परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

लंडनच्या बसेसमध्ये ‘गुड मॉर्निग लेडीज अ‍ॅण्ड जंटलमेन’ असं म्हणण्याऐवजी ‘गुड मॉर्निग एव्हरीवन’ असं म्हणणार आहेत आता. सतत तुमच्या जेण्डरविषयी आठवण करून न देता फक्त एक माणूस म्हणून वागवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सुरुवात असणार आहे.

परवा रेडिओवर एक जुनं गाणं लागलं होतं, पुरुषांनी कसं असायला हवं हे सांगणारं. त्यात अनेक तेजस्वी शब्द होते.. मर्द, लढवय्या, शूर-वीर, तलवार घेऊन लढणारा, क्रांतीसाठी फासावर जाणारा.. आणि त्यातलंच मुलींचं वर्णन होतं ते पवित्र, सुंदर, डोक्यावरून पदर घेतलेली, लाजरी-बुजरी..

माझी खात्री आहे की आजच्या जमान्यातले माझे तरुण मित्रमैत्रिणी हे वाचून एकतर शरमेने लाल झाले असतील किंवा रागाने लाल झाले असतील. स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गाने फरक जरूर ठेवले आहेत, त्यामागे काही हेतूही आहे निसर्गाचा. अगदी पूर्वी माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ होता तेव्हा तोही तितपतच हे फरक पाळायचा. पण हळूहळू मानव सुधारला, समाज तयार झाला, त्याचे नियम तयार झाले. नैसर्गिक नियमांमध्ये समाज एक एक भर टाकत गेला. मग काही कामांना, भावनांना, वर्तनांना, पोशाखांना बायकी, पुरुषी अशी लेबलं लावली गेली. काही काळाने तर या नियमांचं प्रस्थ इतकं वाढलं की ते विकृत वाटावे इतके कठोर झाले.

आजच्या मॉडर्न काळात आपल्याला या सगळ्याची इतकी सवय झालीये की त्यात काहीच विचित्र वाटत नाही. मुलांनी मस्ती केली, मोडतोड केली, मारामारी केली तर आपण म्हणतो, ‘जाऊ  दे हो, मुलगा आहे ना तो! बॉईज विल बी बॉईज!’ दंगामस्ती, दमदाटी हे सगळं खपवलं जातं मुलगा आहे या नावाखाली. गंमत अशी की फक्त अशा नकारात्मक वागण्यासाठीच हे तत्त्व वापरलं जातं; प्रेम, माया, काळजी, जबाबदारी अशा सकारात्मक वागणुकीसाठी नाही.

अमेरिकन शाळांमध्ये गोळीबार होतात. त्यातले किती गोळीबार मुली करतात? अशा हिंसक वर्तनाची सुरुवात मुलांच्या लहानपणच्या खेळण्यांमधून होत असेल का? साधी रंगांची पिचकारीसुद्धा आता बंदुकीची असते. कुठल्याही व्हिडीओ गेममध्ये किती माणसं मारली यावरच तर पॉइंटस मिळतात. नजर मरत असेल ना मुलांची! प्रत्यक्ष माणूस मारताना काहीच वाटत नसेल त्यांना. आणि तरीही या टिपिकल व्याख्येच्या बाहेर कितीतरी मुले असतात. काही हळवी असतात, काही समजूतदार असतात. काही मुलांना पटकन रडू येतं, काहींना मारामारी, झटापट आवडत नाही. काहींना डान्स, कविता, हेअरस्टाइल अशा गोष्टी करायला आवडतात. पण त्यांना सुखाने करता येतं का ते? लगेच त्यांच्या मर्दपणावरच शंका घेतली जाते. ‘शी.. किती बायकी आहे तो!’, ‘कसलं हे वागणं, शोभतं का पुरुषाच्या जातीला?’, ‘पुरुषासारखे पुरुष तुम्ही, आणि हे काय काहीतरीच!’ बायकोला मदत करणाऱ्या पुरुषाला ‘बायल्या, बायकोच्या ताटाखालचा मांजर’ अशी शेलकी विशेषणं मिळतात. हळुवार असलेल्या एखाद्या मुलाला आपल्यात हे चांगले गुण आहेत असं वाटण्यापेक्षा काहीतरी खोट आहे असंच वाटणार. किती अन्यायकारक आहे हे खरं तर!

मार्गारेट मीड नावाच्या विदुषीनं म्हटलंय, पुरुषांना नुसतं पुरुष म्हणून जन्माला येऊन पुरेसं नसतं, त्यांना आपलं पुरुषपण सिद्ध करायला लागतं. मुलं हे सिद्ध करण्यासाठी काहीही करतात. दादागिरी, जोरात गाडी चालवणं इथपर्यंतच हे थांबत नाही, तर स्मोकिंग करणं, दारू पिणं, वेश्यांकडे जाणं अशा जीवघेण्या टोकांपर्यंतही जातात मुलं. अजून मोठं झाल्यावर बायकोला मारणं, भरपूर पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते मार्ग चोखाळणं अशा कृत्यांमधून ते आपली ही स्टिरीओटिपिकल भूमिका पार पाडतात. हे अपेक्षांचे साचे इतके ठाशीव आणि सार्वत्रिक असतात की त्यांच्यातून बाहेर पडण्याची, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याची कल्पनाही मनात येत नाही.

स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे एकमेकांच्या विरुद्धच असायला हवेत का? त्यांच्यातला फरक स्वीकारून, उच्च-नीचतेच्या पलीकडे जाऊन केवळ एक माणूस म्हणून विचार करायला जमेल का आपल्याला? आणि त्यासाठी परंपरागत लिंगभेदाच्या कल्पनांच्या जळमटांमधून बाहेर यायला जमेल का?

एक मात्र नक्की, पुरुषत्वाची व्याख्या बदलायला हवीय. मर्दपणा म्हणजे माज नव्हे तर आत्मविश्वास, फुकाचा उच्चपणा नव्हे तर समाधान देणारी समानता, विध्वंसक कुरघोडी नव्हे तर सकारात्मक सहकार्य! आणि हे पुरुषांचा पाणउतारा करण्यासाठी नव्हे तर त्यांना जास्त फुलफिलिंग आयुष्य जगता येण्यासाठी, एक माणूस म्हणून जगता येण्यासाठी करायला हवं!

viva@expressindia.com