‘व्हिवा लाउंज’मध्ये फंड मॅनेजर स्वाती कुलकर्णी
घरखर्चाचं बजेट ठरवणारी, ते कधीही कोलमडू न देणारी म्हणून घरच्या स्त्रीला आवर्जून श्रेय दिलं जातं; पण गुंतवणुकीचा विषय आला की, आर्थिक विषयातलं तिला काय कळणार, असा पवित्रा असतो. मुळात स्त्रियांमध्ये अर्थसाक्षरता कमी, त्यात गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रिया काय आणि कसं काम करणार? पण हा समज पुसून टाकतेय या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभी असलेली एक स्त्री. तब्बल ८३०० कोटींच्या समभाग संबंधित निधीचं सहजी व्यवस्थापन करणारी आणि देशातल्या टॉप थ्री फंड मॅनेजर्समधली एक असा लौकिक असलेली ही स्त्री ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या पुढील पर्वात प्रेक्षकांशी संवाद साधायला येणार आहे.

‘यूटीआय एएमसी लिमिटेड’चं कार्यकारी उपाध्यक्षपद सांभाळणाऱ्या आणि फंड मॅनेजर (इक्विटीज) म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वाती कुलकर्णी या महिन्याच्या ‘व्हिवा लाउंज’च्या पाहुण्या आहेत. स्वाती गेली २४ र्वष या क्षेत्रात काम करीत आहेत. मुंबईच्या नरसी मोनजी इन्स्टिटय़ूटमधून व्यवस्थापनाचे धडे गिरवल्यानंतर स्वाती यांनी अमेरिकेच्या सीएफए इन्स्टिटय़ूटकडून ‘चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट’ म्हणून मान्यता मिळवली आहे. यूटीआय म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक समितीच्या त्या सदस्य असून इक्विटी स्टीअरिंग कमिटीमध्येही कार्यरत आहेत.

कधी : मंगळवार, ३ नोव्हेंबर

वेळ : संध्याकाळी ४.३०

कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प)