गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीची पुढची पिढी अवतरली आहे. 
ती सांगतेय तिचं मनोगत..

हॅलो.. शुक.. शुक.. इकडे इकडे.. या गॅलरीत याऽऽ, रेंजसाठी येता तस्सेच.. जरासं वर बघा, येस्सऽऽ. बघितलंत का मला.. मीपण तुमच्यासारखीच नटलेय. यू नो, मराठी अटायर.. मी मराठी, वगैरे वगैरे.. काठीच्या टोकाला छान रेशमी वस्त्र बांधलंय. चांदीचं भांडं पालथं घालून त्यावर कडुलिंब आणि फुलांची माळ बांधलेय. गाठीही आहे.. करेक्टली ओळखलंत तुम्ही. मी गुढी बोलतेय, तुमच्या गॅलरीतली. तुमच्या गॅलरीत नसेल उभारली तर शेजारीपाजारी तरी दिसेन मी किंवा मग सोशल मीडियावर माझं अस्तित्व आज तुम्हाला पोस्टगणिक शेअर झालेलं दिसेलच. असं दचकून बघू नका, मीही जनरेशन नेक्स्टमधलीच आहे, तुमच्याप्रमाणं. सो, सगळे अपडेट्स आहेत मला.
तर आजपासून आपल्या नवीन वर्षांचा प्रारंभ झालाय. वसंत ऋतूचं आगमन आणि नव्या वर्षांचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो. नाही नाही, आणखी माहितीबंबाळ करून मुळीच बोअर करणार नाहीये तुम्हाला. कारण जवळपास सगळ्या पुरवण्या चैत्र पाडव्याच्याच माहितीनं, वर्णनानं भरलेल्या असतील. अर्थात त्या तुम्ही वाचल्याच असतील की नाही, डोण्ट नो.. ओके. तर आजचा दिवस माझा आहे, त्यामुळं माझी बडबड थोडी ऐकून घ्याल असं वाटतंय.

आपल्या आधीच्या पिढीची डोकॅलिटी कसली भारी होती नाही. सगळ्या सणांना ऋतूंच्या बदलाचं परिमाण त्या काळातल्या लोकांनी दिलंय. थोडंसं भोवताली नजर टाकलीत तर झाडांना फुटलेली पालवी दिसेल की तुम्हाला. नवा बहर, फुलणं आणि गळणंदेखील.. फक्त त्यासाठी किंचितसा वेळ काढायला हवा. तसं तर तुमची फास्ट लाइफस्टाइल त्या कोकिळानंही आपलीशी केलेय. चैत्रात ‘कुहू’ कानावर पडणार, हे समीकरण तोही विसरलेला दिसतोय. कारण थोडं आधीपासूनच ‘कुहूकुहू’च्या ताना कानी पडताहेत. मान्य आहे, अरिजित सिंग आणि मंडळींचा आवाज तुम्हाला आवडतो. पण कोकीळ किंवा हळद्याचे आवाज ऐकायला फक्त कान जागृत ठेवले की काम फत्ते. मग हेडसेट नको की काही नको. किंवा मग फुलपाखरांचे विभ्रम नि मोगऱ्याचा हवासा सुगंध, हिरव्या रंगांचं कलर पॅलेट अनुभवता येईलच की प्रत्यक्ष. खादाडी हा अनेक खवय्यांच्या आवडीचा विषय. पाडव्याच्या निमित्तानं केलेलं श्रीखंड चापण्यापासून सुरू झालेली खादाडी कैरीची डाळ, पन्हं, हरभऱ्याच्या उसळीपर्यंत आणि आंबे, कलिंगड, जांभळं-करवंदांच्या जाळीपर्यंत फार विस्तारलेली असते. पण त्याची खबरबात बर्गर-पिझ्झात मग्न असणाऱ्यांना असते का? डोण्ट नो.

आज तुम्ही स्वागत यात्रेच्या मिरवणुकीत जाऊन मस्त सेलिब्रेशन केलं असेलच. नटणं-थटणं-मुरडणं आणि गाना-बजाना-खाना वगैरे, वगैरे. काहीतरी भारी खरेदीही झाली असेल कदाचित. न्यू इअर है भाई अपना भी! पण हे एवढय़ावरच थांबावं का तुम्ही.. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. पण भोवतालाचं भानही ठेवायला हवं नाही का.. पर्यावरण, त्याच्याशी निगडित समस्यांचे डोंगर, दुष्काळाचं सावट, समाजातल्या शोषितांचं-वंचितांचं जगणं.. तुमच्या चौकटीतल्या डे टू डे लाइफच्या पलीकडल्या जगाकडं सजगपणं पाहायचा संकल्प करू शकता की तुम्ही या नव्या वर्षांच्या निमित्तानं? या फुलण्याचा -बहरण्याचा आणि मोहरण्याच्या सणाच्या निमित्तानं नव्या सकारात्मक विचारांची गुढी उभारायला शिकायला हवं तुम्ही. मग माझी प्रतीकात्मक उभारणी नाही केलीत तरी चालेल. तर कोवळ्या पालवीला साक्षी ठेवून संकल्प कराच तुम्ही, कारण संध्याकाळी मला उतरवलं जाईल, पण पालवी असेलच. पानांमधून, फळांमधून.. चैतन्यदायी भवतालामधून. ऑल द बेस्ट.. बाय!

– राधिका कुंटे