News Flash

ब्रॅण्डनामा : डॉमिनोज

डॉमिनोज हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा दुसरा सर्वात मोठा पिझ्झा ब्रॅण्ड.

 

नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी सांगणारं सदर..

काही वेळा नाइलाजाने एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते, पण या नाइलाजातूनच भरघोस यश मिळून जातं. एखादा ब्रॅण्ड नाइलाजाने आपलं जुनं नाव बदलतो; पण जुन्या नावापेक्षा नव्या नावानेच त्याला ओळख मिळून जाते. अशीच गोष्ट डॉमिनोजच्या बाबतीतही घडली त्याची ही कहाणी.

डॉमिनोज हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा दुसरा सर्वात मोठा पिझ्झा ब्रॅण्ड. पिझ्झेरियात जाऊन पिझ्झा खाणारे आणि घरच्या घरी पिझ्झा मागवून सगळ्यांसोबत एन्जॉय करणारे असे दोन वर्ग मानले तर दुसऱ्या वर्गासाठी डॉमिनोज ही ट्रीट आहे. या चवदार प्रवासाची सुरुवात १९६० मध्ये झाली. गंमत म्हणजे इथेही दोन भाऊच आहेत. टॉम मोनॅगन आणि जेम्स मोनॅगन. या दोन भावांना व्यवसायात उतरावंसं वाटलं. त्यातही खवय्येगिरी आणि अमेरिकन मंडळींमध्ये वाढती पिझ्झाक्रेझ लक्षात घेऊन त्यांनी एक पिझ्झेरिया चालवायला घेतला. ऊ्रे-ल्ल्र७ डोमिनिक्स या नावाने चालवायला घेतलेलं हे पिझ्झा शॉप अगदी थोडय़ा कालावधीत अमेरिकेतील मिशिगनसिटीत लोकप्रिय झालं. फक्त १०० डॉलर्सला विकत घेतलेलं हे दुकान भविष्यातील एवढय़ा मोठय़ा साम्राज्याचा पाया असेल याचा विचारही दोघा बंधूंनी केला नसेल. कुठलाही व्यवसाय घ्या, सुरुवातीला उत्साहाने एकत्र येणारे भागीदार शेवटपर्यंत टिकून राहिलेत असं दृश्य फार मोजक्या ब्रॅण्डच्या बाबतीत दिसून येतं. टॉम आणि जेम्सपकी जेम्सला कार विकत घ्यायची प्रबळ इच्छा होती. त्या महागडय़ा कारसाठी त्याने आपले डॉमिनिक्समधले हक्क टॉमला विकले आणि तो व्यवसायातून बाहेर पडला. टॉम या पिझ्झेरियाचा एकल मालक झाला. नशिबाच्या पाऊलखुणा आपल्याला ओळखता येत नाहीत हे खरंच दुर्दैव! अन्यथा भविष्यात वटवृक्षाप्रमाणे विस्तारल्या गेलेल्या व्यवसायातून एका कारखरेदीसाठी बाहेर पडण्याची बुद्धी जेम्सला झाली नसती. टॉम त्याच्या मेहनतीने पिझ्झेरिया कुशलपणे हाताळत होता आणि थोडय़ाच काळात एका दुकानाची तीन दुकाने झाली. मात्र मूळ मालकाने डॉमिनिक्स हे नाव अन्य दुकानांना वापरण्यास मनाई केली आणि इथे एक नवं वळण नाइलाजाने टॉमला घ्यावं लागलं. डॉमिनिक्स हे नाव बदलताना पुन्हा नव्या नावासह लोक स्वीकारतील का? ही धाकधूक त्याच्या मनात असावी आणि त्यामुळे जुन्या नावाच्या जवळ जाणारं पण तांत्रिकदृष्टय़ा वेगळं ठरेल असं नाव त्याने स्वीकारलं. तेच हे डॉमिनोज; पण या नामबदलाने उलट टॉमला फायदा करून दिला. काही नावं यशस्वी होण्यासाठीच जन्माला येतात हा दिलासाही दिला. डॉमिनोज पिझ्झाने फार कमी काळात आपल्या खुणा निर्माण केल्या. १९८३ पर्यंत १००० डॉमिनोज पिझ्झा पार्लर्स सर्वदूर पसरली होती. या दुकानांना एका धाग्यात बांधेल अशा लोगोचा विचार टॉमने फार आधी केला. पहिला पिझ्झेरिया हे भावासोबतचं व्यावसायिक पाऊल होतं, मात्र एकाची तीन पिझ्झा पार्लर्सही टॉमसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट होती आणि ती लक्षात ठेवून त्या तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली. कशी गंमत आहे बघा. आज डॉमिनोजने १३२०० दुकानांचा पल्ला गाठला आहे; पण एकाचे तीन होतानाचा अनुभव टॉमसाठी नेहमीच खास राहिला. काही वेळा व्यवसायात मोठय़ा मोठय़ा भराऱ्यांपेक्षा हे छोटे छोटे टप्पेच जास्त जिव्हाळ्याचे असतात याचं हे उत्तम उदाहरण.

डॉमिनोज पिझ्झाचं २०१२ मध्ये केवळ डॉमिनोज असं नामांतर झालं, कारण डॉमिनोज म्हटलं की पिझ्झा हे समीकरण तर जुळलंच होतं, पण पिझ्झ्यासोबत इतर अनेक खाद्यपदार्थही मिळू लागले होते, त्यामुळे पिझ्झा हा शब्द गाळून केवळ डॉमिनोज ठेवण्यात आलं. या इतक्या वर्षांमध्ये सातत्याने काही नावीन्यपूर्ण देण्याचा डॉमिनोजने प्रयत्न केला. २००८ मध्ये त्यांनी पिझ्झा ट्रॅकर आणला, ज्यामुळे आपल्या पिझ्झा डिलिव्हरीची नेमकी स्थिती आपल्याला ट्रॅक करता येऊ लागली. २००९ मध्ये तर डॉमिनोजने आपल्यावर टीका करणाऱ्या ग्राहकांना चित्रित करण्याचं धाडसी पाऊल उचललं. म्हणजे टीका करणारे ग्राहक आणि त्यांची टीका लक्षात घेऊन ताबडतोब आपल्या पिझ्झामध्ये नवे बदल आणणारे शेफ अशी ती मालिका गाजली, कारण आपल्याच ब्रॅण्डवर होणाऱ्या टीकेला जगासमोर आणण्याचं धाडस अनोखं होतं. या वर्षी डॉमिनोजने आपल्या पिझ्झामध्ये आमूलाग्र बदल केले. २०१६ मध्ये डॉमिनोजने ड्रोनच्या मदतीने मानवरहित पिझ्झा डिलिव्हरी न्यूझीलंडमध्ये केली.

कोणत्याही ब्रॅण्डचं सर्वात मोठं यश तेच असतं जेव्हा त्या ब्रॅण्डचं नाव उच्चारताच त्या उत्पादनाखेरीज अन्य कोणतेही उत्पादन डोळ्यांसमोर येत नाही. डॉमिनोज या नावाने ते साध्य केलं आहे. हे नाव अपरिहार्यतेतून टॉमने स्वीकारलं आणि त्याच नावाने इतिहास घडवला. हा इतिहास जिद्दीने, कौशल्याने, हुशारीने, मेहनतीने घडतो. एवढय़ा मोठय़ा फापटपसाऱ्यात स्वत:च्या अस्तित्वाचा िबदू तयार करणं सोपं नसतं. डॉमिनोजच्या तीन ठिपक्यांनी आपलं अस्तित्व केवळ निर्माण केलं नाही तर पसरवलं.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:03 am

Web Title: history of dominos pizza india
Next Stories
1 या स्वप्नांना पंख नवे
2 खाबूगिरी : मारामारी पाव..
3 सवयींचे गुलाम
Just Now!
X