स्वत:चं वेगळ्या क्षेत्रातलं करिअरचं स्वप्न साकारतानाच समाजाला उपयुक्त होईल, असं कृषी जैवतंत्रज्ञानातलं संशोधन करायचा मानस व्यक्त करतेय, जपानमध्ये राहून बाजरी या पिकावर जेनेटिक इंजिनीयरिंगचे प्रयोग आणि संशोधन करणारी अंबिका.

परवा लॅबमध्ये शाळा-कॉलेजच्या दिवसांचा विषय निघाला होता. मीही माझ्या काही आठवणी सांगितल्या. मग वाटलं, त्यातल्याच काही आठवणी आता तुमच्याशी शेअर करते. मी मूळची परभणीची. बारावीला चांगले गुण मिळूनही मेडिकलला जायचं नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं मी. खरं तर भोवतालच्यांचं नि काही प्रमाणात घरच्यांचंही मत होतं, तू मेडिकललाच जा. माझा निर्णय कळल्यावर वडिलांनी समजून घेऊन पाठिंबा दिला. आईचं मन वळवल्यावर तीही राजी झाली. बारावीत जैवतंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजीविषयीचा चॅप्टर आमच्या शिक्षकांनी इतका इंटरेस्टिंगली शिकवला, की मला तो खूप आवडला. मग या क्षेत्राविषयी आणखी माहिती काढली. प्राध्यापकांकडून कळलं की, हे इमर्जिग फिल्ड आहे. जवळच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांकडं चौकशी केल्यावर फारशी आशादायी उत्तरं मिळाली नाहीत. बाबा माजी सैनिक आणि आई गृहिणी असल्यानं घरातलं या फिल्डशी संबंधित कुणी नव्हतं. तरी याच क्षेत्रात यायचं ठरवल्यावर ओळखींच्याकडून अ‍ॅग्रिकल्चरमधून बायोटेक्नॉलॉजी करण्याचा सल्ला मिळाला. त्या अनुषंगानं प्रयत्न केल्यावर लातूरमधील विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. स्कॉलरशिपही मिळाली.

बारावीनंतर मी पहिल्यांदाच घराबाहेर पडले होते. लातूरला असताना बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागलं. कधी जेवण व्यवस्थित नव्हतं, कधी मेस मिस झाली तर जेवायचा प्रश्न उभा राहायचा. मग जवळच्या असेल त्या कोरडय़ा खाऊवर भागवायला लागायचं. तेव्हा या गोष्टी घरी सांगितल्याच नाहीत. काळजीनं त्यांचा जीव अर्धा झाला असता.. कदाचित मला घरीच परतावं लागलं असतं. हे आम्हा सगळ्या जणींना सहन करावं लागत होतं. सगळ्या जणी परिस्थितीशी तितक्याच जिद्दीनं लढलो. आमचं कॉलेज तेव्हा नवीन होतं, तिसरीच बॅच होती. फारशा सोई नव्हत्या. उलट पुढं तामिळनाडू अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत भाषा सोडली तर बाकी काहीच प्रश्न नव्हता. तिथं सगळ्याच सोयीसुविधा अप्रतिम होत्या. एम.एस्सी. महाराष्ट्रात करायचं नव्हतं, कारण लातूरचं आमचं एकमेव कॉलेज होतं, या क्षेत्रामधलं. त्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा क्रॅक केली. भारतभरातून माझी पस्तिसावी रँक होती. ‘जेएनयू’ची स्कॉलरशिप घेऊन तामिळनाडू अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत एम.एस्सी.ला प्रवेश घेतला. कोईम्बतूरमधली ही युनिव्हर्सिटी भारतातील आमच्या क्षेत्रातील नंबर एकची युनिव्हर्सिटी आहे. तिथं गेल्यावर माझं आयुष्य खूपच बदललं. खूपच उच्च दर्जाचं शिक्षण होतं तिथं. तिथल्या प्रोफेसर्सनी पावलोपावली खूप मार्गदर्शन केलं. मला प्रगतीची चांगली संधी पुढं आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. तेव्हा लक्षात आलं की, हे फिल्ड घेऊन आपण काही चुकीचं केलेलं नाहीये. तो योग्यच निर्णय होता.

एम.एस्सी.ला ज्या प्रोजेक्टवर काम करत होते, त्या विषयामध्ये यूएस किंवा युरोपीय देशांमध्ये खूप कमी काम होतं. तिथं कृषी जैवतंत्रज्ञानाला फारसा वाव नाहीये. मला आपल्या धान्याला उपयुक्त असणारं संशोधन करायचं होतं, आपल्या शेतकऱ्यांसाठी. म्हणून आशियातल्याच एखाद्या देशात काम करायचं ठरवलं. मग द युनिव्हर्सिटी ऑफ टोकियोमध्ये अप्लाय केलं. एम.एस्सी. झाल्यावर जपान आणि भारत सरकारतर्फे मोंबुगाक्षो ((MEXT)) ही शिष्यवृत्ती ४ वर्षांसाठी दिली जाते. दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमानं काही जणांची निवड करून त्यांना जपानला पाठवलं जातं. शिष्यवृत्तीसाठीच्या मुलाखत-लेखी परीक्षेसाठी दिल्लीला गेले. त्यासाठीचे विविध टप्पे पार करत जवळपास एक ते दीड वर्ष ही प्रोसीजर सुरू होती. प्रत्येक क्षेत्रातून एकाचीच निवड होते, त्यात माझ्या नावाचा समावेश होता. आता इथे Asian Natural Environmental Science Center (ANESC) मध्ये येऊन मला दीड वर्ष झालंय.

माझं काम आहे कृषी जैवतंत्रज्ञानाशी संबंधित. मी सध्या बाजरी या पिकावर जेनेटिक इंजिनीयरिंग करत आहे. बाजरीमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देण्याची क्षमता आहे. माझं काम आहे की, बाजरीमध्ये अशी कुठली जनुकं (genes)  आहेत, की ज्यामुळं बाजरी हा विशिष्ट गुणधर्म (drought tolerance) दाखवते आणि हे जनुक (genes) एकदा सापडले की, मग ते अशा पिकांमध्ये टाकायचे की, ज्यांच्यावर कमी पाण्याचा खूप जास्त परिणाम होतो (drought susceptible) उदाहरणार्थ- भात. कृषी जैवतंत्रज्ञानात बऱ्याच प्रकारचं संशोधन चालतं. काहींचा थेट समाजाला उपयोग होतो, तर काहींचा संशोधन क्षेत्राला अधिक उपयोग होऊ  शकतो. मला वाटतं की, माझ्या संशोधनामुळं उपयुक्त गोष्ट गवसून त्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा. माझी पीएच.डी. तीन वर्षांची असून एक वर्ष रीसर्च पीरिअड आहे. या शिष्यवृत्तीनुसार वर्षभर जपानी संस्कृती आणि राहणीमानाशी, लॅब कल्चरशी समरस होण्यासाठी दिलं जातं. ही गोष्ट खूप चांगली आहे. आता माझा पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला आहे. हे सगळं सांगताना क्षणभर भूकंपाचा धक्का जाणवला बघा इथे आत्ता.. काळजी करू नका, मी सुखरूप आहे. भूकंपाच्या धक्कय़ांची सवय झाली आहे आताशा..

मला हा देश खूप आवडला. इथले लोक खूपच प्रामाणिक, नम्र नि समजून घेणारे आहेत. हा खूप सुरक्षित देश आहे. कसलीही भयभीती वाटत नाही. सगळे चांगलं वागतात. त्यांना त्यांच्या देशाची प्रतिमा मलिन करायची नाहीये. मी अख्ख्या आयुष्यात ऐकलं नव्हतं एवढं ‘सॉरी-थँक्यू’ या दीड वर्षांत ऐकलं. इथं यायच्या आधी जपानबद्दल ऐकलं-वाचलं होतं, त्याहीपेक्षा अधिक जपान चांगला आहे. एकदा आम्ही ट्रिपला गेलो होतो. स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होतो. आम्हाला मुक्कामी जाण्यासाठी ती शेवटची ट्रेन होती. काही तांत्रिक कारणांमुळं ती ट्रेन रद्द करण्यात आली. आम्ही विचारात पडलो, काय करावं.. तिथल्या कर्मचाऱ्याला आम्ही सगळी परिस्थिती सांगितली. तो आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन गेला. त्यांनी अनेकदा या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आमच्यासाठी टॅक्सी अरेंज केली. टॅक्सीचे पैसेही दिले. तसं त्यांच्या नियमावलीत नमूद केलेलं होतं. ही सगळी व्यवस्था व्हायला लागली, फक्त पंधरा ते वीस मिनिटं..

आमच्या लॅबमध्ये जापनीज आणि परदेशी लोक आहेत; पण युनिव्हर्सिटीत यंदा परदेशी विद्यार्थी अधिक आहेत, जपानींपेक्षा, कारण तिथल्या संस्कृतीनुसार मुलं लवकर स्वतंत्र होतील, तेवढं चांगलं असतं. त्यामुळं ही मुलं पीएच.डी.चा विचार न करता जॉब शोधतात. लॅबमधल्या जापनीज, भारतीय, इंडोनेशियन, चायनीज, फ्रेंच विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानं माझा आत्मविश्वास वाढलाय. पहिल्या वर्षभरात जपानी भाषा शिकण्याची सक्ती आहे. त्यामुळं रोजच्या व्यावहारिक गोष्टी करायला सोयीचं होतं. इथं इंग्लिश येत असलं तरी ते बोलायला फारसे राजी नसतात. जापनीज लोकांना भारतीय संस्कृती खूप आवडते. आपला पेहराव, खाद्यसंस्कृतीविषयी उत्सुकता असते. मला पेंटिंग्जची आवड असल्यामुळं इथल्या चित्रशैलीत रस वाटतो. मात्र त्याच्या सरावाला वेळ मिळत नाही.

तरुणाईवर पाश्चात्त्य संस्कृतीचा बराच प्रभाव आहे. वयस्कर लोक भाषा सोडायला तयार नाहीत. अगदी आमचा विषयही त्यांनी जपानीत कन्व्हर्ट केलाय. विविध अडीअडचणींना समर्थपणे तोंड देत जपाननं खूपच प्रगती साध्य केली आहे. तंत्रज्ञानामुळं आयुष्य खूप सोप्पं झालंय. रोजच्या आयुष्यात हे तंत्रज्ञान खूप उपयोगी पडतं. खूप वेळ वाचतो. सुरुवातीच्या काळात ही सगळी तारेवरची कसरत होती. मी शाकाहारी नि इथं व्हेज काहीच मिळत नाहीये, हे लक्षात आलं. टाइम मॅनेजमेंट व्हायचं नाही. इथं तेरा-चौदा तास काम करावं लागतं. त्यानंतर दिवसभराचा डबा तयार करायचा असायचा. जपानी येऊ  लागल्यावर संवादामुळं काही कामं सोपी झाली. आता व्यवस्थित रुटिन सुरू झालंय.

सुरुवातीला वर्षभर एकटी राहिले. माझ्या प्रोफेसरना माझं लग्न झालंय, हे  समजल्यावर त्यांनी नवऱ्याची- हर्षराजची चौकशी केली. हर्षराज अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत. रीसर्च असोसिएट पोस्ट मिळाल्यावर ते इथं आले. माझ्या कामाचं- अभ्यासाचं स्वरूप ते नेहमीच समजून घेतात. मला कायमच मदत करतात. वीकडेजमध्ये काम एके कामच असतं. वीकएण्डला कुणीच कुणाच्या वेळेत ढवळाढवळ करत नाही. तेव्हा आम्ही बाहेर एक्सप्लोर करतो. ट्रेकिंगसाठी आम्ही माऊंट फुजीला गेलो होतो. रात्रभर ट्रेकिंग करून पहाटे आपण माथ्यावर पोहोचतो, तेव्हा सूर्योदय बघायला मिळतो. एरवी मी पाण्याला घाबरते, पण आम्ही रिव्हर ट्रेकिंगला गेलो होतो. तो खूपच छान अनुभव होता. कुठं बाहेर गेलो नाही, तर ग्रुपमध्ये बॅडमिंटन, व्हॉलीबॉल खेळतो. मला खेळाची आवड पहिल्यापासूनच आहे. मात्र त्याकडं करिअर म्हणून न वळण्याचं कारण म्हणजे मध्यमवर्गीय घर होतं. स्पोर्ट्स अ‍ॅफोर्डेबल नव्हतं तेव्हा. आईला माझ्या भल्यासाठी वाटे की, मी खेळण्यापेक्षा चांगलं करिअर करावं.. तरीही मी जिद्दीनं बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, ज्युडो, कराटे, क्रिकेट खेळायचे. शाळेत असताना सगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये भाग घ्यायचे. परभणीसारख्या ठिकाणी मुलींनी खेळायला लोक नावं ठेवायचे. क्रिकेटमध्ये आमची परभणी टीम राज्यस्तरीय खेळली होती. जिंकल्यावर आमच्याबद्दल चर्चा झाली नि खिल्ली उडवली गेली होती. तरी बी.एस्सी.पर्यंत खूप खेळले. पुढं अभ्यासामुळं वेळच मिळेनासा झाला.

जपानमध्ये आल्यावर मी सभाधीट झाले आहे. आत्मविश्वास वाढलाय. इथं काहीही प्रश्न विचारला, तरी अ‍ॅप्रिशिएट करतात, सपोर्ट करतात. इथं गोष्टी कायमच वेळेवर होतात. दिवसभराच्या वेळापत्रकाची नोंद एका डायरीत करावीच लागते. हे वेळेचं गणित शिकल्याचं समाधान वाटतंय. जीवन शिस्तबद्ध झालंय. माहेरच्यांइतकीच सासरकडची मंडळीही मला खूपच पाठिंबा देतात. निवांत असल्यावर भारतातल्या गोष्टी मिस करते. मग घरी फोन करून पोटभर गप्पा मारते. मला वाटतं की, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा डळमळू दिलं तर मग होमसिक फील करतो आणि मग अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. अशा वेळी स्वत:ला सांभाळावं लागतं..

‘इंडियन सायंटिस्ट असोसिएशन इन जपान’च्या कॉन्फरन्समध्ये जगभरातले अनुभवी शास्त्रज्ञ आले होते. तिथं मी पोस्टर सबमिट केलं. प्रेझेंटेशनही केलं. माझ्या कामाला खूप छान प्रतिसाद मिळाला. ‘बेस्ट पोस्टर अ‍ॅवॉर्ड’ मिळालं. क्षणभर विश्वासच बसला नव्हता, पण ते खरं होतं.. असं रुटिन सुरू असतानाच भविष्याचा विचार मनात डोकावतो.. पीएच.डी.नंतर भारतात परतायचं आहे. शास्त्रज्ञ म्हणून भारतीय कृषी अनुसंधान केंद्रात काम करायचं आहे.. मला वाटतं की, प्रस्थापित क्षेत्रात यायचा प्रयत्न जरूर करा. प्रयत्न यशस्वी झाला तर चांगलंच, पण नाही झाल्यास खचून न जाता वेगळ्या क्षेत्रासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे..

(शब्दांकन : राधिका कुंटे)

———————

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com