21 October 2018

News Flash

सूर ग्लोकल!

संगीत ही मुळातच एक सामाजिक घटना आहे.

गाणी हा खरंतर आबालवृद्धांच्या आवडीचा विषय. आपल्या आवडत्या गायकाची, आपली आवडती गाणी आपण सतत ऐकत तरी असतो किंवा स्वत:शीच का होईना पण गुणगुणत तरी असतो. या संगीताचा देशपरदेश प्रवास हा आपल्याला पिढय़ान पिढय़ा पाहायला मिळतो. सध्याची नवीन पिढी ही जुन्या आणि नव्या संगीताला एकत्र आणत त्याच्याशी एकजीव झालेली पिढी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याउलट जुन्या पिढीसाठी लोकल आणि ग्लोबल हा फरक अत्यंत महत्त्वाचा होता, कारण एक रसिक म्हणून आपण जे लहानपणापासून ऐकत आलो आहोत तसा आपला एक पिंड तयार होतो आणि तो पिंड जपणे हे फार महत्त्वाचे असते.

‘संगीत ही मुळातच एक सामाजिक घटना आहे. समाजातील अर्थकारण आणि एकंदर समाजकारण या सगळ्यातून ते घडत असतं. कोणतंही संगीत हे त्या लोकल संस्कृतीचाच एक परिपाक असतो असं म्हणावयास हरकत नाही. लोकल ते ग्लोकल हा फरक आता पूर्वीइतका जाणवत नाही कारण नवीन पिढीच्या संस्कृती धारणांमध्ये तितकासा फरक नाही आहे. ती संस्कृतीच, पर्यायाने त्या संगीतालाही एकजीव करते आहे. त्या संगीतात एक भारतीय संगीताचा पैलू असेलही पण जो नाद असतो तो ‘ग्लोबल’ असतो’, असं या ‘ग्लोकल’ संगीताबद्दल लेखक व गायक आशुतोष जावडेकर यांचं मत आहे.

मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे जस्टिन बिबर येऊ न गेला किंवा एड शिरीनचं ‘शेप ऑफ यू’ या गाण्याला आपल्याकडे फार मोठा प्रतिसाद मिळताना आपण पाहतो आहोत. हिंदीत नाही एवढे इंग्लिश पॉप सेन्सेशन्स आणि त्यांची गाणी आपल्याकडच्या तरुणाईच्या प्लेलिस्टवर ठाण मांडून आहे. याविषयी बोलताना मुळात तंत्रज्ञानाने आपल्याकडे फार प्रगती केलेली आहे. आपण आता स्टुडिओमध्ये जो साऊंड वापरतो तो आता फार काही मराठमोळा राहिलेला नाही. जसं तिकडून काही गाण्यांचे प्रतिसाद इथे आपल्याला उमटलेले दिसतात तसेच येथील लोकल गाण्यांचे पडसाद त्यांच्यावर झालेले दिसत नाहीत. आपली लोकल लावणी तितकीशी ग्लोबल झाली आहे असं मला वाटत नाही. कारण लावणीच्या ठेक्यात ती जगाला एक नृत्यसंगीत म्हणून का होईना वेड लाऊ  शकेल इतकी क्षमता आहे. म्हणूनच आपलं जे लोकल आहे ते आपण जागतिक संगीतगंगेमध्ये नेऊन सोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत हवेत, असा मुद्दा त्यांनी मांडला.  त्यातल्या त्यात बॉलीवूड संगीताचा नाद निदान जगभरात पोहोचला आहे. त्यात जगभरातल्या संगीताचं  एकत्रीकरण झालेलं असल्याने असेल कदाचित मात्र त्याचा एक वेगळाच नाद आहे आणि त्या नादावर जग फिदा असल्याने ते खऱ्या अर्थाने ‘ग्लेकल’ झालेलं आहे.

श्रुती जोशी

First Published on December 29, 2017 12:37 am

Web Title: global music writer and singer ashutosh javadekar