पंकज भोसले viva@expressindia.com

गीतांमध्ये काव्य म्हणजे साहित्य असले, तरी साठोत्तरीच्या दशकापासून गाण्याला साहित्याचा दर्जा दिला गेलेला नाही. त्यामुळेच तीनेक वर्षांपूर्वी बॉब डिलन यांना त्यांच्या हयातभरात लिहिल्या गेलेल्या गाण्यांसाठी साहित्याचे नोबेल मिळाले तेव्हा साहित्य वर्तुळातून काहीशी नाराजी उमटली होती. साठोत्तरी, ऐंशीउत्तरी आणि दोन हजारोत्तरी तरुणाईमध्ये वैचारिक भिन्नता जरी असली, तरी त्यांना सर्वाधिक घडविणारी (किंवा बिघडविणारी म्हणा) माध्यमे होती ती रेकॉर्ड प्लेअर, रेडिओ आणि टीव्हीवरचे लोकप्रिय संगीत. केवळ भारतीय उदाहरणांच्या चालीत म्हणायचे झाले तर एक पिढी रफी-मुकेश-किशोर यांच्या आवाजावर पोसली, दुसरी अमित कुमार-शब्बीर- अझीझ यांच्या आवाजाशी जुळवत वाढली आणि तिसरी कुमार सानू-अभिजीत-नारायण या गायकांच्या गाण्यांमधून भावनाशील बनली.

जगभरात आपापल्या काळातील सांगीतिक घुसळणीची नोंद साहित्यिकांनी घेतलेली दिसते. कित्येक गायक आणि गीतकारांनीही साहित्याचा प्रभाव आपल्या गाण्यांमधून मांडला आहे. दिवंगत डेव्हिड बोव्ही या कलाकाराने ‘नाइन्टीन एटीफोर’ या जॉर्ज ऑरवेल यांच्या सार्वकालिक कादंबरीला स्फुरून कित्येक गाणी लिहिली. एडगर अ‍ॅलन पो, लुईस कॅरल, ऑस्कर वाईल्ड, स्टीव्हन किंग आणि बहुतांश अभिजात लेखकांच्या कलाकृतींवर आधारित उत्तम इंग्रजी गाणी ऐकायला मिळतात. पण काही गाणी, काही गायक-संगीतकार आणि संगीत चळवळी यांचा आधार घेऊन लोकप्रिय कादंबऱ्या तयार झाल्या आहेत. त्यातले आज जगभरात गाजत असलेल्या आणि सातत्याने नोबेल पारितोषिकासाठी विचार होणाऱ्या जपानी लेखक हारुकी मुराकामी यांचे नाव पहिले घ्यावे लागेल. या लेखकाच्या बहुतांश साऱ्या लेखनामध्ये अभिजात किंवा लोकप्रिय संगीतात बुडालेल्या व्यक्तिरेखा असतात. त्यांच्या पौगंडाअवस्थेत बिटल्स, बिचबॉय या ब्रिटिश-अमेरिकी बॅण्डचे प्रस्थ होते. ‘नॉर्वेजियन वुड’ या बिटल्स बॅण्डच्या गीताचा प्रभाव त्यांच्या याच नावाच्या जपानी कादंबरीमध्ये जोरकसपणे जाणवतो. नॉर्वेजियन वुड हे १९६५चे गाणे बिटल्सच्या कारकिर्दीतील उत्तम गाण्यांपैकी एक आहे, आणि त्यात भारतीय संदर्भही आहेच. एकीकडे बॉब डिलनच्या सहज-साध्या गिटार कॉर्ड्सवरील गाण्यांची चलती असताना, बिटल्स भारतीय साध्या जीवनशैलीच्या प्रभावाखाली होते. हे गाणे डिलन यांच्या पठडीतले भासते आणि त्यात गिटारसोबत रविशंकर यांची सतारही वाजते. त्यामुळे रागा-रॉकचे फ्युजन म्हणून हे गाणे ओळखले जाते. पुढे बिटल्सनी भारतीय गुरूंचे शिष्यत्व पत्करल्यानंतर ‘जय गुरू देवा ओम’ हे शब्द वापरून ‘अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्स’ हे अनेक बाबतीत ऐतिहासिक गाणे रचले, तरी त्याआधीचे नॉर्वेजियन वुडही खास ऐकत राहावे असे आहे. साठच्या दशकातील जपान, तेथील विद्यार्थी चळवळ आणि त्यात घडणारी प्रेमकथा अशी नॉर्वेजियन वुड या मुराकामींच्या कादंबरीची रचना असली, तरी त्यात या गाण्याचे तत्त्वज्ञान पाझरले आहे. या कादंबरीमुळे मुराकामी यांचे नाव जपानसह जगभरामध्ये ओळखले गेले. मुराकामी यांच्या सर्वच कथांमध्ये गाण्यांचे भरपूर संदर्भ येत राहतात. बिटल्सवरील त्यांचे प्रेम ‘यस्टर्डे’ नावाच्या गाजलेल्या कथेमधूनही पाझरले आहे. यस्टर्डे हे बिटल्सचे गाणेही त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमधील एक आहे. या गाण्याची सहा दशकांमध्ये २२०० हून अधिक अधिकृत कव्हर व्हर्शन्स प्रकाशित झाली आहेत. आकुस्टिक गिटार, थोडक्या वाद्यांसह गायलेले हे गाणे कालबाह्य़ होण्याची शक्यता नाही.

अमेरिकी-ब्रिटिश यंग अ‍ॅडल्ट किंवा चिकलिट कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखांवर संगीताचा प्रभाव नेहमीच तुडुंब असतो. रेचल कोन आणि डेव्हिड लेव्हिथान यांनी लिहिलेल्या ‘निक अ‍ॅण्ड नोराज इन्फिनिट प्लेलिस्ट’ या कादंबरीत कित्येक गाण्यांचे संदर्भ आणि प्रभाव आहेत. या कादंबरीवरून सिनेमा आला, तेव्हा गाण्यांऐवजी त्यातील कथानकावर भर दिला गेला. तरीही त्यात वापरलेले संगीत उत्तम होते. निक हॉर्नबी यांच्या हाय फिडलिटी कादंबरीवर ऐंशी-नव्वदीतील बॅण्ड्सचा जसा प्रभाव होता, तसाच आयर्विन वेल्श यांच्या ट्रेनस्पॉटिंगला १९९०च्या पॉप कल्चरचा आधार होता. या कादंबरीवरून जेव्हा सिनेमा झाला, तेव्हा त्यातील ड्रग्जबाधित तरुणाईला दर्शविणारे समर्पक संगीत वापरण्यात आले. ड्रग्जच्या नशेत यातील व्यक्तिरेखांची भीषण अवस्था अनुभवताना वापरले गेलेले बॉर्न स्लीपी या ब्रिटिश इलेक्ट्रॉनिक बॅण्डचे बॉर्न स्लीपी हे गाणे खासच ऐकण्यासारखे आहे. ब्रेट इस्टन एलिस यांच्या अमेरिकन सायको या कादंबरीतील विध्वंसक नायक पॉप अल्बम्सचा चाहता आणि भाष्यकार दाखविला आहे, तर चक पाल्हानिक यांच्या फाईट क्लबमध्ये तत्कालीन सांगीतिक संदर्भ चुकले नाहीत. या कादंबरी आणि सिनेमाचे तत्त्वज्ञान चार मिनिटांत स्पष्ट करणारे पिक्सीज या बॅण्डचे ‘व्हेअर इज माय माइंड’ या कलाकृतीच्या आस्वादानंतर आवर्जून ऐकावे. साहित्य-संगीत यांच्या एकमेकांवरील अवलंबित्वाची उदाहरणे गतदशकाने सर्वाधिक पाहिली. गाण्याला साहित्य मानल्यास साहित्यप्रेमींची संख्या पुढील दशकातही आवाढव्य असेल.

The Beatles – Norwegian Wood

The Beatles – Yesterday

Mark Mothersbaugh – Nick & Norah’s Theme

Silvery Sleds – Army Navy

Chris Bell -Speed of Sound

Born Slippy – Underworld

Pixies – Where Is My Mind