प्रेम ही डोळ्यांतूनसुद्धा व्यक्त होणारी भावना असली तरीही ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला एकमेकांना भेटवस्तू देऊन आपले प्रेम समोरच्याकडे व्यक्त करण्याकडे सगळ्या तरुणाईचा कल असतो. नव्याने जुळलेलं नातं असेल तर व्हॅलेंटाइन डेची मजा गिफ्ट दिल्या-घेतल्याने वाढतेच. आपल्या जोडीदाराच्या आवडीप्रमाणे आणि अर्थात आपल्या बजेटप्रमाणे भेटवस्तू निवडल्या जातात. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या वर्षी भेटवस्तूंचे- गिफ्ट्सचे काय नवीन प्रकार बाजारात आले आहेत, कोणत्या नवीन कल्पनांना यंदा जास्त प्रतिसाद मिळतो आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
चॉकलेट्स, फुलं, सॉफ्टटॉइज यांना साधारण दर वर्षी भरपूर मागणी असते तशी ती याही वर्षी आहे. या गोष्टी तशा सर्वाना परवडतील अशा बजेटमध्ये असतात आणि ही भेट सहसा कधी आवडत नाही, असं होत नाही. त्यामुळे सगळ्यात सेफ बेट असते ती चॉकलेट्स आणि टेडीची. कदाचित त्यामुळेच ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या भेटवस्तूंमध्ये या गोष्टी नेहमी अग्रक्रमावर असतात.
‘चॉकलेट आणि कृत्रिम फुलं यांचा एकत्रित बुके हल्ली मिळू लागला आहे. त्याला यंदा चांगली मागणी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोफ्रेम्स या वेळी मार्केटमध्ये आल्या आहेत. हृदयाच्या आकाराच्या, रोटेटिंग, संगीत वाजणाऱ्या अशा विविध फ्रेम्सना तरुणांचा प्रतिसाद मिळतो आहे,’ पुण्यातल्या ‘आर्चिज गिफ्ट्स’चे भरत शाह म्हणाले.
बाजारात तयार मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा स्वत:च्या हाताने काही तरी बनवून देण्याची कल्पनाही अनेक जण राबवतात. यामुळे त्या गिफ्टला एक आपला खास टच तर मिळतोच, पण आपल्या भावना आपल्या खास पद्धतीने व्यक्त करता येतात. फोटोकोलाज, फोटोचे व्हिडीओज, ग्रीटिंग अशा अनेक गोष्टी स्वत: तयार करून ‘व्हॅलेंटाइन्स डे’ गिफ्ट म्हणून देण्यालाही तरुण पसंती देत आहेत. पण सगळ्यांनाच कलाकुसर छान जमते असं नाही. म्हणूनच अशी ‘पर्सनलाइज्ड गिफ्ट’ तयार करून घेण्याचा ट्रेण्ड यंदा वाढला आहे.
‘पेपर बेअर क्राफ्ट्स’च्या अक्षदा तिवारी-गडकरी म्हणाल्या, ‘आम्ही पर्सनलाइज्ड हॅण्डमेड गिफ्ट तयार करून देते. त्यातला हॅण्डमेड कस्टमाइज्ड ग्रीटिंग्सना या वर्षी जास्त मागणी आहे. काही तरी वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्याचबरोबर यंदा चलतीत असणारी गोष्ट म्हणजे स्क्रॅपबुक्स! तुमचे एकत्र फोटो आणि त्याचबरोबर तुमच्या एकत्र घालवलेल्या क्षणांना काव्यबद्ध करण्यासाठी हा पर्याय या वर्षी जास्त अवलंबला जात आहे. तरुणांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पनांप्रमाणे अशी स्क्रॅपबुक्स आम्ही तयार करून देतो.’
एकूण काय तर प्रेम व्यक्त करायच्या प्रत्येकाच्या इच्छेला अनुसरून वेगवेगळे पर्याय यंदा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फक्त एका गुलाबाच्या फुलापासून सुरू होणारी गिफ्टिंग लिस्ट वाढत जाणारी असली तरी प्रेमाचे प्रतीक म्हणून फुलाच्या पाकळीऐवजी एकमेकांना दिलेला वेळ हीच व्हॅलेंटाइन गिफ्ट हल्ली सर्वाना आपलीशी वाटणारी आहे.