12 December 2017

News Flash

चवीची ‘हिंदुजा’ खाऊगल्ली

‘एस.पी.टँक पिझ्झा’ व ‘सी.पी.टँक पास्ता’ हे दोन्ही तसे विचित्र नावांचे स्टॉल सर्वाच्या आवडीचे आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: October 6, 2017 4:35 AM

सी. पी. टँक पास्ता किंवा स्टार रोल किंवा मंगोलियन मॅगी अशी विचित्र नावं एकाच परिसरात एकवटलेली ऐकली आहेत. हिंदुजामहाविद्यालयाजवळ असणारी ही खाऊगल्ली म्हणजे खवय्यांसाठीची मोठी पर्वणी. इथे ही विचित्र नावांच्या स्टॉल्सची गर्दी असली तरी त्यांच्याकडचे तितक्याच हटके नावांचे अफलातून खाद्यपदार्थ खिलवून ही मंडळी खऱ्या अर्थाने तरुणाईची भूक भागवतात (की चाळवतात..)

चर्नी रोडचं नातं हे गिरगावातील अस्सल खवय्यांइतकंच तिथल्या प्रत्येक खाऊ गल्लीशी आहे, त्यातली सर्वात प्रसिद्ध म्हणजे हिंदुजा कॉलेजजवळची खाऊ गल्ली. गिरगावातलीच नव्हे तर दादर, माहीम व पाल्र्याकडच्या कॉलेजेसची मंडळीही इथे येतात. इथल्या खाऊ गल्लीत शिरल्याशिवाय हिंदुजावाल्यांचा दिवस संपतच नाही हे खरंय. त्यामुळे इथे नक्की काय असं आहे जे खाल्ल्यावर मनही तृप्त झाल्यासारखं वाटतं हे तिथेच डोकावून पाहायला हवं.. खासकरून इथे मुंबई चाट व हल्लीच्या तरुणांच्या आवडीच्या मेक्सिकन पदार्थाची रेलचेल जास्त आहे. त्यातून चवदार, वेगवेगळ्या पद्धतीच्या सॉस व मसाल्यांमुळे इथले पदार्थ चाखण्यासाठी खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस जास्तच वाढतेय.

इथे तीस वर्षांपासून असणाऱ्या शर्मा पाणीपुरीवाल्याकडे कॉलेजचे विद्यार्थी हे असतातच, परंतु दुरून येणारी मंडळीही आवर्जून पहिली भेट इथे देतात. इथे मुंबई चाट लाजवाब मिळतो. रगडा, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी म्हणू नका सगळ्यांसाठी शर्मा हजर असतो. त्याच्याच बाजूला ‘बंगलोज्’ म्हणून खास देसी चाटसाठी प्रसिद्ध असणारं छोटं हॉटेल आहे. पारंपरिक देसी चव चाटच्या स्वरूपात चाखायची असेल तर समोर डिश हजर राहिली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. हिंदुजाच्या अलीकडेच सुपर फ्रँकी रोल म्हणून जो इसम असतो त्याच्याकडे वेफर फ्रँकी हा नवा पदार्थ तुम्हाला खायला मिळेल. प्रत्येक व्हरायटीची फ्रँकी त्याच्याकडे मिळते. त्याचबरोबर ‘स्टार रोल फ्रँकी’ हाही हिंदुजांच्या आवडीचा स्टॉल. इथल्या फ्रँकीवर तर सगळे तुटून पडतात. सगळ्यांना परवडणाऱ्या दरात अगदी २० रुपयांपासून इथे फ्रँकी मिळते. अगदी खातखात कॉलेज गाठण्यासाठी ते पार्टी करण्यासाठीही इथे अफलातून गर्दी असते. त्याच्याकडची चायनीज, शेजवान फ्रँकी खाल्ल्याशिवाय मजा येत नाही.

‘एस.पी.टँक पिझ्झा’ व ‘सी.पी.टँक पास्ता’ हे दोन्ही तसे विचित्र नावांचे स्टॉल सर्वाच्या आवडीचे आहेत. एस.पी. टँककडे २० रुपयांत चवदार, मऊ  पिझ्झा मिळतो. खोटं वाटत असेल तर स्वत: येऊन खाऊन बघा. सी.पी. टँककडे मिळणारा पास्ता म्हणजे अमेरिकन स्टाइलची नवी पर्वणीच. त्याच्याकडचा सर्वात फेमस पास्ता म्हणजे ऑरेंज पास्ता. चीजची अशी काही लकब की त्या स्वादातच आपण विरघळून जाऊ . मंगोलियन व इटालियन पास्ता हे अगदीच नवीन प्रकार पण इथे जास्त खपणारे आहेत. इथल्या पास्ताची सर्वात वेगळी व्हरायटी म्हणजे पेने पास्ता. तसेच त्याच्याकडे खिचिया व मंगोलियन मॅगी हे दोन्ही पदार्थही मस्त, नवीन चव देणारे आहेत. लस्सी, ताक व मिल्कशेकसारख्या पदार्थाचे स्टॉल्सही इथे अगदी लागून आहेत. ‘जय महाराष्ट्र स्टॉल’कडे लस्सी व छाँस गरजेपेक्षाही जास्त अफलातून मिळतात. त्याचबरोबर ‘अरुण मिल्कशेक’ हा त्याच्या चॉकलेट मिल्कशेकसाठी जास्त प्रसिद्ध आहे. थंड व अगदी गोड असं चॉकलेट चिप्सने सव्‍‌र्ह केलेलं हे मिल्कशेक भुरळ पाडणारं आहे.

हिंदुजाच्या कॉर्नरला असणारा ‘राजू सॅण्डविच’ हा ८०च्या दशकापासून इथे उभा आहे. त्यामुळे त्याच्याकडचे विविध प्रकारचे टोस्ट, चीज सॅण्डविच न खाता जाणं म्हणजे काही तरी मागे राहिल्यासारखंच आहे. त्याचबरोबर स्टार रोल हा फक्त फ्रँकीच नाही तर नवनवीन रोल्स् आपल्याला खायला घालतो. इथे सगळ्यात प्रसिद्ध असणारा समोसा रोल किंवा नूडल्स चीज रोल म्हणजे अगदीच हटके आहेत. त्याचबरोबर फक्त उन्हाळ्यातच नाही तर १२ महिने नारळाचं पाणी देणारा इसमही इथे २४ तास बसलेला असतो. शेवटी कॉलेज कट्टा थोडक्यात विसरून इकडेच खवय्ये त्यांच्या रोजच्या आवडत्या खाऊ गल्लीला भेट देतात व मनसोक्त खादाडी करतात. त्यांच्या खादाडीचं मूळ हे इथल्या खाऊगल्लीतील चविष्ट पदार्थामध्ये दडलेलं आहे. खवय्यांना बांधून घेणारी ही चव नक्की अनुभवायला हवी.

viva@expressindia.com

First Published on October 6, 2017 12:31 am

Web Title: hinduja college khau galli charni road street food pasta star roll frankie