हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

काही ब्रॅण्डस् युगानुयुगे म्हणता येईल, इतके आपल्या आयुष्यात असतात. त्यांचं असणं जाणवत नाही पण त्यांची गरज भासल्यावर ते जवळपास नसतात तेव्हा त्यांचं महत्त्व अधिक जाणवतं. अगदी आयोडेक्ससारखं. भारतातील जुना वेदनाशामक बाम म्हणून आयोडेक्स लक्षात राहतं.

जीएसके अर्थात ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या सुप्रसिद्ध कंपनीचं हे उत्पादन भारतात १९१९ पासून सुरू झालं. काळ्या रंगाच्या काचेच्या छोटय़ा बरणीवरचं हिरवं कागदी आवरण आणि आतलं काळंशार औषध अनेक अर्थाने वेगळं वाटायचं. एक तर काळा बाम, त्यातही तो उग्र गंध आणि चिकचिकीतपणा या सगळ्या गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्यातही ‘ऊ आह आऊच’पासून म्हणजेच शरीराला जाणवणाऱ्या सगळ्या वेदनांपासून मुक्ततेची ग्वाही हा ब्रॅण्ड देत होता. काही बाम सर्दीवर गुणकारी होते, काही फक्त डोकेदुखीवर पण आयोडेक्सने मात्र कंबर, सांधे, खांदे, मान, गुडघे अशा सगळ्या दुखण्यांवर इलाज करण्याचा दावा केला. अशा प्रकारच्या औषधांचे फारसे पर्याय नसण्याच्या काळात त्यांना स्वतंत्र स्थान निर्माण करणं सोपं गेलं. सुरुवातीला आयोडिनचा वापर करणारं आयोडेक्स काळाच्या ओघात बदललं आणि नैसर्गिक घटकांचा वापर करू लागलं. गंधपुरा तेल, पुदिना फुलं, निलगिरी तेल, लवंग तेल, टर्पेन तेल यापासून सध्या आयोडेक्स बनतं.

एक काळ आयोडेक्सने वेदनाशामक औषधांच्या विश्वात अक्षरश: एकहाती सत्ता गाजवली. वेदनाशामक बाम वर्गातील औषधांत आयोडेक्सचा ७०% वाटा होता. त्या काळात असं एखादंच घर असेल जिथे आयोडेक्सची बाटली नसावी. कधीही गरज लागली तर असलेलं बरं, म्हणून आयोडेक्स नुसतं घरी नसायचं तर त्याची कपाटातली, फळीवरची जागासुद्धा निश्चित असायची. कोणतीही दुखापत झाल्यावर आयोडेक्स जागेवर नसणं किंवा ते संपलेलं असणं म्हणजे हाहाकार असायचा.

इतकं एकमेवाद्वितीय स्थान प्राप्त होऊनही नेमकं असं काय घडलं की, आयोडेक्सनंतरच्या काळात मागे पडलं? एक तर बाजारात अशा प्रकारच्या औषधांचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले. त्यातही ‘मूव्ह’सारख्या उत्पादनांनी आपले उत्पादन टय़ूबच्या आकारात देऊन ग्राहकांसाठी वापरातील सहजपणा आणला. अतिउग्र गंध हा नव्या औषधांनी टाळला. त्याचा परिणाम आयोडेक्सच्या खपावर झाला.

काळाची गरज ओळखून आयोडेक्सही बदललं. त्यांनी काळ्या रंगाचा त्याग केला. आतला बाम हिरवा झाला.  काचेच्या बाटलीजागी प्लास्टिकची हिरवी बाटली आली. २०११ साली आयोडेक्स अल्ट्रा जेलच्या रूपातही आलं. २०१५ मध्ये आपलं खरं बलस्थान ओळखत आयोडेक्सने पुन्हा नव्याने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पध्र्याच्या ‘कमर दर्द का स्पेशालिस्ट’ या टॅग लाइनला प्रत्युत्तर म्हणून ‘बदन के हर दर्द के लिए सिर्फ आयोडेक्स’ असं प्रत्युत्तर दिलं गेलं. तसं तर ग्राहकांच्या मनात पुन्हा घर करणं आयोडेक्ससाठी कठीण नव्हतं. कारण ‘आयोडेक्स मलिए काम पे चलिए’ हा गेल्या ९८ वर्षांतला अनेकांचा शिरस्ता होता. लोकांशी असलेला इतक्या वर्षांचा ऋणानुबंध जपत नव्या कल्पनांसह आयोडेक्स पुन्हा आपली जागा निर्माण करू पाहात आहे. ‘‘आयोडेक्स से लंबा आराम’ किंवा ‘मां तुझे सलाम’ या जाहिरातीतून ते दिसून येतं. विद्या बालन किंवा सायना नेहवाल यांसारख्या सेलेब्रिटींचा जाहिरातीतला वावर आयोडेक्सने स्त्री ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं आहे, हेसुद्धा स्पष्ट करतो. २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात रीडर्स डायजेस्ट गोल्डने  विश्वासार्ह ब्रॅण्डच्या यादीत आयोडेक्सचा समावेश केला होता. आज खूप सारी स्पर्धा असूनही आयोडेक्सविषयीचा विश्वास कायम आहे, यात दुमत नाही. आनंदाच्या क्षणी अनेक ब्रॅण्ड आपल्याला साथ देतात पण वेदनेच्या क्षणी सोबत करणारे ब्रॅण्डस् कमीच! आयोडेक्स हा अशा ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. हर दर्द का साथी..

viva@expressindia.com