सायली सोमण

जगातील कुठल्याही भागातील स्त्रिया असो, प्रत्येक स्त्रीला सौंदर्याची किंवा नटण्या-मुरडण्याची आवड ही असतेच. काही मोजक्याच स्त्रिया या आवडीला अपवाद ठरतात. बऱ्याचदा असं होतं की सुंदर दिसण्यासाठी आपण बायका  वाट्टेल ते करतो. मग ते कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजच्या बाबतीतच नाही तर इतर मेकअप आणि हेअरस्टायलिंगच्या बाबतीतसुद्धा हेच घडतं. असं म्हणतात सौंदर्यप्राप्ती हे एक शारीरिकदृष्टय़ा दुखापतीचे आणि कष्टाचे काम तर आहेच शिवाय वेळ आणि पैशाच्या बाबतीत तितकेच खर्चीक आहे. उदाहरणार्थ वॅक्सिंग किंवा आयब्रो थ्रेडिंग असो यासारख्या प्रक्रिया त्रासदायक आहेत. पण आपण जर पूर्वीच्या काही फॅशन आणि ब्युटी ट्रेंड्सवर एक नजर टाकली तर या सध्याच्या प्रक्रिया आणि ट्रेंड्स आपल्याला खूप सुटसुटीत वाटतील. या पूर्व काळातीळ काही प्रथा फक्त त्रासदायक नसून आपल्या शरीरासाठी आणि तब्येतीसाठी तेवढय़ाच हानीकारक होत्या. तर आता तयार राहा अशाच काही ‘डेडलिएस्ट फॅशन अ‍ॅण्ड ब्यूटी ट्रेंड्स’बद्दल जाणून घ्यायला..

कॉर्सेट

हे गारमेंट जवळपास तेराव्या शतकापासून एक इनर गारमेंट म्हणून बायका आणि काही पुरुष घालायचे. हे गारमेंट घातल्यावर लोक खासकरून बायका कमरेतून बारीक दिसतील, अशा पद्धतीची या कॉर्सेटची रचना होती. पण हे इनरवेअर सातत्याने घातल्यावर त्या काळातील बायका खूपदा चक्कर येऊन पडायच्या, तर याच्या जोडीला पचनाचा त्रास, कॉन्टिपेशन, पाठीतील मणक्याचे दुखणे, बरगडय़ांचे दुखणे, हिस्टेरिया अशा अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले आणि हे सर्व शरीरासाठी तितकेच धोकादायक होते. कालांतराने या इनर गारमेंटचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर त्याचा वापर थांबवण्यात आला.

रिब रिमूव्हल

असे मानले जाते की व्हिक्टोरियन काळात बायकांमध्ये अतिशय सेक्सी आर ग्लास/ वास्प कंबरेचे खूप आकर्षण होते. या काळातील काही लेख आणि पुस्तकांमध्ये असा पुसटसा उल्लेख आहे की अशी कंबर प्राप्त व्हावी या इच्छेमुळे त्यांनी त्या काळात स्वत:च्या फ्लोटिंग रिब्स- बरगडय़ा काढून घेतल्या होत्या. म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी त्या काळापासून लोकप्रिय होती आणि लोक तेव्हाही सुंदर किंवा आकर्षक दिसण्याच्या नादात स्वत:च्या आरोग्याचा अजिबात विचार न करता या घातक प्रक्रियांच्या कसे भरीस पडत होते, हे सहज लक्षात येते.

करायनोलिन

आर. सी. मिलेटने १८५६ मध्ये शोध लावलेला या पद्धतीचा गाऊन हा फॅशन क्षेत्रात एक अतिशय जीवघेणा आणि जोखमीचा शोध मानला जातो. या गारमेंटमध्ये प्रथम धातूची एक पिंजऱ्यासारखी रचना तयार केली जाते आणि त्यावर खूप बारकाईने ड्रेपिंग पद्धती किंवा स्कॅलोप पॅटर्न्‍स वापरून एक सुंदरसा गाऊन तयार केला जायचा. या गाऊ नमधील अनेक गैरसोयींपैकी पहिली म्हणजे याची मुळातच भव्य रचना. ज्यामुळे कुठेही जाताना किंवा ऊठबस करताना बायकांची गैरसोय व्हायची, शिवाय अपघाताचे प्रमाणही सर्वात जास्त होते. हा गाऊन घातलेल्या जवळ जवळ तीन हजार बायका व्हिक्टोरियन काळात दगावल्याची नोंद ऐतिहासिक पुस्तकं आणि लेखांमध्ये आहे. हा गाऊन ज्वालाग्राही कपडय़ांपासून बनवलेला होता. त्यामुळे अनेक बायका अपघातांमध्ये दगावल्याचे संदर्भही इतिहासात आहेत. शिवाय या गाऊनच्या आतला धातूच्या पिंजऱ्यासारखी रचना असलेला पेटीकोट एखाद्या नाजूक बाईच्या कमरेला बांधणे हे तिच्या शरीरासाठी तितकेच दुखापतीचे आणि त्रासदायक काम होते. वादळातही या धातूच्या पेटीकोटमुळे हानीकारक इजा होऊन खूप बायकांनी आपले प्राण गमावले. एकंदरीत हा फॅशन ट्रेंडमधला शोध रोजच्या वापरातले फॅशन म्हणून नव्हे तर एक शोभेची आणि जोखमीची फॅशन म्हणूनच आजही ओळखली जाते.

चॉपाईन

आपल्यापैकी अनेक जणांचा आजही असा समज आहे की, ‘हाय हिल्स’वाल्या चपला या १९व्या किंवा २०व्या शतकातील शोध आहे. पण आपल्या मूळ उंचीपेक्षा काही इंचांनी अजून उंच दिसण्याची हौस अगदी पंधराव्या शतकापासून पाहायला मिळते आहे. १५, १६ व १७व्या शतकात ‘चॉपाईन’ या नावाने प्रसिद्ध असलेले हिलचे पायताण हा हिलवाल्या चपलांचा अतिशय प्राचीन आणि सामान्य प्रकार म्हणून ओळखला जायचा. याची उंची २ ते २० इंचांपर्यंत बनली जायची. जितकी जास्त उंची तितकाच चालताना तोल सांभाळणे कठीण होते. हे करता करता कितीतरी जणांना पडून मोठी इजा झाल्या किंवा काही लोकांनी आपले प्राणही गमावले.

फुट बाइंडिंग

पूर्वकालीन चीनमध्ये ही एक अत्यंत विकृत अशी प्रक्रिया प्रत्येक जवळ जवळ स्त्रीच्या पायावर केली जायची. या प्रक्रियेचे मूळ म्हणजे एम्परर ली यू हा त्याच्या दरबारातील एक नृत्यांगना याओ नियांगच्या कमळासारख्या पायांकडे बघून प्रेरित झाला होता. त्याच्या दरबारात वरील एका दृश्यात दाखवल्याप्रमाणे ती आपले पाऊल आणि पायाची बोटे अशाप्रकारे वाळवून बांधायची आणि मग एक सुंदर बॅले नृत्य सादर करायची. या आकाराच्या पायाला ‘लोटस फीट’ असे नाव दिले गेले. दृश्यात दाखवल्याप्रमाणे एक वाचक म्हणून आपल्याला हा अंदाज येतच असेल की ही प्रक्रिया किती वेदनाशील होती, इतकी अघोरी की वय वर्ष ४ ते वय वर्ष ९ इतक्या लहान वयोगटातील मुलींची पायाची हाडे कोवळी असतानाच त्याला ओढूनताणून कमळासारखा आकार दिला जायचा. त्याच्यामुळे चीनमधील जवळपास सगळ्याच बायकांना खूप कमी वयात हे एक अपंगत्व तर यायचंच, पण पुढे जसं वय वाढायचं तसं इतरही गंभीर शारीरिक त्रास सुरू व्हायचे.

नेक एक्स्टेंन्शन

बर्मामधील बायकांमध्ये कायम लांब मान असणे हे सौंदर्य आणि आकर्षित व्यक्तिमत्त्व असल्याचे लक्षण मानले जाते. हा बदल आपल्या दिसण्यात घडवून आणण्यासाठी इकडच्या बायकांमध्ये अगदी लहान म्हणजे दोन वर्षांच्या असल्यापासूनच त्यांना मानेत रिंग्स घातल्या जायच्या. ज्याने त्यांच्या मानेच्या स्नायूंवर ताण येऊन त्यांच्या मानेचे वेगळ्या आकारात रूपांतर होते. ही अघोरी फॅशन मानेला जबर धक्का बसवणारी होती. म्हणूनच या बायकांना स्पाँडिलायटिससारखे आजार लहान वयात सुरू होतात. शिवाय या प्रकारच्या नेक अ‍ॅक्सेसरीज खूप महागही असतात. कालांतराने आता या प्रकारचा पेहराव फक्त व्यावसायिक आणि पर्यटनाच्या उद्देशाने वापरला जातो. बर्मामध्ये जेव्हा परदेशी पर्यटक फिरायला येतात तेव्हा या जिराफ मानेच्या बायकांबरोबर हमखास छायाचित्रे काढली जातात.

टीथ ब्लॅकनिंग

इसवी सन २०० मध्ये दक्षिण पूर्व चायना, जपान, पॅसिफिक आयलंड्स, दक्षिण पूर्व आशियामध्ये काळे दात असणे हे एक आरोग्य, सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जायचे. या विकृत आणि कुरूप प्रथेला ‘ओहागुरो’ असे नाव पडले होते. यासाठी बायकांना काळ्या रंगाचे लोखंडी डाय आणि दालचिनीयुक्त एक पेय पाजले जायचे. या पेयाच्या अतिसेवनामुळे बायकांच्या तब्येतीवर दुष्परिणाम होऊ  लागला. त्यामुळे शेवटी ५ फेब्रुवारी १८७०ला जपान प्रशासनाने या प्रथेवर पूर्णपणे बंदी आणली.

अशा अनेक फॅशनच्या प्रक्रिया किंवाप्रथा त्या काळी होत्या. ज्या चुकीच्या तर होत्याच आणि तरीही त्याचा वापर करताना ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? सोयीचे आहे का? याचा विचार न करता केवळ एक प्रथा म्हणून आंधळेपणाने स्वीकारल्या जायच्या. काळ जसा पुढे पुढे सरकत गेला तशा लोकांच्या या काही चुकीच्या समजुती पण दूर होऊ  लागल्या. जगात कुठल्याही क्षेत्रात बदल हे घडतच असतात, पण सर्व बाजूंनी विचार करून नवनवीन बदल घडवून आणणे हे महत्त्वाचे आहे.

viva@expressindia.com