भारतीय गानरसिकांपैकी निम्म्याहून अधिक हे ‘ओल्ड क्लासिक्स’ किंवा प्रेमभंगाच्या गाण्यांमध्ये रमलेले असतात. म्हणजे मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याचे दु:ख असलेल्या कातर वगैरे मनांना रिझविणारी गाणी तयार करण्यात बॉलीवूडची हयात गेली. कोणत्याही चित्रपटाचे कथानक नायक-नायिकांचे एकमेकांविषयीचे समज-गैरसमज-साक्षात्कार या तीन कसोटय़ांवर चालत. त्यामुळे दोन-चार हॅपी साँग्ज झाली की एक रडके गाणे आणि एकमेकांशिवाय राहण्याची जाहीर गीतसाधना करणाऱ्या नायकाला हॅपी एंडिगच्या वेळी ‘नाकाने कांदे सोलणारा’ ही पदवी कुणी बहाल करत नसे. प्राचीन काळात ‘ओ बेवफा’, ‘तू औरोकी क्यू हो गयी?’, ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा.’, ‘कोई हमदम न रहा’ या गाण्यांनी त्यांच्या लाडक्या श्रोत्यांना दु:खाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची सवय करून दिली. एकोणीसशे साठ-सत्तरीच्या दशकात ‘नोकरी-छोकरी’ अप्राप्य असलेल्या पिढीनेच ‘तुटा दिल’, ‘बिछडा यार’, ‘दिल-खिलौना’, ‘दर्द-ए-दिल’ या शब्दांशिवाय चित्रपटातील गाणे लिहिताच येऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण केली. नव्वदीच्या युगातही डिस्को गाण्यांतून प्रेमदु:ख उतू जात होते.  नव्वदोत्तरीच्या काळातील परदेशात जाऊन भारतीय संस्कार बाळगणारे नायक ‘मैने उसके शहर को छोडा’ म्हणत ‘दिवान्या दिला’ची दास्तान लोकांना किंचाळून सांगत होते किंवा ‘तनहाई’ कशी निर्माण होते, याचा मानसिक अभ्यास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होते. ‘तेरे बीन’ हे दोन शब्द नव्वदीनंतरच्या ‘सॅडसाँग्ज’मध्ये सर्वाधिक वापरले गेले होते. सुफी, शास्त्रीय, चित्रपटीय आणि पॉप अशा सर्वच गानप्रकारांनी या काळात देशातील अगणित (एकल आणि दुतर्फी) प्रेमभंगांवर फुंकर मारण्याचे बहुमोल समाजकार्य केले. आपल्याकडे जशी भावनाप्रधान प्रेमभंगगीते लिहिली जातात, त्याच्या जगभरातील आवृत्त्या ऐकत राहाव्यात अशा आहेत. परीकथेसारख्या हळुवार प्रेमगीतांनी एकाएकी जगातील सर्वाधिक श्रीमंत पॉपस्टार बनलेली टेलर स्विफ्ट हिच्या आयुष्यातील प्रत्येक प्रेमभंग गाण्यातून सादर झाला आहे. या सेलिब्रेटीच्या प्रेमकहाण्या आणि ब्रेकअप्स न्यूजनी गॉसिप्स मॅगझिन्सना जितका मसाला पुरवला तितकाच तिच्या यशाला उभारणाऱ्या गाण्यांचाही रतीब ओतला.

एका बडय़ा प्रेमभंगानंतर ‘आय न्यू यू वेअर ट्रबल’ या गाण्यामध्ये तिने आपल्यातील राग आणि माजी प्रियकराच्या दोषांचा पाढा वाचला आहे. गाण्यातली कथा कितपत तिच्या आयुष्याशी खरी-खोटी हे पडताळून पाहता येणारे नसले, तरी गाण्यातील तिची प्रामाणिक प्रेम करूनही काय मिळाले, ही भूमिका या गाण्याला सुंदर बनविते. ऱ्हिदमपासून ते तिच्या आवाजातील आर्ततेपर्यंत सारेच एक श्रवणीय गीत घडविते. हीच भूमिका तिच्या आधीच्या एका प्रेमभंगानंतरही वेगळ्या अदाकारीत येते. ‘वी आर नेवर एव्हर गेटिंग बॅक  टुगेदर’ या गाण्यातील सारी गंमत वापरलेल्या गिटार कॉर्ड्सवर आहे. सोप्याच परंतु कानांना विलक्षण सुखावणाऱ्या गिटार सुरावळीत तिने ‘अब तेरे बीन जी लेंगे हम’चा स्वर आळवला आहे. गंमत म्हणजे, हे गाणे तिच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड जुलिअट’इतकेच प्रसिद्ध आहे. आयरिश बँड कोर्सची (तीन भगिनी आणि एक बंधू) सारी गाणी प्रेम आणि आयुष्यातील सुंदर घटनांबाबत असतात. असंख्य हिट्स गाण्यांसोबत ‘व्हॉट कॅन आय डू फॉर युवर लव्ह’सारखे त्यांचे विविध व्हर्जनमधले गाणे हळुवारपणाचा उत्तम नमुना आहे. पण याच बॅण्डचे ‘आय नेव्हर लव्हड् यू एनीवे’ हे प्रेमविरोधी गाणे शब्द आणि त्यांच्या वाद्यसुरावटीसाठी खासच ऐकावे असे आहे. बासरी-बॅगपाइप-व्हायोलिन या वाद्यांमधून आयरिश लोकसंगीतात बराच काळ वावरल्यानंतर या बँडची अमेरिकी लोकप्रियतेनंतर भारतात ओळख प्रस्थापित झाली. त्यांची  ब्रेथलेस आणि कित्येक इन्स्ट्रमेण्टल गाणी गेल्या वीस वर्षांत लोकप्रिय झाली आहेत.

अल्बम काढल्यानंतर त्यावर्षीच्या साऱ्या ग्रॅमी पुरस्कारांचे खात्रीशीर दावेदार ठरणाऱ्या अडेल या ब्रिटिश गायिकेची ‘रोलिंग इन द  डीप’, ‘समवन लाइक यू’ ही गाणी सर्वपरिचित आहेत. तिचे राग व्यक्त करणारे ‘टायर्ड’ हे गाणे लोकप्रिय झाले नसले, तरी चालीपासून अदाकारीपर्यंत पहिल्याच फटक्यात प्रेमात पाडणारे आहे. गाणे प्रेमविरोधी असले, तरी कित्येकदा ऐकत राहण्याची इच्छा निर्माण करणारे आहे. ‘बिगिन अगेन’ या चित्रपटातील प्रत्येक गाणे हे त्या चित्रपटाच्या कथेशी एकरूप आहे. (आपल्याकडे जुन्या हिंदी चित्रपटात असायचे तसे) या चित्रपटातील ‘लॉस्ट स्टार्स’ हे सर्वोत्तम गाणे असल्याचे कुणीही कबूल करेल. पण चित्रपटाचा सर्वार्थाने आरंभ करणारे ‘ए स्टेप यू काण्ट टेक बॅक’ आणि ‘लाइक अ फूल’ ही गाणी प्रेमाकडे वास्तवदर्शी चाळणीतून पाहणारी आहेत. अर्थातच प्रेमभंगानंतरची चपखल प्रतिक्रिया आणि दोष, डागण्यांचे हे मिश्रण आहे. एमटीव्हीच्या आरंभीच्या काळात भारतात जी गाणी लागत त्यात यूबी-फोर्टी या ब्रिटिश बॅण्डचे ‘डोण्ट ब्रेक माय हार्ट’ हे गाणे लागायचे. गंमत म्हणजे याच काळात भारतीय सिनेसंगीत पटलावर ‘दिल ना तोडो’ आशयाच्या गाण्यांनी उच्छाद आणला होता. नंतर मग ‘डोण्ट ब्रेक माय हार्ट’ शब्द वापरूनच एक प्रचंड लोकप्रिय हिंदी गाणे तयार झाले.

म्युझिक बॉक्स

Taylor Swift – I Knew You Were Trouble
Taylor Swift – We Are Never Ever Getting Back Together
The Corrs – I Never Loved You Anyway
Keira Knightley – A Step You Can’t Take Back
Keira Knightley – Like A Fool
Adele – Tired
UB40 – Don’t Break My Heart

viva@expressindia.com