News Flash

ब्रॅण्डनामा : ताज हॉटेल

१६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले.

रश्मि वारंग – viva@expressindia.com

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

काही ब्रॅण्ड स्वप्न असतात. केवळ ब्रॅण्डकर्त्यांचं नाही तर वापरकर्त्यांचंही. अमुक ब्रॅण्ड एकदा तरी वापरता यावा यासाठी काही जण प्रयत्नशील असतात; पण ब्रॅण्डनेम इतकं मोठं, की त्यातले केवळ मोजकेच यशस्वी होतात. भारतीय हॉटेल समूहातील असा स्वप्नवत ब्रॅण्ड म्हणजे ताज. जे कामानिमित्त वा स्वखर्चाने इथे वारंवार, क्वचित किंवा अगदी एकदा जातात त्या सर्वासकट जे कधीच इथे जाऊ शकलेले नाहीत त्या सर्वानाच या ताजचं आकर्षण आहे. या ब्रॅण्डची ही कहाणी.

टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी  इंडियन हॉटेल कंपनीची (आयएचसीएल) स्थापना १८९९ मध्ये केली. त्यादरम्यान भारतात पाश्चिमात्य धर्तीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा त्यांचा मानस होता. यामागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यातील एक अशी की, मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. काहींच्या म्हणण्यानुसार टाटांच्या काही मित्रमंडळींनी मुंबईतील तत्कालीन हॉटेलविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ताजच्या उभारणीचा निश्चय केला. या कहाण्यांपेक्षा लोवाट फ्रेझर या टाटा समूहाशी जवळचे संबंध असणाऱ्या जमशेटजीच्या मित्राचं कथन अधिक पटतं. त्यांच्या मते ही संकल्पना जमशेटजींच्या मनात अनेक वर्ष घोळत होती. त्यावर त्यांनी अभ्यासही केला होता. मालकी हक्क वा उत्पन्नाच्या साधनापेक्षा पर्यटनदृष्टय़ा लोकांनी भारत पाहायला यावं, मुंबईच्या सौंदर्यात भर घालेल अशी आलिशान वास्तू निर्माण व्हावी, हा उद्देश जमशेटजींच्या मनात होता. १६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. स्वत: जमशेटजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन, डुसेलडॉर्फ इथून सामान, फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू आणवल्या. हॉटेल ताज मुंबापुरीचा सरताज ठरलं. तेव्हापासून ताज हॉटेलची साखळी भारतभर पसरत गेली.

भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय बीच रिसॉर्ट गोवा फोर्ट अग्वादा इथं सुरू केलं, ते १९७४ मध्ये ताज हॉटेल समूहानेच. हिप्पी पर्यटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचे परदेशी पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण असे रूपांतर होण्यात या हॉटेल समूहाचा वाटा मोठा आहे. त्यानंतर याच समूहाने अनेक राजवाडे हॉटेलमध्ये रूपांतरित केले. उदयपूर लेक पॅलेस त्यातील पहिला राजवाडा ठरला. भारतीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यतांचा पंचतारांकित साज चढवत ताज हॉटेल समूहाने एकेक शिखर सर केलं.

भारतीय राष्ट्रीय उद्यानातील ताज सफारी असो, ताज विवांता, ताज एक्झॉटिका या साऱ्या हॉटेल्सनी देशीपरदेशी मंडळींना पंचतारांकित अनुभव देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आज या समूहाच्या हॉटेल्सनी शंभरी गाठली आहे. त्यातील ८४ हॉटेल्स भारतभरात सेवा देतात, तर अमेरिका, लंडन, दक्षिण आफ्रिका, मालदीव, नेपाळ अशा विविध १६ देशांत ताज हॉटेलने आपला झेंडा रोवला आहे. २०१० मध्ये ताज हॉटेल कर्मचारी संख्या १३,००० इतकी होती.

२००८ च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबईसोबत सारं जग हादरलं; पण हॉटेल ताजवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता. अतिरेक्यांनी या वास्तूची निवडच भारतीयांच्या गौरवावर घाला घालण्यासाठी केली होती. २०१० मध्ये या हल्ल्याच्या खुणा तशाच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभे राहिले तेव्हा प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक भारतीय भरून पावला. या ब्रॅण्डची गंमत हीच की, त्याचा अनुभव घेणारे फार कमी; पण अनुभव न घेताही या ब्रॅण्डकडे आशेने, कुतूहलाने, अभिमानाने, मीसुद्धा एकदा इथे पोहोचेन या निश्चयाने पाहणारे जास्त. भारतीयांसाठी हा हॉटेल ब्रॅण्ड सोनेरी दुनियेसारखा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2018 12:51 am

Web Title: history of taj hotel brand
Next Stories
1 बॉटम्स अप : फसफसत्या वाइनचं रहस्य
2 ‘कट्टा’उवाच : बच्चन
3 पबजी व्हायरल झालं जी..
Just Now!
X