23 January 2018

News Flash

कल्लाकार : मोहमयी सुरावटींचा ‘वरद’हस्त

मराठी रिअ‍ॅलिटी शो ते बॉलीवूडपर्यंतचा १६ वर्षांचा वरदचा हा प्रवास बासरीच्या सुरांइतकाच मोहमयी आहे.

मितेश जोशी | Updated: July 28, 2017 12:55 AM

सैराटया बहुचर्चित सिनेमातील याड लागलंया गाण्याची सुरुवात बासरीच्या मधुर स्वरांनी करण्यात आली आहे. बासरीच्या स्वरांतून तयार झालेली ही धून जगभर गाजली. या सुरावटीने अनेकांना याड लावलं. अनेकांच्या मोबाइल रिंगटोनची जागाही या सुरावटीने घेतली. आपल्या बासरीत स्वर फुंकून ही धून वाजवणारा वरद प्रमोद काठापूरकर आपला आजचा कल्लाकार.

मराठी रिअ‍ॅलिटी शो ते बॉलीवूडपर्यंतचा १६ वर्षांचा वरदचा हा प्रवास बासरीच्या सुरांइतकाच मोहमयी आहे. वरदला संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. वरदचे आजोबा कै. वसंत काठापूरकर हे एक उत्तम बासरीवादक होऊन गेले. त्याचे वडील प्रमोद काठापूरकर हेही उत्तम तबलावादक होते. एके दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघात वरदच्या आजोबांचा कार्यक्रम सुरू होता. बाबांसोबत कार्यक्रमाला गेलेला चार वर्षांचा वरद कार्यक्रम संपताच आजोबांना जाऊन भेटला. त्याच दिवशी त्याची बासरी या वाद्याशी पहिली तोंडओळख झाली. संघाच्या कार्यक्रमात वाजवली जाणारी उभी पितळी बासरी ज्याला ‘वंशी’ असं म्हणतात, ती बासरी वरदला त्याच्या आजोबांनी त्या दिवशी भेट म्हणून दिली. कार्यक्रमात आजोबांनी वाजवलेली मंजूळ धून सतत वरदच्या कानात पिंगा घालत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वरदने त्या पितळी बासरीतून आदल्या दिवशी आजोबांनी वाजवलेली धून अगदी जशीच्या तशी वाजवून दाखवली. तेव्हा खुद्द वरदसह घरातील सर्वच मंडळी चकित झाली होती. कोणत्याही प्रकारचा रियाज न करता अगदी पहिल्याच फटक्यात हा मुलगा इतकी गोड बासरी कशी वाजवू शकतो?, एखादा दैवी चमत्कारच जणू अशी भावना घरच्यांच्या मनात दाटली होती. त्याच क्षणी वरदच्या आई-वडिलांनी त्याला बासरी शिकवण्याचा संकल्प केला.

लहानग्या वरदला घेऊन त्याचे बाबा संगीतकार श्रीधर फडके यांच्याकडे गेले. तेव्हा श्रीधर फडक्यांनी त्याला एक बासरी दिली आणि एक धून वाजवायला सांगितली. तेव्हा वरदने त्यांना त्यांचंच ‘धुंद रात्रीतील आता संपला वेडेपणा’ हे लोकप्रिय गाणं बासरीवर वाजवून दाखवलं. तेव्हा श्रीधर फडके त्याच्या वडिलांना म्हणाले की, ‘ या मुलाच्या बोटात जादू आहे. तुम्ही याला बाबुजींकडे घेऊन जा. तेच तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. श्रीधर फडक्यांचा सल्ला हा गुरुआज्ञा मानून दोघेही पिता-पुत्र बाबुजींकडे गेले. तेव्हा बाबुजींनी त्यांना पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितले की तुम्ही वरदला गाणे शिकवा. जोपर्यंत तो आतून गात नाही, त्याचे सूर त्याला आतून साद देत नाहीत तोपर्यंत त्याच्या वादनाला काही मजा नाही. नुसतं तांत्रिक वाद्य वाजवणं आणि गाण्याचा लहेजा माहिती करून वाजवणं या दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे, असं सांगून त्याला पहिलं गाणं शिकवा मग बासरी.. असा आग्रह बाबुजींनी धरला. पुन्हा एकदा गुरूची आज्ञा प्रमाण मानून वरद ख्यातनाम गायक रमाकांत म्हात्रे यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी गेला. हेच वरदचे पहिले गुरू.

रमाकांतसरांकडे माझी शिकवणी अगदी व्यवस्थित सुरू होती. काही दिवसांनी रमाकांतसरांनी माझ्या बाबांना बोलावून घेतलं. माझी हुशारी आणि आत्तापर्यंत जे शिकवलं ते ते मी आत्मसात केलं आहे हे त्यांनी बाबांच्या कानावर घातलं. पण बासरीवादनाचं अधिक ज्ञान घेण्यासाठी आता त्याला उत्तम बासरीवादकाकडेच घेऊन जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा एकदा माझा गुरूचा शोध सुरू झाला, असं वरद म्हणतो. हा काळ १९९४ चा होता. त्या वेळी सहा वर्षांच्या वरदचं शालेय शिक्षण कल्याणच्या सुभेदार वाडय़ात सुरू होतं. पुन्हा एकदा श्रीधर फडक्यांशी वरदच्या वडिलांनी त्याला कल्याणहून बोरिवलीला पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे नेलं. तेव्हा पंडितजींचं वय साधारण पासष्टीच्या पुढे होतं आणि ते पूर्वीपेक्षा थकले होते. पण लहानग्या वरदला पाहून त्यांना अतीव आनंद झाला. त्यांनी लगेचच वरदच्या हातात बासरी देत त्याला धून वाजवायला सांगितली. वरदने वाजवलेली धून पंडितजींना खूप आवडली आणि त्यांनी त्याला लगोलग शिष्यत्वही बहाल केलं. संगीत क्षेत्रात पंडित मल्हारराव हे माझे दुसरे तर बासरी शिकवणारे पहिले गुरू होते, असे वरदने सांगितले.  पंडितजींकडून रियाज करताना अनेक गोष्टी आत्मसात केल्याचे तो सांगतो. पंडितजींचा स्वभाव विनोदी होता. त्यामुळे वाजवताना कुठेही चूक झाली तर ते अगदी शांतपणे तर कधी कधी विनोदानेच समजावून सांगत असत. तुला सगळं वाजवता आलं पाहिजे. तुझं कुठेही अडता कामा नये. मग ते तुझं वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक.. कुठेही न अडण्याचा गुरूचा हा कानमंत्र आजवर आपण तंतोतंत पाळला असल्याचे त्याने सांगितले.

२००४ साली वरद नववीत असताना लखनौला ‘सहारा परिवार राष्ट्रीय स्पर्धे’त सहभागी झाला. संपूर्ण भारतातून बासरीवादक या स्पर्धेत सहभागी होतात. तेव्हा ४० जणांमधून वरद राष्ट्रीय पातळीवर पहिला आला व त्याच्या यशाची नांदी झाली. याच वेळी वरदला भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्तीदेखील मिळाली. त्यानंतर वरद मुंबई आकाशवाणीच्या स्पर्धेत सहभागी झाला आणि तिथेही तो ‘अ’ श्रेणी मिळवून विजयी झाला.

एकीकडे वरदच्या बासरीवादनाची ख्याती पसरू लागली होती. तर दुसरीकडे त्याच वेळी त्याचं महाविद्यालयीन शिक्षणदेखील सुरू झालं होतं. याच वेळी आपली कला व्यावसायिक स्तरावर सिद्ध करण्याची पहिली संधी वरदला ‘कृणाल’ म्युझिककडून मिळाली. ‘मेहंदीच्या पानावर’ या अल्बमसाठी वरदने पहिल्यांदा बासरी वाजवली. तो अल्बम हिट झाला. त्यानंतर वरदने अनेक नामांकित संगीतकारांबरोबर काम केलं. श्रीधर फडके, श्रीनिवास खळे, कौशल इनामदार, अशोक पत्की, बप्पी लहरी, शंकर महादेवन, सोनू निगम, उस्ताद झाकीर हुसैन अशा नव्या-जुन्या सगळ्याच नामांकित संगीतकारांबरोबर त्याने काम केलं. या सर्वाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारला असता, ‘संगीतकाराचं आणि तुमचं नातं वैयक्तिक आयुष्यात कितीही चांगलं का असेना. जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर साथीला उतरता तेव्हा मात्र तुम्हाला फार दडपण येतं. कारण तेव्हा तुमचा संगीतकार व समोर बसलेला प्रेक्षक दोघेही तुमची परीक्षा बघतात. ते घेत असलेली परीक्षा आणि तो सादरीकरणाचा क्षण खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही केलेला रियाज पणाला लावायची ती खरी वेळ असते. माझी कला, माझा रियाज मी पणाला लावला आणि सर्वच संगीतकारांच्या पसंतीस उतरलो,’ असे तो म्हणाला.

दरम्यानच्या काळात वरदने ‘पुणे गायन समाजा’तून बासरीत ‘विशारद’ ही पदवी प्राप्त केली. मला जरी पदवी मिळालेली असली तरी माझं शिक्षण पूर्ण झालं असं मी मानत नाही. माझं शिक्षण सुरूच आहे आणि मी आजन्म विद्यार्थी राहणार, असं वरद सांगतो. त्याचं यानंतरचं आयुष्य सूरमयी वळणा-वळणावरून पुढे गेलं. त्याने ‘माझे जीवन गाणे’, मराठी ‘सा रे ग म प’, ‘गौरव महाराष्ट्राचा’, ‘म्युझिक का महामुकाबला’ या रिअ‍ॅलिटी शोजमधून बासरीवादन केले. याच काळात त्याची ओळख संगीतकार अजय-अतुल यांच्याशी झाली. त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्ये वरद बासरीची साथ देऊ  लागला. वरदच्या संगीताची मोहिनी या दोन्ही संगीतकार बंधूंवर पडली. त्यांनी वरदची खासगी भेट घेतली व त्याला आपल्या बॅण्डमध्ये सहभागी होण्यास सांगितले. अजय-अतुलबरोबर सुरू झालेल्या या संगीत प्रवासामुळे वरदची गाडी ‘सैराट’ चित्रपटापर्यंत पोहोचली. त्याच्या बासरीतून ‘याड लागलं’ची सुरावट निघाली. काळजाचा ठोका चुकवणारं हे संगीत लीलया त्याने आपल्या बासरीतून रसिकांपर्यंत पोहोचवलं.

‘सैराट’बरोबरच वरदच्या बासरीचे सूर ‘नटसम्राट’, ‘बालगंधर्व’, ‘यलो’ , ‘मुंबई पुणे मुंबई २’ यासारख्या मराठी चित्रपटांतील गाण्यात ऐकायला मिळतात. केवळ मराठीतच नव्हे तर  हिंदीतही ‘साला खडूस’, ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘वेडिंग पुलाव’ व ‘पीके’ चित्रपटातील गाण्यांसाठी त्याने बासरीवादन केलं आहे. आमिरच्या ‘पीके’चा अनुभव कसा होता असं विचारल्यावर आमिरजींच्या अभिनयातून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावभावनांतूनच मला सूर मिळत होते,’ असे त्याने सांगितले. याच वेळी वरदची ओळख सोनू निगमशी झाली. सोनू निगमच्या लाइव्ह प्रोग्रामलादेखील वरदने बासरीची साथ दिली. वरदच्या सुरांची मोहिनी सोनू निगमवरही पडली. आणि त्याच्या बॅण्डबरोबर वरद आफ्रिका, अमेरिका, कुवेत, दुबई या देशांची सफर करून आला. सध्या वरद व त्याच्या मित्रमैत्रिणींनी मिळून एक बॅण्ड सुरू केला आहे. ‘म्युसिंक’ नावाने सुरू केलेल्या या बॅण्डमध्ये वरदबरोबर कमलेश भडकमकर व व्हायोलिनवादिका श्रुती भावेही आहे. हा बॅण्ड आता नव्या स्वरूपात आम्ही प्रेक्षकांसमोर आणणार आहोत, असे वरद म्हणाला. वरदच्या या बॅण्डसाठी ‘व्हिवा’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!!!

viva@expressindia.com

First Published on July 28, 2017 12:55 am

Web Title: flutist varad pramod kathapurkar flute player
  1. No Comments.