18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

ब्रॅण्डनामा : केएफसी

मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींकरता केएफसी हा ब्रँड म्हणजे खाना खजाना.

रश्मि वारंग | Updated: April 21, 2017 12:34 AM

केएफसी

 

नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

आयुष्यात काही माणसं कोणतंही ध्येय वगैरे निश्चित न करता येईल त्या परिस्थितीला सामोरे जात राहतात. वेगवेगळे पर्याय अनुभवत राहतात. त्यातून थोर कार्य वगैरे त्यांच्या ध्यानीमनीही नसताना घडतं आणि सहज जाताजाता इतिहास रचला जातो. हे इतकं साधं सोपं वाटत असलं तरी त्यामागची त्या व्यक्तीची मेहनत, कौशल्य आणि विचार समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. जगातील दुसरी मोठी फूडचेन असणाऱ्या ‘केएफसी’सारख्या ब्रॅण्डच्या बाबतीत जाणून घेणं यामुळेच रोचक ठरावं.

मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींकरता केएफसी हा ब्रँड म्हणजे खाना खजाना. वास्तविक कोणत्याही मोठय़ा रेस्तराँमध्ये गेल्यावर नॉनव्हेजची खूप मोठी व्हरायटी मेन्यूकार्डातून समोर येते तसे केएफसी बाबतीत नाही. त्यांचे मुख्यकरून चिकन आणि शाकाहारींची अगदीच सोय नाही हा ठपका येऊ  नये म्हणून काही व्हेज पदार्थ नेमके व मोजके आहेत. त्यात फार वैविध्य नाही. तरीही त्या बकेटमधून जे काही आपल्यासमोर येतं ते पोटपूजेचा पुरेपूर आनंद देतं. किंबहुना ठरावीक पदार्थावर अतिशय कुशलतेने लक्ष केंद्रित केल्याने केएफसी म्हणजे चिकनप्रेमींचा खास खाऊअड्डा ठरला आहे.

अशा या केएफसीचे पूर्ण नाव काय? असा प्रश्न खवय्यांना पडत नाही. कारण एकदा पोटभर खाऊन झाल्यावर अन्नब्रह्मानंदी लागलेली टाळी असते. प्रश्न उपस्थित करण्याच्या पलीकडे आपल्याला नेते. तरीही केएफसी म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन. यातील केंटुकी हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध प्रांत. हारलँड सँडर्स हा इंडियाना प्रांतात जन्मलेला एक सामान्य गृहस्थ. महायुद्धादरम्यान आलेल्या महामंदीमुळे पडेल ते काम या गृहस्थाने केले. कधी शेतात मजुरी, कधी कंडक्टर, कधी लोहारकामात मदतनीस, कधी रेलयार्डात फायरमन, विमा विक्रेता अशी मिळतील ती कामं करता करता १९३० मध्ये केंटुकी प्रांतात या गृहस्थाने गॅस स्टेशनजवळ एक छोटंसं उपाहारगृह सुरू केलं. अगदी टपरीवजा या उपाहारगृहात गॅसस्टेशन ऑपरेटर, चीफ कुक आणि गल्लय़ावरचा कॅशियर अशा तिहेरी भूमिकेत सँडर्स काम करत होते.

१९३७ पर्यंत या छोटय़ाशा टपरीचा १४२ खुच्र्याच्या मोटेलपर्यंत आवाका विस्तारला. सँडर्स कोर्ट अँड कॅफे या नावाने हे छोटंसं हॉटेल छान चालू होतं. पण दोन वर्षांनी मोठय़ा आगीत हॉटेलचं नुकसान झालं. न डगमगता सँडर्स यांनी ते पुन्हा नव्याने सुरू केलं. त्यांच्या उपाहारगृहातील चविष्ट पदार्थाची केंटुकीवासीयांच्या जिभेवर चव तरळू लागली. त्यातही फ्राईड चिकन हा त्या उपाहारगृहाचा हातखंडा होता. या खाऊगिरीच्या कामगिरीवर खुूा होऊन केंटुकीच्या गव्हर्नरने सँडर्स यांना कर्नल हा किताब देऊ  केला.

त्यांनतर स्वयंपाकघरात एक मोठी क्रांती प्रेशरकुकरच्या आगमनाने घडली. प्रेशरकुकरच्या वापरामुळे ताजे चिकन अतिशय जलदपणे ग्राहकांना देणे कर्नल सँडर्सना शक्य झाले. त्यामुळे त्याच्या काही डिशेसचा चेहरामोहराच बदलला. १९५२ मध्ये कर्नलनी आपल्या या खास रेसिपीची फ्रँचायजी पीट हरमन याला देऊ  केली. विकल्या जाणाऱ्या प्रत्येक चिकनच्या बदल्यात कर्नलला मिळणारा मोबदला होता एक निकेल (अमेरिकन नाणे). या फ्रँचायजीसह कर्नल सँडर्सच्या खास चिकनचे नामकरण झाले केएफसी. अर्थात केंटुकी फ्राईड चिकन. १९५५ साली केंटुकीत आंतरराज्यीय महामार्ग सुरू झाला आणि केएफसीच्या शाखा या महामार्गाच्या सोबतीने दूरवर विस्तारल्या. प्रवासात भरपेट पेटपूजा चविष्ट पदार्थाच्या जोडीने होऊ  लागली. १९६४ पर्यंत या फ्राईड चिकनच्या हुकमी एक्कय़ासह केएफसी ६०० आउटलेट्सपर्यंत विस्तारले आणि आजतागायत हा विस्तार वर्धिष्णू राहिलेला आहे. जगभरातील १२३ देशांत २०००० ठिकाणांवर केएफसीने आपले मोक्याचे स्थान निर्माण केले आहे. कर्नल सँडर्स यांनी हयातीतच केएफसी काही गुंतवणूकदारांना विकले होते. पण केएफसीच्या प्रत्येक आउटलेटवरचा कर्नल सँडर्सचा चेहरा मात्र कायम राहिला. लाल एप्रनमधले चष्माधारी, दाढीवाले कर्नल सँडर्सकाका पाहताच finger licking good चिकनची चव जिभेवर तरळू लागते.आधीच्या जाहिरातींमधला त्यांचा काहीसा गंभीर चेहरा आता हसरा झाला आहे. केएफसीचा हा लोगो चिकनप्रेमींसाठी चिरपरिचित आहे. त्यातला लाल रंग बोल्डनेस आणि चैतन्य दर्शवतो. finger licking good ही टॅगलाईन अलीकडेच बदलून so goodc करण्यात आली. कारण हाताने मनसोक्त चिकन खाणऱ्यांसाठी आता काही बेव्हरेजेससुद्धा केएफसीत मिळतात. त्यांचा विचार या बदलत्या टॅगलाईनमध्ये झाला आहे.

कर्नल सँडर्स यांना महामंदीच्या काळात कधी वाटलं तरी असेल का? आपला छोटासा फ्राईड चिकन उद्योग जो सहज गरजेतून निर्माण झाला होता तो इतका मोठा विस्तारेल? बी पेरताना तो वृक्ष विस्तारणार किती? त्याला फळं धरणार कधी? याची मोजमापं आजही देता येत नाहीत. त्या बीला छान प्रकाश, पाणी मिळत राहील याची काळजी घेणं आपल्या हातात असतं. तेवढं करत रहावं. कर्नल सँडर्स यांनी तेच केलं. म्हणूनच तर केएफसीतल्या बकेटमध्ये डोकावणारे चिकन पॉपकॉर्न, स्ट्रिप्स, विंग्स यांचा फडशा उडवणारे आपण पुन: पुन: म्हणत राहतो so good… soooooo gooood.

viva@expressindia.com

First Published on April 21, 2017 12:34 am

Web Title: history of kfc brand