News Flash

# गणेशा @ सातासमुद्रापार..

भारतीय कपडय़ांमधले आम्ही सगळे भारताबाहेरही एक त्र आहोत हे दाखवणारी भावना मनाला सुखावते.

लॉस एंजेलिस गणेशोत्सवात रमलेली तरुणाई 

गणेशाविषयीची आपुलकी आणि जिव्हाळा इतका मोठा की जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे त्या गणेशाची स्थापना होते, लोक त्यानिमित्ताने दूरदेशातही एकत्र येतात. देश कोणताही असो, गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होतो..

श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते आणि श्रावणाअखेर वेध लागलेले असतात ते गणरायाच्या आगमनाचे. आज तर घराघरांतून लाडक्या गणेशाचे आगमन झाले आहे. ज्याच्या तयारीसाठी गेले कित्येक दिवस तुम्ही धावपळ करताय तो पाहुणा एव्हाना मखरातून विधिवत स्थानापन्नही झाला आहे. खरंतर गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा आवडता उत्सव. मनमोहक नि रूपवान गणरायाचे गुलाल, मोदक, आरास, ढोल ताशांच्या गजरासोबत स्वागतापासूनच इतके लाड पुरवतो कारण त्याच्या येण्याने एकच चैतन्य घराघरातून ओसंडून वाहत असतं. त्या दहा-अकरा दिवसांच्या त्याच्या वास्तव्यात आपणही कधी नव्हे ते सगळे हेवेदावे विसरून प्रेम आणि उत्साहात नाचत असतो.

लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा गणेशोत्सव सबंध देशात कोणतीही जात, पंथ, धर्म न मानता साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या युगात दुसऱ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना तिथल्या दररोजच्या जीवनशैलीची सवय झाली असली तरी सण आणि उत्सवांच्या काळात भारतात पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या सणांची आठवण त्यांना येत असेल का, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. खरंतर देश कोणताही असो आपले सण साजरे करायला सर्वानाच आवडतं, गरज असते ती फक्त तयारी करून ते उत्साहाने साजरे करण्याची.

अमेरिकेत लॉस एन्जेलिसमधील आयर्विन नावाच्या गावी राहणाऱ्या गार्गी देशपांडे सांगतात की, ‘आमच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. खूप जण इथे दीड दिवसांचाच गणेशोत्सव साजरा करतात, कारण ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळून फार काही करता येत नाही. पण मला मात्र दीड दिवस म्हणजे गणपती आले आले म्हणतानाच जायची पण तयारी करावी लागते असं वाटतं. म्हणून आम्ही पाच दिवसांचा गणपती ठेवतो. लहानपणापासून घरी गणपती असायचे. त्यामुळे मोदक, रात्री जागून केलेली आरास, तोरणं आणि रांगोळ्या या सगळ्याची खूप आठवण यायची. दिवाळीपेक्षाही गणेशोत्सव माझा सगळ्यात आवडता सण. लग्नानंतर आम्ही दोघांनी दर वर्षी गणपती उत्सव करायचा असा निर्णय घेतला. आम्ही दोघंही खूप परंपरानिष्ठ नाही आहोत, पण गणपतीच्या बाबतीत आम्ही आई-बाबांसारखं सगळं करू पाहतो; त्यानिमित्ताने थोडी भारताची आठवण कमी येते. इथे बरीच मराठी मंडळं सावर्जनिक गणपती उत्सव पण साजरा करतात, अगदी आपल्यासारखा. तो मात्र आमच्याकडे आठवडय़ाच्या शेवटी असतो. शनिवारी पूजा आणि रविवारी विसर्जन. हे विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक असते. आपल्यासारखं गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन इथे होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

गणपतीची सगळी सजावट आणि मखरही घरीच केलं जातं, हे सांगताना गार्गीला कोण आनंद होतो. सजावटीसाठी इथला मित्र परिवार मदतीला नेहमी हजर असतो. इथे आपल्यासारखा थर्माकोल मिळत नाही आणि तो वापरूही नये. पुठ्ठा, घरी आलेले बॉक्स असं सगळं वापरून आम्ही मखर करतो, त्याची रंगरंगोटी पण करतो. आरास करण्यासाठी इथे जागवलेल्या रात्री खूप स्मरणीय आहेत. दिवसभर ऑफिसचं काम करूनही त्या एक-दोन आठवडय़ात सगळे घरी येतात आणि मग इथे धर्म-जाती-प्रांत सगळं मागे राहतं. देशापासून दूर साजऱ्या होणाऱ्या सणांची हीच गोडी असावी असं वाटतं.’

आशिया खंडात जपानमध्ये राहणाऱ्या श्रुणालीलादेखील भारतातल्या गणेशोत्सवाची विशेष आठवण येते. तिथल्या गणपती स्थापना आणि त्यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल बोलताना ती सांगते, ‘टोकियोमध्ये मी एकटीच राहत असल्याने ‘टोकियो मराठी मंडळा’सोबत मी गणेशोत्सव साजरा करते. ढोल, ताशा, लेझीम सोबत येणारे गणपती आमच्यासोबत दीड दिवस असतात. गेल्यावर्षीची गणशोत्सव गणेशाची स्थापना, सगळ्यांनी एका सुरात गायलेले अथर्वशीर्ष, सोबतीला राहुल देशपांडेंची गायन मैफील अशा अनेक आठवणी देऊन गेला. भारतीय कपडय़ांमधले आम्ही सगळे भारताबाहेरही एक त्र आहोत हे दाखवणारी भावना मनाला सुखावते. विसर्जन मात्र तिथल्यासारखं वाजत गाजत नसतं मात्र पुढच्या वर्षी गणपतीने लवकर परत यावं असं आवर्जून सांगत आम्ही गणरायाला निरोप देतो.’

खरं तर प्रत्येक देशात अशी मराठी मंडळं देशाबाहेर आपली संस्कृती जपण्यात हिरिरीने कार्यरत आहेत. गणेशोत्सवच नव्हे तर दिवाळी, कोजागिरीसारखे सणही उत्साहाने साजरे करण्यात आणि भारतीय वंशाच्या पुढच्या पिढीला फूल ना फुलाची पाकळी म्हणून भारतीय परंपरा आणि उत्सव यांची निदान तोंडओळख तरी व्हावी यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत. या गोष्टीसाठी विशेष मेहनत घेणारे ओरलँडो, फ्लोरिडामध्ये राहणारे पाटील दांपत्य गेली अनेक वर्षे ‘ओरलँडो मराठी मंडळा’चे सदस्य आहेत. आपली संस्कृती विदेशातही जपली जावी यासाठी आपण भारतात राहून जितके प्रयत्न करत नाही तितकं ते करतात असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. ओरलँडोमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल विचारले असता जगदीश पाटील फार कौतुकाने सांगतात की देशाबाहेर राहूनही आम्ही शक्य तितक्या परंपरा निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. इथल्या हिंदू मंदिरांमध्ये ज्या दिवशी भारतात गणपतीचे आगमन होते त्याच दिवशी म्हणजे उदाहरणार्थ, यावर्षी आजच गणपती विराजमान झाले. ढोल, लेझीम यांच्या सोबतीने गणरायाचे आगमन अगदी पारंपरिक पद्धतीने पालखीतून होते.

मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्याचा मान आम्ही एका यजमानांना देतो, तर बाकीच्या मूर्तीचे सामूहिक पूजन करून मग त्या मूर्ती प्रत्येक जण अपापल्या घरी घेऊन जातो. आमच्या इथे आम्ही शक्यतो इथे असणाऱ्या इंडियन स्टोअर्समधून मातीच्या मूर्ती आणतो. ज्याचं इथे विसर्जन करू शकतो. काही जण प्लास्टर ऑफ पॅरिस, चांदीच्या मूर्ती पण घेतात मात्र विसर्जनाच्या वेळेस सुपारीचं प्रतीकात्मक विसर्जन करून त्या मूर्ती पुन्हा पुढच्या वर्षी वापरण्यासाठी स्वच्छ करून ठेवून देतात. आम्ही विसर्जन मात्र शनिवार किंवा रविवारी करतो. म्हणजे आमचे गणपती दहा दिवसांपेक्षा कमी वास्तव्य करतात. आम्ही आमच्या कामातून वेळ काढून प्रातिनिधिक स्वरूपात दररोज पाच कुटुंबे संध्याकाळी गणपतीची आरती करतो. गणपतीला नैवेद्य म्हणून हटकून प्रत्येक मराठी घरातून उकडीचे २१ मोदक येतातच, असं ते सांगतात.

नव्या पिढीच्या लग्न झालेल्या मुली उकडीचे मोदक जमत नसतील तर बेक करून मोदक घेऊ न येतात, मात्र मोदक नैवेद्यासाठी ठेवलेच जातात. आम्ही एक दिवस महाप्रसादाचीही सोय करतो. पुरी, चपात्या, डाळ, भात, भाजी असं साग्रसंगीत जेवण आम्ही एके ठिकाणी ऑर्डर देऊन तयार करवून घेतो.

यावेळी महाराष्ट्रीय महिला आवर्जून मराठमोळा पेहेराव करतात. नऊवारी साडी, नाकात नथ अशा गोष्टी हौसेने घातल्या जातात, तर पुरुषही सोवळं, फेटा परिधान करून पारंपरिक वेशात गणपती उत्सवाला हजर असतात.

आपल्याकडे गणपतीसोबतच गौरी देखील थाटामाटात विराजमान होतात. सवाष्णींचं हळदीकुंकू, आरास या गोष्टींना गौरीपूजेत विशेष महत्त्व असतं. पण परदेशात राहून हा साग्रसंगीत सोहळा करणं सहजशक्य नसतं. पण या गोष्टींची देखील विशेष काळजी घेऊन गौरीपूजाही केली जाते असं सांगताना पाटील यांनी त्यांच्या एका मैत्रिणीचं उदाहरण दिलं. ‘माझ्या मैत्रिणीने गौरीच्या पूजेसाठी एक विशेष शक्कल लढवली आहे. तिने गौरींचे मुखवटे आणि हात भारतातून आणले आहेत. एका खांबावर मुखवटा आणि हातांना आधार देऊन ती गौरींना साडी नेसवते. त्यांची सजावट करते. गौरींभोवतीची आरास देखील शक्य तितक्या प्रमाणात भारतात करतात तशीच असते. इथे आसपास मराठीच राहत असतील असं नाही, त्यामुळे दुसऱ्या जाती धर्माच्या भारतीय बायकांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम ती साजरा करते. शेवटी या सणांमधली एकात्मतेची भावना महत्त्वाची.. असंही त्या नमूद करतात. तसंच पहिल्या दिवशी गणपतीच्या पूजेसाठी इथे गोंधळ होऊ  नये आणि सगळ्यांना व्यवस्थित पूजा करता यावी यासाठी साधारण पूजेसाठी लागणारं साहित्य ठेवून आम्ही दोनशे तबकं तयार करून ठेवतो. हळद, कुं कू, तांदूळ, पाण्याची बाटली, एक छोटी मातीची मूर्ती असं सगळं ठेवून स्थापनेच्या दिवशी ती तबकं पूजेसाठी आलेल्या दाम्पत्यांना देतो, असं पाटील यांनी सांगितलं.

आपल्याकडे होणारे अनेक रीतिरिवाज तिथे ज्ञात नसल्याने काहीवेळेस विशेष परवानगी घेताना त्रास होतो. त्याबद्दल पाटील त्यांची एक आठवण सांगतात, आम्ही पूर्वी फ्लोरिडाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या कोकाआ शहरात होतो. तिथे समुद्रात काहीही टाकणं गुन्हा असल्याने गणपती विसर्जनासाठी आम्हाला परवानगी मिळत नव्हती. मग आम्ही भारतात होणाऱ्या विसर्जनाचे व्हिडीओ दाखवून ती परवानगी मिळवली. मूर्ती मातीची असल्याने त्यांनी परवानगी दिली मात्र बोटीतून सोबत येऊ  दिले नाही. त्यामुळे तिथल्या ऑफिसरला विसर्जन कसे करावे हे शिकवून त्यांच्या हातून ते विसर्जन केले गेले. इथे ओरलँडोमध्ये मात्र मंदिराशेजारी असणाऱ्या तळ्यामध्ये मातीच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात, तर विसर्जित ना करू शकणाऱ्या मूर्तीसाठी प्रतिमात्मक विसर्जन होते. मंडळाखेरीज काही जण वैयक्तिक स्वरूपात हे प्रतीकात्मक विसर्जन घरात किंवा मग स्वीमिंग पूल मध्येही करतातं, असं त्यांनी सांगितलं.

‘इथे अनेक दाम्पत्यं अशी आहेत ज्यांचा एक जोडीदार विदेशी आहे. मात्र आपल्या भारतीय वंशाच्या जोडीदारासाठी ते आवर्जून त्यांच्यासोबत भारतीय वेशात बसून गणपतीची पूजा करतात. गणपतीची गाणी, भजन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आम्ही गणपतीदरम्यान करतो, त्यात केवळ मराठीच नाही तर सगळ्या जाती-धर्माचे भारतीय आवर्जून सहभागी होतात. आगमन, गणपतीची आरती, मंत्रपुष्पांजली, विसर्जन, महाप्रसाद, उकडीचे मोदक असे जमेल तितके सगळे सोपस्कार आम्ही मोठय़ा श्रद्धेने करतो. नवीन पिढीला भारताबाहेर राहूनही आपली संस्कृती समजावी म्हणून इथले भटजीदेखील इंग्लिशमध्ये पूजा सांगून त्यांना परंपरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

आपल्यापासून एखादी गोष्ट लांब असली की तिची जास्त ओढ वाटते असं म्हणतात ते यांच्याकडे बघून जाणवतं. देशापासून दूर राहूनही सणांच्या निमित्ताने का होईना पण संस्कृती जपण्याचा किती चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय. आपण कित्येकदा दूरदेशी राहणाऱ्या भारतीयांच्या देशप्रेमाबद्दल आणि त्यांच्या मनातून आपली संस्कृती लोप पावत चालली असल्याबद्दल वक्तव्य करतो, पण हे सगळं ऐकल्यावर आपल्या मतांवर पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो. एकंदरीतच काय तर ही बुद्धिदेवता आणि देश जितका आपल्याला प्रिय आहे तितकाच साता समुद्रापलीकडच्या आपल्या देशवासीयांनादेखील प्रिय आहे. त्यामुळे इथे जशी गणेशोत्सवाची पुढचे अकरा दिवस धूम असेल तशीच ती दूर परदेशातूनही ऐकू येणार आहे यात शंका नाही!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:38 am

Web Title: ganesh chaturthi 2017 ganpati festival celebration in foreign foreign ganpati festival
Next Stories
1 कल्लाकार : पर्यावरणस्नेही कलात्मकता
2 आऊट ऑफ फॅशन : सणासुदीची फॅशन!
3 ब्रॅण्डनामा : सायकल ब्रँड अगरबत्ती