रुटीनच्या बाहेर जात स्वत:च्या क्षमतांना आव्हान देण्याची संधी आणि त्यातून पर्यावरणपूरक मोहिमेचा भाग व्हायचं समाधान हे दोन्ही मिळवण्यासाठी नऊ दिवसांत ७५० किमी अंतर कापण्याचं आव्हान तिनं स्वीकारलं. ‘सेव्ह अवर सह्य़ाद्री’ या मोहिमेत सामील झालेल्या मुलींपैकी एक जण सांगतेय तिचे सह्य़ाद्रीतील अनुभव..

महाबळेश्वर एक किलोमीटर.. मलाचा हा दगड पाहिल्यावर गेल्या काही महिन्यांतील घडामोडी झरझर डोळ्यांपुढून तरळून गेल्या. ‘सेव्ह अवर सह्य़ाद्री’ अर्थात एसओएसच्या सायकल रॅलीची घोषणा, त्याला प्रतिसाद देतानाची झालेली माझी घालमेल.. पर्यावरणपूरक मोहिमेचा एक भाग व्हायची एक्साइटमेंट आणि महाराष्ट्राचा बराचसा अपरिचित भाग पाहायला मिळणार, त्याची उत्सुकता होती. यानिमित्ताने केवळ हौसेखातर केलेल्या सायकलिंगपेक्षा अधिक काही मिळणार होतं. आत्तापर्यंत फक्त नकाशावर पाहिलेली अनेक गावं सायकलवरून फिरणार होते. पण सुरुवातीची हुरहुर मोठी होती.. आपल्याला झेपेल का? दोन्ही मुलींच्या शाळेतील विविध स्पर्धा, रॅली संपण्याच्या एक दिवस आधी येणारा धाकटय़ा राधाचा वाढदिवस, क्लिनिक सांभाळून दोन्ही मुलींना सांभाळताना होणारी नवऱ्याची धावपळ आणि महत्त्वाचं म्हणजे  ७०० किमी इतक्या दीर्घ सायकिलगसाठी मलाच माझ्याबद्दल वाटणारी साशंकता..असं खूप काही मनात होतं. मी मूळची महाडची. महाडसारख्या निमशहरी भागात अशा साऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीकडे पाहण्याचा एकंदरीतच दृष्टिकोन, यशस्वी व्यक्तीच्या टिपिकल व्याख्येत अडकलेला आजूबाजूचा समाज..  प्रश्नांचं मोहोळ उभं राहिलं होतं. पण सह्य़ाद्रीची हाक त्यापेक्षा वरचढ ठरली. डोंगरातल्या अ‍ॅक्टिव्हिटी कमी झाल्याची भावना पुन्हा एकदा घासूनपुसून तपासून पाहण्याची ओढ लागली आणि मोहिमेत सामील झाले. केवळ शारीरिक कस नाही तर पर्यावरणाच्या क्षेत्रातील या अनोख्या मोहिमेचं समाधानदेखील होतंच.

आमच्या दोन टीम होत्या. एक दक्षिणेला सावंतवाडीहून निघणार होती, तर दुसरी उत्तरेतल्या गुजरात सीमेवरील नवापूरहून. २०-२० सायकलिस्टच्या दोन्ही टीममध्ये मिळून १५ मुलींचा समावेश होता. दरदिवशी ७०-८० किलोमीटर सायकलिंग, गावागावांत पर्यावरण जनजागृतीचे उपक्रम असा भरगच्च कार्यक्रम होता. १९८७ साली जगदीश गोडबोले यांनी अनेक पर्यावरण प्रेमींना एकत्र आणून पश्चिम घाट बचाव आंदोलन छेडलं होतं. तब्बल १०० दिवसांची पदयात्रा केली होती. तर आता बिभास आमोणकर यांनी अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही अशा सायकल रॅलीचा घाट घातला होता.

घराचा उंबरठा ओलांडून सायकलसह नवापूर गाठलं. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हे छोटंसं शहर. इथल्या संस्कृतीवर गुजरातचा प्रभाव. या भागात सायकिलगसाठी क्वचितच कोणी येत असेल. त्यामुळे लोकांना आमच्याबद्दल फारच उत्सुकता होती. नवापुरातले औपचारिक उद्घाटन आवरून १ डिसेंबरला आमची रॅली सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारी कुडाशी येथे ‘पश्चिम घाट बचाव’ मोहिमेतील एक ज्येष्ठ सदस्य डोंगरभाऊ बागल आम्हाला भेटले. त्या दिवशी आणखीन एक धम्माल झाली. मुल्हेरकडून कुडोशीला जाताना सायंकाळी बोऱ्हाडे घाटात एका बिबटय़ाने आम्हाला दर्शन दिलं. आमच्या वाटेवर तो इतक्या शांतपणे बसला होता की जणू काही आमच्या रॅलीला अभिवादनच करायला तिथे आला होता तो!

आम्ही सारेच जण केवळ सायकली दामटवायला आलो नव्हतो. पर्यावरणाचा संदेश आम्हाला द्यायचा होता. त्यासाठी एक खास पथनाटय़देखील आम्ही तयार केलं होतं. शाळा, महाविद्यालय, मध्यवर्ती गावातील चौक अशा अनेक ठिकाणी संधी मिळेल तेव्हा आमचं पथनाटय़ सुरू होतं. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला सायकलिस्ट पत्रकं वाटत होती. अगदी एटीएमच्या रांगेत आणि एसटीस्टॅण्डवरदेखील. संधी मिळेल तेथे. कारण ही रॅली आमच्या कमिटमेंटचीदेखील होती. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल गावातील आमच्या रुटमुळे काही वेगळे अनुभव आले. सह्य़ाद्रीच्या या पट्टय़ात जंगल भरपूर, पण विरळ.

तुलनेने इतर भागांपेक्षा दळणवळणाची गैरसोयच. विजेची अनियमितता, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची कमतरता आणि भरीस भर म्हणजे जंगलांतील अतिक्रमणामुळे होणारा जंगलांचा ऱ्हास. जे जे पाहता येईल, टिपता येईल ते टिपत आमचं मार्गक्रमण सुरू होतं. दुर्गम भागातील आश्रमशाळांना भेटत होतो. रॅलीतली सर्वात आनंद देणारी ही अ‍ॅक्टिव्हिटी. त्या मुलांसमोर प्रदर्शनं लावणं, पथनाटय़ साकारणं, गावकऱ्यांशी संवाद साधणं हे सारंच खूप रोमांचक होतं.

मुंबई विद्यापीठ आमच्या मोहिमेचे एज्युकेशन पार्टनर होते. त्यांची ‘एनएसएस’ची टीम चौथ्या दिवशी देवबांधपासून सामील झाली. त्यांच्या पथनाटय़ाने रॅलीत रंग भरला. शहरी संस्कृतीत सायकलचं वेड आता छान रुळलं आहे. पण या दुर्गम खेडय़ांमधून मात्र आमचा प्रवास कुतूहलाच्या नजरा झेलत व्हायचा. आम्हा स्त्रियांना सायकल चालवताना पाहून गावकऱ्यांना फार आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. दुपारच्या वेळी घाम गाळत पेडल मारताना पाहून स्वत:हून पाणी आणून देणारे, नवापूरपासून सायकिलग करत आल्याबद्दल भुवया उंचावणारे गावकरी, अभियानाचे उद्दिष्ट ऐकल्यावर मनापासून शुभेच्छा द्यायचे. आमच्या टीममधल्या आम्ही सहा जणी वाटेतील गावांत स्त्रियांशी छान संवाद साधत होतो. पर्यावरणाच्या व स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांशी स्वत:ला जोडून घेत आमचं सायकिलग सुरू होतं. नाशिकमधील साल्हेर, मुल्हेर, सालोटा किल्ल्यांच्या अप्रतिम दर्शनानंतर जंगलांनी वेढलेल्या सुरगाण्यात विसावलो. नाशिकजवळचेच पण दुर्गम भागातील हरसूल पाहिले. माळशेज पर्वतरांगेचं दर्शन घेत नाणेघाट, जीवधन, भरवगड अशा ऐतिहासिक दुर्गाना मागे टाकत गोरखगडाच्या पायथ्याला थांबलो. रायगड जिल्ह्य़ातील प्रवेशाने शहरीकरणाचा प्रभाव जाणवू लागला. बेलगाम पर्यटनाचे परिणाम जाणवू लागले. प्लास्टिकच्या कचऱ्याचे उग्र रूप दिसू लागले.

कर्जतमाग्रे खोपोली गाठून बोर घाटासमोर उभे ठाकलो. पेडल आणि श्वासाचे गणित जुळवत खडा घाट चढून लोणावळ्यात पोहचलो. मोहिमेतला आठवा दिवस. तब्बल १०५ किलोमीटरचे अंतर कापायचं उद्दिष्ट गाठायचं होतं. एका लयीत सर्वानी हे अंतर पार केलं. हाती मिळेल तसा वेळ आम्ही वापरत होतो. शेवटचा दिवस, अंतर फक्त ४१ किमी. पोलादपूर ते महाबळेश्वर. शेवटच्या दिवसाची हुरहुर आणि अंबेनळी घाटाचं आव्हान. आदल्या दिवशी धाकटय़ा राधाचा वाढदिवस पोलादपुरातच (घराजवळून १७ किलोमीटरवर) मोहीम सदस्यांबरोबर साजरा केलेला. पोलादपूर ते महाबळेश्वर हे सायकलिंग मागच्याच महिन्यात पूर्ण केलेलं. वाटलंच तर येथूनच घरी जाता आलं असतं. पण तसं झालं नाही. त्याला कारण टीम स्पिरीट. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे आम्ही सारे निघालो. आज उत्तर व दक्षिण दोन्ही टीम एकत्र भेटणार होत्या. गेले आठ दिवस ‘सह्य़ाद्री वाचवा’ हा संदेश घेऊन गावोगावी फिरणाऱ्या आम्हा सर्वाच्या प्रयत्नांची दखल घेऊन कदाचित या सहा-सात कोटी वर्षांच्या लाडक्या सह्य़ाद्रीने आम्हाला न शिणवता अलगद महाबळेश्वरला नेऊन सोडलं. अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांची शिकस्त आम्हाला बळ पुरवत होती.

या सर्वातून आम्ही काय साधलं? फायदा-तोटय़ाचा हिशोब मांडणं तसं चुकीचंच म्हणावं लागेल. पण आम्ही सह्य़ाद्रीचं एक अनोखं रूप पाहिलं. अगदी जवळून. त्याच्या अंतरंगात कदाचित डोकावता आलं नसेल, तेथील ग्रामीण जनजीवनाचा थेट वेध घेता आला नसेल पण अनेक गोष्टी जाणवल्या. शहरांच्या जवळ असणाऱ्या गावाखेडय़ातील कार्यकर्त्यांचे सच्चे प्रयत्न पाहिले, तर कुठे जनमानसातील पर्यावरणाची उदासीनता अनुभवली, वनजमिनीवरील अतिक्रमणं पाहिली, इको टुरिझमचं विकृत स्वरूप पाहिलं, त्यातून निर्माण झालेला प्लास्टिकचा भस्मासुर पाहिला. उत्तरेकडील दुर्गम गावातील विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाचं छोटंसं बीज पेरल्याचं समाधान आम्हा सर्वाना नेहमीच राहील. नऊ दिवसांच्या या भन्नाट प्रवासाने एक नवा दृष्टिकोन दिला. कार्यकर्त्यांच्या एकजुटीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि महत्त्वाच्या म्हणजे या लाडक्या सह्य़ाद्रीने माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळवून दिला. पुन्हा एकदा त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी!

महाडसारख्या निमशहरी भागात सायकलिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीकडे पाहण्याचा एकंदरीतच दृष्टिकोन, यशस्वी व्यक्तीच्या टिपिकल व्याख्येत अडकलेला आजूबाजूचा समाज, दोन छोटय़ा मुली असे अनेर प्रश्न होते.  पण सह्य़ाद्रीची हाक त्यापेक्षा वरचढ ठरली. हौसेखातर केलेल्या सायकलिंगपेक्षा खूप वेगळं समाधान या मोहिमेतून मिळालं. लाडक्या सह्य़ाद्रीने माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा दिला

शलाका गावडे वारंगे     

(शब्दांकन : सुहास जोशी)