28 September 2020

News Flash

ब्रॅण्डनामा : बाटा

२४ ऑगस्ट १८९४ मध्ये कंपनीची स्थापना झाली.

नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

काही उत्पादनं क्लासेससाठी असतात तर काही मासेससाठी. उत्पादनाचं नाव उच्चारताच हे आपल्या आवाक्यातलं आहे असं जेव्हा ग्राहकाला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या उत्पादनाला लोकाश्रय मिळाला असं म्हणता येतं. ‘बाटा’ हे नावही अशीच मान्यता मिळवून पसंतीस उतरलं आहे. फुटवेअरच्या दुनियेत बाटा हे नाव विश्वासाचं, जिव्हाळ्याचं ठरतं.

चेक रिपब्लिकमधील थॉमस बाटा या तरुणाने आपला भाऊ  अ‍ॅँटोनीन आणि बहीण अ‍ॅना यांच्यासह T and A. Bata शूज कंपनी सुरू केली. आईकडून ३२० डॉलर्सची मदत त्याने घेतली होती. आठ पिढय़ांच्या ३०० वर्षांचा चर्मकारीचा अनुभव थॉमसच्या पाठीशी होता. २४ ऑगस्ट १८९४ मध्ये कंपनीची स्थापना झाली. पण इतर अनेक कंपन्यांपेक्षा या कंपनीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी पूर्णवेळ काम करणारे पगारी १० चर्मकार या कंपनीत नियुक्त केले. जे त्या काळात अनोखे होते. कंपनी सुरू झाल्यावर अगदी लगेचच थॉमस यांच्यासमोर काही आर्थिक अडचणी उद्भवल्या. चामडय़ाची खरेदी परवडणारी नसल्याने या अडचणींवर उपाय म्हणून स्वस्तातले कॅनव्हास मटेरियल वापरायचे त्यांनी ठरवले आणि चक्क ही कल्पना यशस्वी ठरली. लोकांना हे कॅनव्हास शूज आवडले. आर्थिक विवंचनेतील तडजोड म्हणून केलेला उपाय यशस्वी झाला आणि कंपनीतली कामगारांची संख्या १० वरून ५०० वर गेली.

त्याचदरम्यान थॉमस यांच्या कानावर अमेरिकेतील एका मशिनची ख्याती पोहोचली. या मशिनमुळे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणं शक्य होणार होते. थॉमस यांनी हे मशीन आणलं. पहिलं मशिनमेड उत्पादन होतं Batovka. लेदर आणि टेक्सटाइल शूज काम करणाऱ्या मंडळींसाठी हे उत्पादन होतं. पण वजनाने हलके, स्टायलिश आणि परवडणारे. १९०५ पर्यंत कंपनी दिवसाला २२०० जोड बनवून युरोपातली अग्रगण्य फुटवेअर कंपनी बनली. पहिल्या महायुद्धादरम्यान सैन्याची बुटांची गरज बाटा कंपनीने भागवली. मात्र महायुद्धानंतरच्या आर्थिक मंदीने कंपनीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. किंमती अध्र्याने खाली उतरल्या. या वेळी कंपनीला कामगारांनी साथ दिली. ४० टक्के पगारकपातीसह काम करायचं कामगारांनी ठरवलं. हा विश्वास कामगारांनी दाखवला कारण थॉमस यांनीदेखील सर्व कर्मचाऱ्यांना या बदल्यात अन्न, कपडे अध्र्या किमतीत द्यायचे वचन दिले. महायुद्धाच्या वणव्यात अनेक कंपन्या होरपळून निघाल्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे बाटाचे उत्पादन चालू राहिले. कर्मचाऱ्यांबद्दल कंपनीने नेहमीच काळजीचे धोरण दर्शवले. चेक रिपब्लिकमधल्या अनेक हेक्टरवर पसरलेल्या बाटाव्हिलेमध्ये कर्मचाऱ्यांची उत्तम सोय करण्यात आली. घरे, हॉस्पिटल, वाचनालय अशा सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या.

१९३२ मध्ये थॉमस बाटा यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा काळही कंपनीसाठी कठीण होता, पण त्या साऱ्या दिव्यातून कंपनी बाहेर आली.

थॉमस यांनी त्यांच्या हयातीतच ऑड नंबर प्राइसिंगची कल्पना राबवली होती. ही किंमत किंवा दर ठरवण्याची त्यांची अनोखी युक्ती बाटाच्या यशातला महत्त्वाचा पैलू आहे. बाटाची सर्व उत्पादनं पूर्ण किमतीत कधीच नसतात. ४९९ रु., ९९९ रु. अशी त्यांची ऑड फिगर कुतूहलाची आणि मुख्य म्हणजे ग्राहकांच्या मानसिकतेला सकारात्मकतेने बदलण्याची गुरुकिल्ली आहे. ४९९ रुपये किंमत म्हणजे ५०० ला एक कमी असला तरी चारशे शब्दांच्या उच्चारामुळे ग्राहकाला ती रक्कम पाचशेपेक्षा चारशेच्या अधिक जवळची वाटते आणि तो खरेदी करतो. पण फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास, बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे. आज ७० देशांत बाटाची ५२०० रिटेल शॉप्स आहेत. दर वर्षी ६० करोड पादत्राणांचं उत्पादन ही कंपनी करते. सर्व वयोगटांतल्या गरजा ती पूर्ण करते. पुरुषांसाठी अ‍ॅम्बेसेडर क्लासिक कलेक्शन, स्त्रियांसाठी मेरी क्लेअर, मुलांसाठी बेबी बबल्स व टफी, वाळवंटी प्रवासासाठी सफारी, स्पोर्ट्ससाठी स्पायकर्स ही व अशी अनेक कलेक्शन्स लोकांना भावली आहेत. भारतात तर पावसाळी चप्पल आणि बाटा यांचे अनोखे नाते आहे. आपल्या बालपणापासून ही कंपनी आपल्याला ताब्यात घेते. टफी हे मुलांसाठीचे शूज कंपनीने खासकरून साऊथ आफ्रिकेतल्या दूरवर चालत जाऊन शाळा गाठणाऱ्या मुलांसाठी बनवले होते, पण ते जगभरात इतके पसंतीस पडले की शाळेचे बूट म्हणून अगदी हमखास काळ्या स्कूल शूजना पसंती मिळाली. तेच बाटाच्या निळ्या पांढऱ्या कॅनव्हास शूजचे. कसेही कितीही वापरा! आपल्या दिमतीला सदैव तत्पर!

I love my shoes ही बाटाची टॅगलाइन या साऱ्या वैशिष्टय़ांमुळे अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. पूर्वीचा बाटा या अक्षरांचा काळा लोगो आता लाल झाला आहे. पण दूरवरूनही बाटाचे शोरूम आपण ओळखतो. काही देशांमध्ये बाटा म्हणजे शूज असे समीकरणच आहे, कारण काही गरीब देशांतील स्थानिकांना अन्य उत्पादनच माहीत नाही.

एखाद्या ब्रॅण्डला लोकप्रियता मिळण्याची कारणं अनेक असतात. काही वेळा निव्वळ नफा काही वेळा प्रतिष्ठेचा टॅग त्या उत्पादनाला मोठं करतो. पण दर्जा, विश्वास, किंमत या तिन्ही कसोटय़ांवर बाटा पुरेपूर उतरते आणि म्हणूनच लोकप्रिय ठरते. ही लोकप्रियता १२७ वर्षे कायम आहे हे विशेष. पाडगावकरांच्या शब्दातलं ‘एकटय़ाने एकटेच गर्दीत’ चालणं असो वा कवी अनिलांच्या शब्दातलं ‘वाटेवर काटे वेचित’ चालणं असो, चालत्या, धावत्या, थकलेल्या, चिमुकल्या सगळ्या पावलांना ‘बाटा’सोबत मात्र नेहमीच म्हणावसं वाटतं ‘आय लव्ह माय शूज.’

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:31 am

Web Title: history of brand bata
Next Stories
1 Watchलेले काही : मैफलीतला दु:खोत्सव!
2 व्हायरलची साथ : बाहुबली चिंतनसैर
3 ‘ताण’लेल्या गोष्टी : कल्चर शॉक
Just Now!
X