नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

वर्षांनुवर्षे आपण विशिष्ट पद्धतीने जगत असतो. काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ  शकतात, हे समजत असलं तरी त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कुणा एकाला पुढे यावं लागतं, शक्कल लढवावी लागते आणि सारं चित्र पालटतं. पूर्वी फोन लावण्यासाठी आपण फोन बुथवर रांगा लावायचो. मोबाइल फोन आले आणि एकाएकी सगळं चित्रच बदलून गेलं. ब्लेड व रेझर्सच्या बाबतीतही तसंच काहीसं घडलं. हा बदल घडवून आणणारा ब्रँड होता जिलेट.

जिलेट येण्यापूर्वी रेझर्स आणि ब्लेडच्या आकारावर, धारदारपणावर अनेकांनी अनेक प्रयोग केले होते. पण अचुकतेचे रहस्य जिलेटला गवसलं. किंग सी जिलेट हे एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असताना ते विकत असलेल्या बॉटलच्या बुचांकडे त्यांचं लक्ष गेलं. पूर्वीच्या कायमस्वरूपी बुचांऐवजी ‘वापरा व फेका’ धर्तीवरची बुचं पाहताना भविष्यात अशाच तात्पुरत्या वापराच्या सुटसुटीत वस्तू अधिक चालतील हे त्यांना जाणवलं. याच विचारात असताना समस्त पुरुष वर्गाचं दैनंदिन कृत्य असणाऱ्या दाढीचा त्यांनी बारकाईने विचार केला. तो काळ पाहता, दाढी मिशा करायला केशकर्तनकाराकडे जावं लागे. त्यातही घरच्या घरी जे दाढी करत त्यांनादेखील धार काढण्यासाठी ब्लेडस् सलूनमध्ये पाठवावी लागत. एकूण सगळा प्रकार वेळकाढू आणि किचकट होता.

किंग सी जिलेट यांनी १९०१मध्ये  डिस्पोजेबल ब्लेडसह सेफ्टी रेझर तयार केला. There is better way to shave and we will find it अशी जिलेट यांची भावना होती. पातळ धारदार ब्लेड हवे तर त्यासाठी हलक्या दर्जाचे स्टील वापरून चालणार नव्हते. मात्र चांगल्या प्रतीचे स्टील वापरायचे तर किंमत वाढणार असा तिढा होता. त्यामुळे जिलेट यांनी बनवलेले रेझर प्रत्यक्ष बाजारात यायला मध्ये काही काळ गेला. या काळात स्टीव्हन पोर्टर आणि विल्यम निकरसन या दोन तज्ज्ञांची जिलेट यांना मदत झाली. त्यांनी अचूक धारदारपणासह सुरक्षेची काळजी घेणारा व हाती धरायला नेटका असा रेझर डिझाइन करण्यात जिलेटना मदत केली. १९०३ मध्ये हे रेझर्स बाजारात आले. त्यांची किंमत अतिशय कमी होती. सर्वसामान्य माणसालादेखील हा रेझर परवडला पाहिजे ही जिलेट यांची इच्छा पूर्ण झाली. १९०३ साली म्हणजे पहिल्या वर्षी ५१ रेझर्स आणि १६८ ब्लेडस् विकले गेले. हाच आकडा पुढच्या वर्षी ९०,८८४ रेझर्स आणि १,२३,६४८ ब्लेडस् अशा विक्रमी टप्प्यावर पोहोचला. कमी किंमत आणि डिस्पोजेबल, सुरक्षित स्वरूप हे या खपामागचं मुख्य कारण होते. will stop making razors blades when we cant keep making them better अशी खात्रीच जिलेट यांनी दिली होती. जिलेट यांनी रेझर आणि ब्लेडसची दुनिया बदलून टाकली. आपलं उत्पादन बाजारात आणताना सुरुवातीच्या काळात पैशामागे न धावता गुणवत्तेमागे जाणं हा जिलेट यांचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. एकदा ग्राहकांचा विश्वास संपादन केला की नंतर किमतीच्या पल्याड तो बांधलेला राहातो, हा मंत्र जिलेटना अचूक गवसला.

शंभर वर्षांहून अधिक वर्षे बाजारात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या जिलेटची अनेक मॉडेल गाजली. ब्ल्यू टू, मँक थ्री (mach 3), टबरे, पॉवर, फ्युजन ही मॉडेल्स विशिष्ट सोयींचा विचार करून अस्तित्वात आली. या उत्पादनात स्त्रीवर्गासाठी देखील काही रेझर्स आणले गेले.

जिलेटच्या लोगोमध्ये केवळ जिलेट ही अक्षरेच असली तरी त्या आखणीतून धारदारपणा प्रतित होतो. २००५ साली प्रॉक्टर अँड गँबलमध्ये जिलेट कंपनी समाविष्ट झाली. पण किंग सी जिलेट यांचं नाव रेझरसोबत कायम राहणारं आहे. कंटाळवाणं वाटणारं दाढीचं काम तुलनेनं सोपं करण्यासाठी समस्त पुरुष वर्ग जिलेट यांचा ऋणी राहील. या शतकभराच्या धारदार नात्यासह कुणी म्हटलं.. the best man can get..तर नवल नाही..!

viva@expressindia.com