News Flash

परदेशी फॅशनच्या तऱ्हा

आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन विश्वात आत्तापर्यंत यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनचंच नाव घेतलं जातं.

गेल्या दोन आठवडय़ांत तुम्ही #metgala #cannesLook या हॅशटॅगसोबत अनेक इंटरनॅशनल, नॅशनल सेलिब्रिटींच्या छायाचित्रांबरोबर झळकलेल्या पोस्ट सोशल मीडियावरती बघितल्या असतीलच. त्यात आपली देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन, नववधू सोनम कपूर, ऐश्वर्या बच्चन अशी आघाडीच्या तारकांची फौज होतीच. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी या इव्हेंटसाठी घातलेल्या ड्रेसची चर्चा झालीच. फक्त आपल्याकडच्या अभिनेत्रींच्याच ड्रेसची चर्चा झाली असं नाही, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ड्रेसचे छायाचित्रं, त्यावरच्या कमेंट्स हे शाब्दिक युध्दही रंगलं मात्र सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती ‘मेट गाला’ इव्हेंटसाठी दीपिक पदुकोण आणि प्रियांका चोप्राने घातलेल्या ड्रेसेसवरती.. त्यावरची ही टीका लक्षात घेताना मुळात आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी फॅशनची संकल्पना, त्यांच्या सोहळ्यांचे नियम वेगळे असतात का? आणि त्यामुळे बॉलीवूड अभिनेत्रींचा गोंधळ उडतो का, हेही लक्षात घ्यायला हवे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन विश्वात आत्तापर्यंत यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनचंच नाव घेतलं जातं. सध्या तिच्याबरोबरीने दीपिका पदुकोन, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि अगदी कंगना राणावतही वेगवेगळ्या परदेशी सोहळ्यांमधून रेड कार्पेटवर टेचात वावरताना दिसू लागल्या आहेत. त्यामुळेच इथे मायदेशी त्यांनी तिथे घातलेल्या ड्रेसबद्दल, त्यांच्या फॅशनच्या जाणिवांबद्दल कायमच उत्सुकता असते. विशेषत: प्रियांका चोप्रा अभिनेत्री म्हणून हॉलीवूडमध्ये स्थिरावली असताना आणि दीपिकाचीही त्या वाटेवरून पावले पडली असल्याने या दोघींच्या आंतरराष्ट्रीय फॅशनवर सगळ्यांचीच नजर असते. ‘मेट गाला’ आणि त्यात या दोघींनी परिधान केलेल्या ड्रेसवरून रंगलेली चर्चा ही याच उत्सुकतेचा भाग आहे. ‘मेट गाला’ हा इव्हेंट म्हणजे न्यू यॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ येथील ‘द कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट गाला’ यांच्या फॅशन फंड रेझिंग कॅलेंडरचा मोठा इव्हंट असतो. यंदा मेच्या दुसऱ्याच आठवडय़ात हा इव्हेंट पार पडला. याची सुरुवात १९४८ साली न्यू यॉर्क शहरात देणगीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी झाली. दर वर्षी फॅशन, सिनेमा, संगीत अशा सगळ्याच कलाजगतातील सेलिब्रिटी एकत्र येऊन या कार्यक्रमात भाग घेतात. ‘द कॉस्च्यूम इन्स्टिटय़ूट गाला’च्या नवीन प्रदर्शनाच्या ग्रॅण्ड ओपनिंगचा भाग होतात. या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे रेड कार्पेट आणि त्यासाठीची थीम. यंदाची थीम होती.  ‘हेवनली बॉडीज-फॅशन अ‍ॅण्ड द कॅथोलिक इमॅजिनेशन’. ‘हेवनली बॉडीज’ याचा मराठीत अर्थ होतो ‘स्वर्गीय संस्था’ आणि ‘कॅथोलिक इमॅजिनेशन’ याचा अर्थ होतो ‘कॅथोलिक कल्पना’. या थीमवर अनेक सेलिब्रिटीजचा फॅशन जलवा पाहायला मिळाला. या थीमला अनुसरून प्रियांकाने डिझाइनर राल्फ लॉरेन याने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचं खास वैशिष्टय़ ठरलं ते ड्रेसबरोबर प्रियांकाने परिधान केलेल्या कॅप आणि हूडचं. त्या हूडला सॉरोस्की क्रिस्टल जडवण्यात आले होते आणि हे नक्षीकाम मशीनच्या साहाय्याने न करता हाताने करण्यात आले होते. हा पूर्ण ड्रेस तयार करण्यासाठी कारागिरांना १० दिवसांचा कालावधी लागला होता. तर दुसरीकडे दीपिकाने घातलेल्या लाल रंगाच्या गाऊ नची चर्चाही जास्तच रंगली. तिचा गाऊन अमेरिकी फॅशन डिझाइनर प्रबल गर्गने यांनी डिझाईन केला होता आणि त्यावर तिने घातलेले डायमंड ईयररिंग्स आणि अंगठी चार चांद लावत होते, परंतु तरीही दीपिकाचा हा लुक सोशल मीडियावर ट्रोल झाला. तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य माणसांसाठी दीपिकाने केलेली फॅशनच बेस्ट होती, परंतु फॅशन इंडस्ट्रीच्या म्हणण्यानुसार तिचा लूक फसला होता. कारण तिचा ड्रेस थीमप्रमाणे नव्हता. त्यामुळे लूक चांगला असूनही दीपिका टीकेची धनी ठरली होती तर प्रियांकाचा ड्रेस थीमनुसार योग्य असला तरी तिच्या ड्रेसवर असलेले दागिन्यांनी मढलेले हूड मायदेशी अनेकांना फारसे रुचले नाही.

नुकत्याच झालेल्या कान या फिल्म फेस्टिव्हललही अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दीपिका, ऐश्वर्या, कंगनाबरोबरच हुमा कुरेशी या अभिनेत्रीच्या ड्रेसचीही चांगलीच चर्चा झाली. तर अगदी शेवटच्या क्षणी येऊन सोनम कपूरनेही आपल्या चाहत्यांचे मन जिंकले. हुमाने नेहमीच्या स्टाइलपेक्षा हटके काही तरी परिधान के ले होते. तिने इंडियन  फॅशन डिझायनर निखिल थम्पी याने डिझाइन केलेला प्लॅटिनम चीप बेसपोक सूट घातला होता. आणि त्यावरती नाजूक डायमंड नेकपीस घातला होता. याचबरोबर यंदा कंगनाने घातलेल्या ड्रेसने कोणाचे लक्ष वेधून घेतलं नसतं तरच नवल होतं. यंदा कंगनाने घातलेल्या प्रत्येक ड्रेसमध्ये वैविध्यही होतं आणि बोल्डनेसही पाहायला मिळाला. तिच्या मोकळ्याढाकळ्या, बिनधास्त स्वभावाला साजेशी ठरेल अशी सब्यासाची या फॅशन डिझायनरने डिझाइन केलेली आकाशतारा ही साडी असो किंवा मग फॅशन डिझायनर झुहायर मुराद याने डिझाइन केलेला ट्रान्स्परंट क्रिस्टल एम्बिलिश ड्रेस असो. अशा सगळ्याच आऊटफिटमध्ये कंगना अगदी फिट दिसत होती. तर सोनम कपूरनेही राल्फ अ्रण्ड रुसोचा ऑफ व्हाइट भरजरी लेहंगा परिधान करत लोकांची मनं जिंकली.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय फॅशन सोहळ्यासाठी त्याच्या रेड कार्पेटसाठीची थीम, नियम महत्त्वाचे असतात. त्याच्या विरोधात गेलं की सोशल मीडियावर ट्रोल झालंच म्हणून समजा. परंतु अनेकदा जसं दिसतंय त्यावरून ती चांगली की वाईट, अशी चर्चा रंगते. पण मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावरची फॅशन काय हेच आपल्याला माहिती नसल्याने आपण अनेकदा आपल्याच कलाकारांना नावं ठेवतो, त्यांना ट्रोल करतो. आपले भारतीय कलाकार इंटरनॅशनल लेव्हलवर जाऊन काही तरी नवीन प्रयोग करू पाहतात, पण त्याला आपलाच पाठिंबा नसतो. याची काही उदाहरणं म्हणजे २०१६ साली ‘कान’ फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्या राय बच्चन हिने लावलेली पर्पल रंगाची लिपस्टिक. किंवा मागच्या वर्षीचा ‘मेट गाला’ या इव्हेंटसाठी प्रियांका चोप्राने घातलेला ड्रेस आणि त्यावरून केलेले जोक्स. असंच कधी प्रियांका तर कधी कंगना तर कधी दीपिका.. कोणती ना कोणती बॉलीवूड अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल होतेच. आपल्याकडची फॅशन, रेड कार्पेटसाठीच्या फॅशनचे आडाखे, संकल्पना, नियम हे अगदीच वेगळे आहेत. आपल्याकडे कधीही रेड कार्पेटला गाऊनच घातला पाहिजे, हिल्सच घातले पाहिजेत, असे ठोकताळे नाहीत. अनेकदा हल्ली गाऊनच घातले जातात मात्र तसेच नियम असतात असं अजिबात नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सोहळ्यांमागच्या कल्पना आणि त्यांचे नियम वेगवेगळे असतात. त्यानुसारच फॅशन फॉलो केली जाते. साहजिकच आपले कलाकार त्यांच्या फॅशन सोहळ्यात सहभागी झाले की त्यांना तिथली फॅशन काय, त्यांची सोहळ्यासाठीची संकल्पना काय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या कपडय़ांची निवड करावी लागते. आपले कलाकार तिथल्या नियमांना धरून फॅशन फॉलो करण्याच्या प्रयत्न करत असतात तर आपण इक डे आपल्या तर्काच्या कसोटीवर त्यांच्या कपडय़ांचे चांगले-वाईट असे मूल्यमापन करत बसतो. त्याचा परिणाम अर्थातच या तारकांच्या कारकीर्दीवर होत असतो. अभिनेत्री सोनम कपूरने मध्यंतरी एका मुलाखतीत बोलताना मुली जर आमची फॅशन फॉलो करतात तर त्यांनी आमच्या तत्त्वांवरही विश्वास ठेवायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे यापुढे तरी आपल्या कलाकारांना ट्रोल करण्याआधी मुळात त्यामागचे त्यांचे विचार, आंतरराष्ट्रीय फॅशनचे निकष अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. नाही तर उचलली जीभ लावली टाळ्याला.. ही वृत्ती सोशल मीडियाच्या काळात आपल्याच तारकांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला हानीकारक ठरू शकते!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:39 am

Web Title: foreign fashion met gala cannes look international fashion
Next Stories
1 गारेगार तृषाशांती!
2 ‘जग’ते रहो : आहे मनोहर तरी..
3 ‘कट्टा’उवाच : लॉलझ् ..
Just Now!
X