10 April 2020

News Flash

हॉस्टेलमधला बाप्पा

गणेशोत्सवात बहुतेक जण आपापल्या गावी, घरी जाऊन बाप्पाचं स्वागत करतात.

गणेशोत्सवात बहुतेक जण आपापल्या गावी, घरी जाऊन बाप्पाचं स्वागत करतात. पण काही विद्यार्थ्यांना मात्र घरी जायला मिळत नाही. त्यांचा गणेशोत्सव मग हॉस्टेलमध्येच दणक्यात साजरा होतो. पुण्याच्या काही हॉस्टेलाइट्स मैत्रिणींनी शेअर केलेली त्यांची एक्साइटमेंट..
ज्या विद्यार्थ्यांना गणपतीत घरी जाता येत नाही त्यांच्यासाठी हॉस्टेलचा गणेशोत्सव म्हणजे पर्वणीच असते. हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेसमध्ये तोंडाला पाणी आणणारे टेस्टी जेवण, रात्री फिरायला जाण्यासाठी मिळालेली ऑफिशियल परमिशन आणि भरपूर मज्जा हा गणेशोत्सव घेऊन येतो. या वर्षीसुद्धा विविध कॉलेजेसच्या हॉस्टेल्समध्ये धमाल वातावरण आहे. बाप्पांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. गरवारे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तर स्पर्धादेखील सुरू झाल्यात. या हॉस्टेलमधली विधी केतकर सांगते की, ‘दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील डेकोरेशनची व्यवस्था एम.एस.सी.च्या विद्यार्थिनींकडे दिली आहे. मेंदी, पी.पी.टी, रांगोळी अशा कितीतरी स्पर्धा हॉस्टेलमध्ये होणार आहेत. बाप्पांचं विसर्जनपण ढोल ताशासकट जल्लोषात होणार आहे. आमच्या डेकोरेशनची थीम यंदा ए.पी.जे. अब्दुल कलामांना वाहिलेली श्रद्धांजली असणार आहे. आमच्या गणेशोत्सवात बुद्धीला आणि कलेला प्राधान्य असतं. हॉस्टेलच्या मॅम स्वत नैवेद्य बनवतात. या उत्सवामुळे आम्ही होम सिक तर होत नाहीच आणि उलट आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळते.’
विद्यार्थी सहायक समितीच्या हॉस्टेलमध्ये राहणारी बी.ए.च्या तिसऱ्या वर्षांला शिकणारी अर्चना कावरे सांगते, ‘आमचा गणेशोत्सव इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आणि युनिक असतो. आम्ही एकही पैसा खर्च न करता इको फ्रेंडली गणपती बसवतो. तीन दिवसांच्या या गणपती उत्सवात आम्ही मागच्या बागेच्या मातीतून गणपती बनवतो. मूर्तीला हळद, कुंकू याचे नॅचरल रंग लावतो. डेकोरेशनसुद्धा आमच्याकडे असलेल्या सामानामधूनच करतो. मुली डेकोरेशनसाठी आपल्याकडे असलेल्या सगळ्यात सुंदर ओढण्या देतात. आमची या वर्षीची थीम दुष्काळ आहे. यावर आम्ही विविध स्पर्धा ठेवल्या आहेत. यामध्ये पाणी बचतीसंबंधी विविध विषय देऊन आम्ही ड्रॉइंग, पोस्टर अशा बऱ्याच स्पर्धा घेणार आहोत. या गणेशोत्सवामुळेच हॉस्टेल आमचं सेकंड होम झालं आहे.’
कमिन्स इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुंबईच्या कुहू सक्सेनाचा हा पुण्यातला पहिलाच गणेशोत्सव. केवळ हॉस्टेलचा गणेशोत्सव अनुभवता यावा म्हणून ती सुट्टी असूनही घरी जात नाहीये. ती सांगते, ‘आय अ‍ॅम सो एक्सायटेड अबाउट इट. तीन दिवसांच्या गणपती उत्सवात आम्ही मेंदी काढणार आहोत, रांगोळी काढणार आहोत. विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. इट विल बी सो फन!’
छत्तीसगढमधल्या रायपूरहून पुण्याला शिकायला आलेली दिव्या सांगते, ‘विमल निकेतन या हॉस्टेलमध्ये माझा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. इथे खूप तयारी सुरू आहे. आम्ही पहिल्यांदाच गणपती बसवणार आहोत. दीड दिवसाचाच असला तरी आमच्यात खूप उत्साह आहे. आम्ही इको- फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणार आहोत.’
पर्यावरणाला जपलं तरच बाप्पा आपल्याला सुखी ठेवतील असं मला वाटतं.’
फग्र्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणारी साक्षी जाचक सांगते, ‘इथला गणेशोत्सव फार हॅपनिंग असतो. नुसती धमाल आणि मुख्य म्हणजे मेसमध्ये रोज काहीतरी वेगळं टेस्टी असतं जेवायला. मोदकांचा प्रसाद असतो. मुलींना गणपती बघायला जाण्याची तसेच ८ च्या जागी रात्री ९ पर्यंत परत येण्याची परमिशन असते. आम्ही खूप एन्जॉय करतो हा काळ. घरचे दूर असले तरी हॉस्टेल फॅमिली छान संभाळून घेते. यावेळीदेखील आम्ही सुंदर डेकोरेशन आणि इको फ्रेंडली गणपती बसवणार आहोत.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अपूर्वाचं थोडं वेगळं मत आहे. ती सांगते, ‘हॉस्टेलच्या मागच्या भागात विद्यापीठातर्फे गणपती बसविण्यात येतो. मुली आवर्जून रोज तेथे जातात. धमाल करतात. वातावरण खूप एन्थूझिअ‍ॅस्टिक असतं. पण सकाळी ५ पासून लागणारे गाण्यांचे स्पीकर्स जरा डिस्टर्ब करतात. त्याची काळजी घेतली तर गणेशोत्सव अजूनच भारी होईल.’
मैत्री वाढविण्यात पण या हॉस्टेलमधल्या गणेशोत्सवाचं खूप योगदान असतं. खरं सांगायचं तर हॉस्टेलमधल्या प्रत्येक मुलीची नव्याने ओळख या गणेशोत्सवामुळे होते. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेच्या (सीओईपी)हॉस्टेलमध्ये राहणारी फायनल इयरची श्रुतिका चाकुले सांगते, ‘घरापासून दूर असूनसुद्धा घरी असण्याचं फिलिंग आम्हाला या गणेशोत्सवामुळे मिळतं. वर्गणी काढण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्वकाही आम्हीच करतो आणि हे फिलिंग खरच खूप भारी असतं. एन. आर.आय कोटय़ामधून आलेल्या बाहेरच्या मुली असू देत नाही तर महाराष्ट्राबाहेरून आलेल्या मुली असू देत प्रत्येकाच्याच संस्कृतीची ओळख इथे होते. नॉर्थ ईस्टच्या मुलींशी आमची गट्टी याच गणेशोत्सवामुळे झाली आहे.’
कमिन्स आर्किटेक्चर कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षांला शिकणारी उत्कर्षां लहरिया सांगते, ‘एक दिवसाचा गणपती जरी असला तरी तो एक दिवस आमच्यासाठी खूप हॅपनिंग असतो. एकत्र खेळलेल्या या फन गेम्समुळेच आज मी हॉस्टेलमधल्या कितीतरी मुलींची घट्ट मैत्रीण झाले आहे.’
कुणाला मैत्रीसाठी म्हणून तर कुणाला इनोव्हेटिव काही तरी करायला मिळतं म्हणून, कुणाला घराचं फिलिंग देणारा तर कुणाला विधायक काही करण्याची संधी देणारा हॉस्टेलमधला गणेशोत्सव मुलींसाठी खूप स्पेशल असतो. हॉस्टेल सोडल्यावर जग बदलतं, पण वेगळा आनंद देणाऱ्या या हॉस्टेलमधल्या धमाल गणेशोत्सवाच्या आठवणी नेहमीच मनात घर करून राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2015 1:35 am

Web Title: ganpati bappa of hostel
टॅग Ganesh Festival
Next Stories
1 देश तसा वेश आणि गाव तसं खाणं
2 फेस्टिव्ह तरीही सिम्पल, सुटसुटीत
3 गौराई माझी लाडाची..
Just Now!
X