गायत्री हसबनीस

आज भारतात खादी चळवळ पुन्हा जोर धरत असताना स्वदेशी चळवळीची आठवण येते. संपूर्ण देशात गावागावात तासन्तास राबून अस्सल भारतीय हातमाग आणि त्यावर बनलेल्या कपडय़ांना फॅशनच्या फूटपट्टीत मानाचे स्थान मिळवून देण्याचा अजून एक प्रयत्न योग्य वेळी जुळून आला तो ‘आर्ट एक्स्पो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या हातमाग कारागिरांच्या कलेतून साकार झालेल्या पारंपरिक कपडे, अ‍ॅक्सेसरीज, होम डेकोर, चपला, बॅग अशा नानाविध वस्तूंच्या प्रदर्शनाने. या वस्तू आपण कुठेही, कशाही खरेदी करू  शकतो. या एक्स्पोला भेट देत हातमागावरच्या कपडय़ांना फॅ शनचा चेहरा कसा मिळतोय याविषयी खुद्द कारागिरांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न व्हिवाने केला..

हातमागाला भारतीय संस्कृतीत अत्यंत श्रीमंत वारसा आहे. भारताबाहेर हातमागाला भरपूर मागणी असतानाच भारतातसुद्धा हातमागाची लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी यंदा फॅशन डिझायनर, हॅण्डलूम एक्स्पर्ट मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले आहेत. हात्मागावरची कलाकुसर तर सामान्य माणसाला भुरळ पाडणारी आहेच; परंतु अशा अप्रतिम कारागिरीची साडी, एखादा ड्रेस, स्कर्ट, वनपीस, पलाझो, कुर्ती, क्रॉप टॉप, जॅकेट, दुपट्टा, चपला, अ‍ॅक्सेसरीज असे विविध प्रकार परिधान करता आले तर कोण नाही घेणार? या प्रकारांना आगळ्यावेगळ्या स्टाइलमध्ये जर आपल्यासमोर ठेवले तर त्यांचे कुतूहल वाढत जाते आणि आपणही ते परिधान करायला हवं असा मतप्रवाह तयार होत जातो. नेमकं हेच साध्य करण्याचा प्रयत्न ‘आर्ट एक्स्पो’ या मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाच्या माध्यमातून केला गेला.

हातमागाचे कापड घेऊन ग्राहकांनी काही शिवण्यापेक्षा आम्हीच त्यांना तयार आणि विशेष म्हणजे डिझायनर वेअर देणं आवश्यक आहे. कारण ‘रॉ मटेरिअल’पेक्षा ‘फिनिश्ड गुड’ लोकांना हवंय हे लक्षात आल्यानंतर आम्ही तसे हॅण्डलूमचे डिझायनर्स शोधले आणि तसे हॅण्डलूम डिझायनर वेअर आकाराला आले, असं मत ‘आर्ट एक्स्पो’च्या संचालिका उज्ज्वल सामंत यांनी मांडले. तरुणाई याकडे आकर्षित व्हावी यासाठी सध्या घरोघरी लोकप्रिय असलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ही या आर्ट एक्स्पोचे प्रतिनिधित्व करत होती.

हातमागातील स्टाइल, ट्रेण्ड आणि महत्त्व –

आज हातमागावरच्या कपडय़ांची स्टाइल ही जुन्या म्हणजेच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट जमान्यातील स्टाइलच पुन्हा इन झाली आहे. वनपीसमध्येही जून्या पद्धतीचे हात, गळा, कट्स हे हातमागात आले आहेत. ब्लाऊ जमध्ये बॉट नेक ब्लाऊज हा प्रकार सर्रास दिसू लागला आहे. त्यातही जयपुरी ब्लॉक प्रिंट, टस्सर सिल्क, प्युअर सिल्कचे

ब्लाऊ ज ट्रेण्डमध्ये आहेत. लिनेन हे फॅब्रिक तर जोरदार ट्रेण्डमध्ये आहे. मुख्य म्हणजे लिनेन हे सर्वत्र वापरले जाते उदा. लिनेनच्या साडय़ा, ब्लाऊज, क्रॉ टॉप, पँट, वनपीस, ड्रेस असे सर्व प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. साडय़ांमध्ये यंदा कॉन्ट्रास्ट कलरच्या साडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. आता हातमागात प्लेन साडी असेल तर डिझायनर

ब्लाऊ ज किंवा मल्टिकलर ब्लाऊ ज ट्रेण्डमध्ये आहे. लग्नात सिल्क आणि सिल्कवरील प्रिंट, जर आणि लिनेन असे विविध फॅब्रिक ट्रेण्डमध्ये आहेत. या अर्थाने ८० टक्के खादीसोबत २० टक्के लिनेन, सिल्क, कॉटन हातमागावर ताना आणि बाना पद्धतीने विणलेल्या साडय़ा ट्रेण्डमध्ये दिसतील, अशी माहिती उज्ज्वल यांनी दिली. थंडीत फेस्टिवल सीझनच्या अनुषंगाने धाग्याबरोबर घिचा, चंदेरीने विणलेले स्टोल, हातमाग साडय़ांमध्ये धोती साडीवर डिझायनर टॉप, दुपट्टा, जॅकेट अशा स्टाइल इन आहेत. बंगाली जुन्या पद्धतीच्या साडय़ा आणि ब्लाऊ जमध्ये ‘घुटी हाता’ (पफ) स्टाइलचे ब्लाऊ ज आले आहेत. जुनी परंपरा आधुनिक काळात आजच्या स्टाइलशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत, असं मतं हातमागातील ट्रेण्ड सांगताना ‘युती हॅण्डलूम’च्या अंतरा दत्त यांनी मांडलं.

याशिवाय प्युअर सिल्क, कॉटन आणि खादीवर केलेला हॅण्ड स्टिच ‘काथा’, जामदानी असल्याने फ्लोरल डिझाइन, पॉमपॉम, अ‍ॅप्लिक, बाटिक, असे विविध प्रकार हातमागातच दिसून येतील, आणि हाताने केलेली कोणतीही कलाकुसर सध्या ट्रेण्डमध्ये आहे, अशी माहिती ‘स्रिजनी हॅण्डलूम’च्या सुमन पारूल यांनी दिली. ‘बूनकर विवर्स’च्या अमन जैन यांनी बिहारी, बागलपुरी पद्धतीने प्युअर सिल्क, कॉटन सिल्क, लिनेन, घिचा, जामदानी या हातमागातून मास्टर विविंग होत असल्याचे सांगितले ज्यात चेक्स, सुभाषितं, म्युझिकल प्रिंट, फ्लोरल डिझाइन उपलब्ध आहेत. हातमागाच्या कपडय़ांवर डिझाइन्समध्ये वैविध्य असेल तर खप जास्त होतो, असे जैन यांनी सांगितले. या आर्ट एक्स्पोमध्ये खास आकर्षण ठरले ते अकोला, चित्तोढगडच्या मनीष कुमार यांचे हातमागावरचे कलेक्शन. ते फक्त इंडिगो या रंगात ब्लॉक प्रिंट्सह डिझाइन करतात. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, दाबूपासून आम्ही ब्लॉक प्रिंट करतो. दाबू हे माती, रंग आणि चुना यांचे मिश्रण असते. कॉटनचे कापड आम्ही या मिश्रणात भिजवतो आणि त्यातून कापडावर जिथे पांढरा रंग उमटतो ते दाबू असते आणि त्यावर आम्ही ब्लॉक प्रिंट करतो. त्यामुळे फेटिया, चंदेरी-बुना, डांबर प्रिंट असे विविध प्रकार कॉटनवर करता येतात, असे ते म्हणाले.

ज्वेलरीमध्येही मीनाकारी, कॉपर, गोल्ड, मेटल, सिल्व्हर आणि हॅण्डक्राफ्टेड ज्वेलरी ट्रेण्ड इन आहे. मीनाकारी दीर्घकाळ कॉपर, मेटल, सोनं यांवर चिकटून राहते ते निघत नाही कारण ते गरम भट्टीवर भाजलं जातं. त्यामुळे त्याचे नेकलेस, चेन, ब्रेसलेट, पेण्डण्ट, इयरिंग असे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत, अशी माहिती ‘डि-सुनार ज्वेल्स’च्या नियती गांधी यांनी दिली.

पारंपरिक पद्धतीने बनवलेले कापड, त्याचे विणकाम, त्याच्यावरचे नक्षीकाम जपतानाच ते नव्या पद्धतीच्या फॅ शनमध्ये उपलब्ध करून देत हातमागावरच्या कपडय़ांना आधुनिक फॅ शनचा चेहरा देण्याचा हा प्रयत्न देशभरात सगळीकडेच जोर धरताना दिसतो आहे.

अजूनही हातमाग रॅम्पवर आला तर त्याला फॅशनच्या परिघात महत्त्व आहे. त्यामुळे तरुणाई हातमागावरच्या कपडय़ांकडे निश्चितपणे वळणार मात्र त्यांच्या फॅ शनच्या संकल्पना अजूनही साचेबद्ध आहेत.लग्नासाठी अजूनही सिल्कला महत्त्व आहे मग लिनेन लग्नात घातलं तर लोक काय म्हणतील, हा विचार डोकं वर काढतो. म्हणूनच हातमागावरचे कपडे वापरून आपापली स्टाइल स्टेटमेंट कशी करता येईल, यासाठी आर्ट एक्स्पोच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि दुसरीकडे हातमाग विणकर, डिझायनर्स आणि विक्रेते यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परदेशात आज ऑरगॅनिक आणि सिंथेटिक फॅब्रिकला जोरात मागणी आहे. मात्र इथे सर्वसामान्यपणे हातमागावरच्या कपडय़ांना पहिली पसंती मिळत नाही. त्यासाठी मुळात या कपडय़ांबद्दल आणि त्यातून केल्या जाणाऱ्या फॅ शनबद्दल जागरूक करणं गरजेचं आहे.

– उज्ज्वल सामंत, संचालिका, आर्ट एक्स्पो.

viva@expressindia.com