25 November 2017

News Flash

जीएसटीचा हिशेब!

जीएसटीचा परिणाम फास्ट फूडप्रमाणेच झालाय मोबाइलवर.

लोकसत्ता टीम | Updated: July 14, 2017 12:39 AM

 

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती जीएसटीची. पण तरुणाईला त्याबद्दल कितपत माहिती आहे? जीएसटीचा फुल फॉर्म तरी किती तरुणांना माहिती आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा शोध घेतला व्हिवा टीमने. जीएसटीविषयी एक छोटंसं सर्वेक्षण करून.

गेला महिनाभर जीएसटीचा टीआरपी सगळ्यात जास्त आहे. वृत्तपत्रातील बातम्यांपासून ते दुकानांच्या बोर्डापर्यंत सगळीकडे जीएसटीचीच चर्चा आहे. या विषयी जुजबी किंवा संपूर्ण माहिती नक्की किती जणांना आहे, याचा मागोवा व्हिवा टीमने घेतला. त्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी अशा अनेक निवडक शहरांतील तरुणाईशी आम्ही संवाद साधला.

सव्‍‌र्हेचा पहिला प्रश्न होता, ‘जी.एस.टी.चा फुल फॉर्म काय?’ या प्रश्नावर क्लीन बोल्ड न होता तरुणाईने गुड्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिस टॅक्स हे योग्य उत्तर दिलं आहे. या प्रश्नाचं उत्तर १०० टक्के बरोबर मिळालं. ‘तरुणांना कसलाच पत्ता नसतो’, या वाक्याचा फुगा तरुणाईने या प्रश्नाचं उत्तर देऊन फोडून टाकला. पहिल्या प्रश्नात पास झाल्याने अनेकांचा आत्मविश्वास दुणावला.

‘ जी.एस.टी. म्हणजे नेमकं काय? याची कल्पना आहे का, या प्रश्नावर पुणेकरांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कुणी म्हणालं की, ‘ही एक नवीन टॅक्स सिस्टीम आहे. जी आधीच १४२ देशांमध्ये अस्तित्वात आहे.’ तर कोणी म्हणालं, ‘एक देश एक टॅक्स पद्धती ही सगळ्यात उत्तम आणि सोप्पी पद्धती आहे.’ एकंदरीत पुण्यातल्या तरुणांना जी.एस.टी. हा उत्तम पर्याय आहे असं वाटतं. पण १० टक्के तरुणांना या विषयी नेमकी काहीच कल्पना नाही. पुणेकरांप्रमाणेच मुंबई, रत्नागिरी आणि औरंगाबादच्या तरुणांना या विषयी माहिती आहे. परंतु नाशिक, साताऱ्याकडच्या तरुणांना जी.एस.टी. म्हणजे नेमकं काय? हे शोधण्यात काहीही रस नाही. अशा मुलांना उत्सुकतेपोटी तरी जी.एस.टी. म्हणजे काय? याचा शोध घेतला का? असं विचारल्यावर ‘आमच्या आयुष्यावर काही फरक पडत नाहीये मग कशाला घ्यायचा शोध?’, ‘आम्ही कोणताही टॅक्स भरत नाही, मग कशाला माहिती घ्यायची आम्ही,’ अशी उत्तरं मिळाली. पण याच प्रश्नोत्तराच्या संवादावर एका तरुणाने खूपच छान उत्तर दिलं, ‘मुलांना वाटतं की आपण पैसे कमवत नाही म्हणून मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. पण या मुलांना माहितीच नाही की, सिनेमा बघायला गेलो तरी आपण ‘एन्टरटेन्मेंट नावाचा टॅक्स भरतोच. आपण कमवत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपण टॅक्स भरतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही.’

यापुढचा चौथा प्रश्न होता, ‘जीएसटीचा परिणाम कोणत्या कोणत्या खाण्याच्या वस्तूंवर झाला आहे हे माहीत आहे का?’ कारण हा परिणाम बहुतांशी तरुणाईच्या लाडक्या फास्ट फूडवरच झाला आहे. हे लक्षात घेऊनच हा प्रश्न विचारला गेला होता. यावर मात्र ‘अरे इथे मोठय़ा माणसांनाच फार माहिती नाही. तिथे आम्हाला काय असणार?’ अशी प्रतिक्रिया आली. मुंबईतल्या तरुणांनी वेगळं मत मांडलं. ते म्हणाले, फास्ट फूड महाग झालंय. पण बरंच झालंय कारण ते आरोग्याला घातक आहे. काहींना असं वाटतंय की फक्त मॅकडी, बर्गरकिंगसारख्या मोठय़ा ब्रॅण्डवर परिणाम झालाय, लहान ठेल्यांवर काहीच परिणाम नाही. याच प्रश्नाचे उत्तर पुण्यातील फक्त ५० टक्के लोकांना माहिती होतं. बाकीच्यांना तर त्याचा गंधही नव्हता. सोलापूरच्या आणि रत्नागिरीच्या तरुणांनाही याविषयी फार माहिती नव्हती. नाशिकमधल्या केवळ २० टक्क्यांनाच याबद्दल थोडीफार माहिती होती. बाकीच्यांची पाटी कोरीच होती. साताऱ्याच्या तरुणांनी मात्र या प्रश्नाचं चोख उत्तर दिलं. कोणत्या खाण्याच्या वस्तूवर परिणाम झाला आहे, इथपासून ते साधारणत: किती टक्क्यांनी जीएसटी लागू झालाय, इथपर्यंत सगळंच माहिती होतं.

जीएसटीचा परिणाम फास्ट फूडप्रमाणेच झालाय मोबाइलवर. हा सुद्धा तरुणांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक. मग खाणं आणि मोबाइलवरच्या वाढत्या किमतींमुळे काही पर्याय शोधला आहे का, या प्रश्नावर सर्वच विद्यार्थ्यांनी नाही असंच उत्तर दिलं आहे. काही जण म्हणाले की, ‘आम्ही आता जास्तीत जास्त एकऐवजी दोन र्वष वापरू फोन.’ तर काही म्हणाले, ‘काय पर्याय शोधणार? जीएसटीने काही पर्याय ठेवलाच नाही आहे.’ काही जण म्हणाले, ‘आता या वाढत्या किमतींमुळे भावंडांसोबत जास्त गोष्टी शेअर कराव्या लागणार आहे.’ तर काही जण मात्र खरोखरच पर्यायांचा विचार करत आहेत.

एकंदरीतच आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांबरोबर बोललो त्यातील ५० टक्के ते ६० टक्के विद्यार्थ्यांनी जीएसटीचा चांगला अभ्यास केला आहे. आपल्या देशाचा विकास नक्कीच होणार आहे, असा सूरही काहींनी लावला. पण  ३० टक्के ते ४० टक्के  विद्यार्थ्यांना याबद्दल काही बोलायचंच नाहीये. त्यांना जीएसटीबद्दल जाणूनही घ्यायचं नाहीये. पण काही विद्यार्थी मात्र या किमती वाढण्याच्या पलीकडे विचार करतायत. त्यांना भलतंच टेन्शन आलंय. ती आहेत, सीए करणारी मुलं. या विद्यार्थ्यांचा अभ्यास आता वाढलाय. त्याचं काही जणांना टेन्शन आलंय तर काहींनी या बदलाचं स्वागत केलंय. एकूणच या पिढीतही तीन गट पडलेत. एका गटाला कसलंच सोयरसुतक नाही. दुसऱ्या गटाला सगळ्याचीच माहिती ठेवायची आहे. तर तिसरा गट जोवर स्वत:वर येत नाही तोपर्यंत याकडे लक्षच देत नाहीये. मग वाचकमित्र, मैत्रिणींनो तुम्ही कोणत्या गटात मोडता?

  • संकलन : तेजश्री गायकवाड.
  • सर्वेक्षण सहभाग – राधिका कुंटे, वेदवती चिपळूणकर, गायत्री हसबनीस, आदित्य दवणे, चित्ततोष खांडेकर, विदिशा कुलकर्णी.

viva@expressindia.com

First Published on July 14, 2017 12:39 am

Web Title: goods and services tax information on gst