सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; सेलेब्रिटींची फॅशन सगळ्यांनाच फॉलो करावीशी वाटते; पण चंदेरी पडद्यावरचं किंवा फॅशन रॅम्पवरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

कॉलेजलाइफ म्हणजे आपला स्टाइलसेन्स मिरवायचा बेस्ट टाइम. वेगवेगळे ट्रेंड सेट करायचे, लेटेस्ट ट्रेंड मिरवायचे, प्रस्थापित रुल्स मोडायचे आणि मुख्य म्हणजे प्रयोग करायला फुल्ल स्कोप. फसला तर फसला प्रयोग, पण हिट झाला तर कॉलेज आयकॉन बनणार हे नक्की असतं. अर्थात, कॉलेजलाइफमध्ये मिळणारं हे फ्रीडम आपल्या सेलेब्रिटीजना आकर्षित करत नसेल तर नवलच.. त्यामुळे सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने कॉलेजला जायची संधी मिळाली की लगेचच आपल्या वॉडरोबमधील कूल, ट्रेंडी, हटके कपडे मिरवायला सज्ज होतात.
‘दिलवाले’ सिनेमाच्या निमित्ताने कृती सॅननला एका कॉलेजला जायची संधी मिळाली. त्या वेळी बॉक्स शेप ड्रेस, शूज असा फंकी लुक मिरविण्याची संधी तिने अजिबात सोडली नाही. एरवीच्या बॉडी हगिंग ड्रेसेसपेक्षा रिलॅक्स फिटचा, मल्टी कलर आणि लेअरिंग असूनही तो बेढब नाही हे तिच्या ड्रेसचं वैशिष्टय़ आहे. अर्थात, अशा प्रकारचे ड्रेस बाजारात शोधायला जायचं तर खिशाला मोठी कात्री लागणार हे नक्की. ते टाळायचं असेल तर टेलर, होलसेल मार्केटच्या वाऱ्या करायला लागतील. थोडं मेहनतीचं काम आहे, पण त्यातही वेगळीच मज्जा आहे. पॉकेटमनी वाचेल हे वेगळ. ते नव्या वर्षी पाहूयातच. पण आता कृतीच्या लुककडे लक्ष देऊ या.

कसा कॅरी कराल?
बॉक्स फिट लुक कॅरी करायचा म्हणजे डेअरिंगसोबत थोडीशी कलात्मकता हवी. रंगांसोबत खेळायचं कसब तुम्हाला माहीत असायला हवं. बॉक्स फिटमध्ये अर्धी टोन खुलून दिसतात आणि त्यात शरीराला स्ट्रक्चरसुद्धा मिळतं. त्यामुळे नेव्ही, ब्राऊन, ग्रे, डार्क ग्रीन, डार्क रेड, मस्टर्ड यल्लो अशा शेड्स शक्यतो निवडा. प्रिंट्स किंवा क्रितीप्रमाणे लेअरिंगमध्ये ब्राइट रंग वापरायला हरकत नाही. बॉक्स फिट ड्रेस एखाद्या खोक्याप्रमाणे सरळ असतो. त्याला कुठलेही फिटिंग नसते. त्यामुळे शॉर्ट बॉक्स टय़ुनिक आणि लेगिंग,शॉर्ट बॉक्स ड्रेस आणि शूज असा लुक दिसायलाही स्मार्ट वाटतो आणि तुम्ही थोडे उंचही दिसता. फंकी ज्वेलरीसोबत प्रयोग करायची पूर्ण संधी या लुकमध्ये मिळते. त्यामुळे ती दवडू नका. पार्टी सीझन सुरू होतोय. न्यू इअर पार्टीसाठी गेट टुगेदर असेल तरीही हा लुक फंकी दिसेल. फॉर्मल डिनर पार्टीला मात्र हा ड्रेस योग्य नाही. पार्टीचा माहोल कसा आहे, तुमच्या मित्र-मंडळींचा ग्रुप कसा आहे आणि पार्टी प्लॅन कुठे आणि कसा आहे यावर पार्टीला असा ड्रेस घालायचा का नाही, हे ठरवायला हवं. मात्र फॅशन एक्सपरिमेंट करू इच्छिणाऱ्यांनी एकदा नक्की ट्राय करावा, असा हा लुक.
viva.loksatta@gmail.com