नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

ऐंशीच्या दशकात टीव्हीसमोर बसलेली मंडळी एक जाहिरात विसरूच शकत नाही. दमून घरी आलेल्या बाबांना आई, चहा, कॉफी विचारते. बाबा नाही म्हणायच्या आधीच चिमुरडय़ा लेकीला माहीत आहे बाबा नाही म्हणणार. मग आई ट्रेमधून घेऊन येते गारेगार पेय. तो मोठा काचेचा ग्लास, त्यातला केशरी रंगात न्हाऊन निघालेला थंडगार अनुभव, ते पेय न पिताच आपण टीव्ही समोर अनुभवायचो.. आणि कानावर ते चिरपरिचित वाक्य – आय लव्ह यू रसना! पावडर ड्रिंक्सच्या वर्गातलं चिरपरिचित नाव रसना. जागतिकीकरणाच्या वाऱ्यांसोबत पेप्सी, कोला आपल्या आयुष्यात धडकण्याआधी ज्या पेयाने आपलं बालपण गारेगार आणि रंगीत केलं ते पेय रसना !

पिओमा इंडस्ट्रीजच्या पिरुज खंबाटा यांनी ‘जँफ्फे’ या नावाने एक सॉफ्टड्रिंक १९७६ साली निर्माण केलं होतं. तेच १९७९ साली रसना या नावाने पुन्हा नव्याने बाजारात आणलं गेलं. तो काळ लिम्का, गोल्डस्पॉट, थम्सअप अशा काबरेनेटेड ड्रिंक्सचा होता. पण खास मुलांकरता कोणतंही पेय नव्हतं हे लक्षात घेऊन रसना मार्केटमध्ये उतरलं. उत्तम जाहिरात आणि अंगभूत गुण यामुळे रसना प्रसिद्ध व्हायला वेळ लागला नाही. १९८४ साली आलेली रसनाची जाहिरात एका पाकिटात ३२ ग्लास किती सहज बनवता येतात हे सांगणारी होती. रसना हा स्वस्तात मस्त ड्रिंकचा उत्तम पर्याय होता. त्याकाळच्या महाग सॉफ्टड्रिंक्सच्या तुलनेत आपण खिशाला कसे परवडतो हे रसनाने अतिशय छानपणे जाहिरातीतून मांडले. त्यातही आपला टारगेट ग्राहक लहान मुलांना समोर ठेवत पहिले त्याच्या परवडण्याची जाहिरात केली. मग मुलंही हे ड्रिंक स्वत: बनवू शकतात हा त्यातला सहजपणा मांडला गेला आणि त्यानंतर रसनाचे अतिशय आकर्षक रूपातले ११ स्वाद भल्यामोठय़ा काचेच्या ग्लासांतून असे काही समोर आणले गेले की, मुलांसोबत पालकांनाही रसांची गोडी लागली.

रसनाच्या जाहिरातींचा या वाटचालीत मोठा वाटा आहे. रसना गर्ल आपल्या वाढदिवसाचा बेत आखताना आपण वाढदिवसाला कसे मित्र-मैत्रिणींना रसनाच देणार आहोत हे खुबीने सांगायची. टीव्ही हे माध्यमच स्वर्गीय काही आहे असे वाटण्याच्या काळात समस्त लहान मुलांच्या मेंदूत वाढदिवसाला रसना हवेच हे इतके फिट्ट बसले की, त्या काळातली वाढदिवस, बारसे, मुंज, साखरपुडा, सत्यनारायण पूजा.. प्रसंग कोणताही असो तो रसनानेच साजरा व्हायचा. या ब्रॅण्डचं वैशिष्टय़ हे की भारतातल्या छोटय़ामोठय़ा गावात रसना पोहचले असो वा नसो पण कोणत्याही समारंभाला ऑरेंज सरबत बनवल्यावर ब्रॅण्ड कुठलाही स्थानिक असला तरी आपण रसनाच प्यायलो हे पिणाऱ्याला व देणाऱ्याला वाटत होते. यात या ब्रॅण्डच्या यशाचे रहस्य दडले होते. पण माणसाच्या आयुष्याप्रमाणे ब्रॅण्ड्सच्या बाबतीतही ऊनसावलीचा, आशा-निराशेचा खेळ असतो. असेच चढ-उतार रसनानेही पाहिले. ९० च्या दशकात फ्रुट ज्यूस आणि काबरेनेटेड ड्रिंक्सची भलीमोठी लाट आली. ही सॉफ्टड्रिंक्स प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा पाउचमधून स्वस्तात घरी नेता येत होती. त्याचा फटका रसनाच्या लोकप्रियतेला बसला. पावडररूपी ड्रिंक्स आणा ते पाण्यात मिसळा त्यात साखर घाला. छे ! छे ! इतका वेळच नाही. सगळं रेडिमेड तय्यार हवं होतं. त्या इन्स्टंटचा परिणाम रसनावर झाला. २००० मध्ये रसनाने ‘ओरानजोल्ट’ नामक पेय आणलं. मात्र या पेयाला कायमस्वरूपी रेफ्रीजरेटिंग लागे. काही रिटेलर्स रात्री फ्रीज बंद करून ठेवत त्यामुळे या पेयाला साफ अपयश पहावे लागले. २००२ साली आलेल्या रसना उत्सव आणि रसना रोजानाने ग्रामीण भागात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न केला तर  २०१५ मध्ये एनर्जी ड्रिंकच्या रूपात अभिनेता अक्षयकुमारने ही रसनाला आय लव्ह यू म्हटलं.

या सगळ्या चढ-उतारापल्याड पावडर ड्रिंक्सच्या वर्गात आजही रसनाने ८५ टक्के मार्केट आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. लहानपणी भारावलेल्या डोळ्यांनी आय लव्ह यू रसना म्हणणारी पिढी मोठी झाली तसं रसनाने पण मुलांच्या बालिश निरागसतेकडून खोडय़ांकडे आणि खोडय़ांकडून स्मार्टनेसकडे वळण्याचा प्रयत्न केला. लाइफमें थोडा रसना मिलाओ म्हणताना विविध टॅगलाइन विविध टप्प्यांवर आणल्या गेल्या, पण फिरून पुन्हा आय लव्ह यू रसनावरच ही गाडी येऊन थांबली.

आजच्या पिढीला रसनामधला मॅडनेस कदाचित जाणवणार नाही. पण तरी एक पिढी आज अशीही आहे जी समोर आलेल्या ऑरेंज सॉफ्टड्रिंकला मनातून रसना मानूनच पिते. एका पिढीचं बालपण इतकं रंगीत, इतकं गारेगार, इतकं गोड करण्याचं श्रेय तर या ब्रॅण्डला द्यावंच लागेल. कैफी आझमी म्हणतात – ‘मेरा बचपन भी साथ ले आया गाँव से जबभी आ गया कोई’..  रसना नेमकं हेच करते.. एका पिढीचं अख्खं बचपन सोबत घेऊन येते.

viva@expressindia.com