नागरिकांमध्ये पसरलेली दहशत आणि भीती आवाजामध्ये स्पष्ट जाणवते. निसर्ग आपल्याला भरपूर गोष्टी देतो, आणि जेव्हा त्याचा कोप होतो, तेव्हा आपल्याजवळ असलेले काहीच ठेवत नाही. या व्हिडीओजमध्ये आलेले चक्रीवादळ, पूर अथवा सुनामी यांच्यासारख्या तीव्र आपत्ती आपल्याला कधीच जाणवलेली नाही. तरीही आपल्या शहरीकरणाचा वेग इतका वाढलाय, की तासाभराच्या पावसामध्ये नगरपालिकांच्या चुकीचे व्यवस्थापन उघडे पडते. येऊ नये म्हटले, तरी प्रगतीचे स्मार्ट फटके बसायला वेळ लागणार नाही. तूर्त इतर प्रगत देशांमधील निसर्गाच्या रौद्र रूपाला पकडणारे व्हिडीओ जाणिवांसाठी पुरेसे आहेत.

https://www.youtube.com/watch?v=bjb7QtMEBUg

https://www.youtube.com/watch?v=E0s7ucEMAKw

https://www.youtube.com/watch?v=YC8M9_sCIQU

https://www.youtube.com/watch?v=4TNWZ90L3Yk

https://www.youtube.com/watch?v=hDD3DmOnKD8

https://www.youtube.com/watch?v=LO9Ziy69Q80

https://www.youtube.com/watch?v=Ss1l6KoCXw4

viva@expressindia.com

First Published on October 6, 2017 12:33 am

Web Title: floods due to seasonal rains hurricane video tsunami youtube video