khabugiriगेल्या काही महिन्यांपासून चांगल्या ‘स्थळां’च्या शोधात असल्याने खाबू मोशाय आणि तुमची भेट होऊ  शकली नाही. मात्र अनेक महिन्यांच्या भ्रमंतीनंतर खाबू मोशाय अनेक चांगली स्थळं घेऊन तुमच्या भेटीला येत आहे. पहिल्याच भेटीत खाबू मोशाय तुम्हाला अक्षरश: खाद्य भ्रमंतीवर घेऊन जाणार आहे आणि ही भ्रमंती आहे रुळांवरची. मुंबई आणि पुणे या दोन भिन्न प्रकृतीच्या शहरांना जोडणारी दख्खनची राणी आपल्या पोटात वेगळीच खाद्यदुनिया घेऊन धावते..

तमाम खवय्यांना खाबू मोशायचा आदाब अर्ज!  खाबू मोशाय आणि आपली ओळख आता तशी नवीन राहिलेली नाही. त्यामुळे ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ असे सगळे चाखण्यासाठी किंवा त्याची चव घेण्यासाठी खाबू मोशाय कुठेही जायला तयार असतो, हेदेखील तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या प्रवासातही काहीतरी चांगलं मुखी पडलं, तर?
हा विचार खाबू मोशायच्या डोक्यात आला तो मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान. हिरव्या हिरव्या रंगाची घनदाट झाडी असलेला खंडाळ्याचा घाट मागे सोडत मुंबईहून पुण्याकडे धाव घेणारी डेक्कन क्वीन किंवा दख्खनची राणी खाबू मोशायची आवडती गाडी. भारतीय रेल्वेच्या इतिहासात आणि परंपरेतील एक नंबरच्या दर्जाची ट्रेन म्हणून दख्खनची राणी ओळखली जाते. रेल्वे अभ्यासकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या या गाडीची निळी-पांढरी रंगसंगती लहान मुलांनाही खुणावणारी आहे.
तर, अशा या दख्खनच्या राणीच्या पोटात खाद्यपदार्थाच्या दुनियेतील काही पदार्थ कायम मुक्काम ठोकून बसलेले असतात. धावत्या गाडीत टेबल खुच्र्याचे हॉटेल असलेली ही भारतातील एकमेव पॅसेंजर ट्रेन आहे. पॅलेस ऑन व्हील्स किंवा तत्सम गाडय़ा पॅसेंजर नाही, तर लक्झरी ट्रेन्स म्हणून ओळखल्या जातात. दख्खनच्या राणीमधील ही डायनिंग कार हे प्रवाशांचे आकर्षण असण्याचे हेदेखील एक मोठे कारण आहे. कल्पना करून बघा ना, गाडी मस्त धडधडत जात आहे, आजूबाजूला हिरवीगार शेतं आहेत आणि तुम्ही डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमध्ये बसून एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत प्रवास करत आहात.. धम्माल येईल.
पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी मुंबईहून सुटली की, जेमतेम दादर जाईपर्यंत खाबू मोशायचा धीर निघतो. मग खाबू मोशायची पावलं या डायनिंग कारकडे वळतात. खाबू मोशायने चलाखी करून तेथील मॅनेजरपासून थेट वेटपर्यंत सगळ्यांशी ओळख करून घेतली आहे. त्यामुळे खाबू मोशायचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. या डायनिंग कारमध्ये गेल्यानंतर खिडकीजवळची खुर्ची पकडून खाबू मोशाय बसला की, मग खाबुगिरीची सुरुवात होते.
आता तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की, गाडीतलं हॉटेल ते, इथे मिळून मिळून काय काय मिळणार? पण थांबा, हॉल्ट, रुकीये, ठेहेरो.. या डायनिंग कारमध्ये व्हेज कटलेटपासून ते फिश कटलेटपर्यंत अनेक पदार्थाची चव घेता येते. खाबू मोशायची वैयक्तिक आवड म्हणाल तर, चिकन कटलेट, बेक्ड् बीन्स विथ टोस्ट, चीज सँडविच विथ फ्रेंच फ्राइज आणि कॉफी!
मेन्यूमधली बेक्ड् बीन्स विथ टोस्ट हा पदार्थ वाचून खाबू मोशाय थोडासा चक्रावला होता. नवे ते हवे, या उक्तीप्रमाणे खाबू मोशायने गाडी ठाण्याजवळ असतानाच हा पदार्थ ऑर्डरला. पारसिक बोगद्यातील अंधार दूर होऊन गाडीने दिव्याजवळील वळण घेतलं आणि खाबू मोशायसमोर मस्त उकडलेले आणि छान ग्रेव्हीमध्ये घोळवलेले बीन्स आणि टोस्ट यांची प्लेट येऊन विराजमान झाली. हलकंसं लिंबू पिळून खाबू मोशायने सुरुवातीला या प्रकरणाचा गंध घेतला आणि बिनदिक्कत टोस्टचा एक तुकडा आणि बीन्स तोंडात टाकले. हा पदार्थ एवढा सुंदर लागेल, याची खाबू मोशायला कल्पना नव्हती.
चिकन कटलेट तर खाबू मोशायची आवडती डिश. इंद्रायणी एक्स्प्रेसमध्येही चिकन कटलेट मिळते. पण डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमध्ये मिळणारं कटलेट अभूतपूर्व आहे. खाबू मोशायला चीझ वगैरे पदार्थाबद्दल फार जिव्हाळा नसला, तरी ते आवडतात, हे नक्की. बेक्ड् बीन्सचा समाचार घेतल्यानंतर खाबू मोशायने चीज सँडविच ऑर्डर केलं. त्या सँडविचवरचा आणि पावांमधला चीजचा ढीग पाहूनच खाबू मोशायने न सांगता ‘से चीझ’ करून टाकलं. त्याबरोबर आलेले फ्रेंच फ्राइजही खाबू मोशायच्या ऑल टाइम फेव्हरिट लिस्टमध्ये आहेत. या गाडीत मिळणारा चीझ टोस्ट हा प्रकारही खवय्यांना आवडण्यासारखा आहे. या टोस्टमध्ये चीझची वेगळीच चव मिळते. त्याशिवाय फिश कटलेटमध्ये पापलेटची कटलेट्स नक्कीच खाण्यासारखी आहेत.
वास्तविक मुंबईत कयानी वगैरेसारख्या इराण्यांकडे या यादीतील बरेचसे पदार्थ नक्कीच मिळतात. पण डेक्कन क्वीनमध्ये बसून आजूबाजूचा परिसर मागे टाकत हे पदार्थ हादडण्याची मजा काही वेगळीच आहे. विशेष म्हणजे या सगळ्या पदार्थाच्या किमती रेल्वेच्या नियमावलीप्रमाणे असल्याने महागात महाग असलेली फिश कटलेट ही डिश १२० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अगदी कर्जतपर्यंत खात खात प्रवास केला तरीही अडीचशेच्या आसपासच बिल होतं. मात्र ही खाबूगिरी करण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढावं लागणार, हे नक्की. विशेष म्हणजे तुम्ही जनरल डब्याचं तिकीट काढलंत, तरी या डायनिंग कारमध्ये जाऊन पदार्थाचा आस्वाद घेऊ  शकता.